मासेमारी करताना अनधिकृत मिनी पर्ससीन ट्राॅलर ताब्यात

वेंगुर्ला तालुक्यातील नवाबाग येथील आयएनडी एम.एच. ५ एम.एम. ३७०० हा मिनी पर्ससीन ट्राॅलर येथील उभादांडा मूठ येथील सुमारे ३ वाव समुद्रात १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० सुमारास अनधिकृत मासेमारी करताना येथील स्थानिक पारंपरिक मच्छिमार व गिरप रापण संघाने पकडून मत्स्य व्यवसाय अधिकारी यांच्या ताब्यात दिला आहे. याबरोबर मासेमारी करणारी जाळी सुद्धा त्यांनी तब्येत घेतली. यावेळी समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक पारंपरिक मच्छिमार एकवटले होते. यावेळी वेंगुर्ला पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.

      गेले अनेक दिवस हे मिनी पर्सनेट मच्छिमार पारंपरिक मच्छिमार यांच्या क्षेत्रात येऊन मासेमारी करत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार यांच्या जाळ्यांना मासे सुद्धा मिळत नाहीत. यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने सध्या पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप यावेळी स्थानिक मच्छिमार हेमंत गिरप यांनी केला.

      येथील स्थानिक मच्छिमार व गिरप रापण संघाने पकडलेली मिनी पर्ससीन बोट आपल्या ताब्यात दिली असून मत्स्य विभागाने हा ट्राॅलर ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी अधिनियम १९८१ नुसार उद्या वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे पुढील कारवाईसाठी खटला दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आपल्याकडे गस्ती नौका नसल्याने जी कारवाई आम्हाला किना-यावरुन शक्य होते ती आम्ही करतो अशी महिती यावेळी वेंगुर्ला मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu