२०२०मधील अर्धेअधिक वर्षे कोरोना सावटातच संपले.  कोकणातले चतुर्थी आणि दिवाळी हे मोठे सण कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झाले. सुरुवातीला कुठेही पॉझिटीव्ह रुग्ण मिळाला तरी त्याची घरोघरी चर्चा व्हायची. कधी कधी तर ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी‘ अशी स्थिती असायची. एखाद्या तालुक्यात एक जरी रुग्ण सापडला तरी आजूबाजूच्या गावातील नागरिकांची घाबरगुंडी उडायची. संचारबंदीचे नियम आणखी कडक व्हायचे. पॉझिटीव्ह रुग्णांबाबत तर्कवितर्क केले जायचे. आता असे रुग्ण बरे होऊन त्यांचे दैनंदिन जीवनातील व्यवहार  सुरु झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाबतची भिती हळूहळू कमी होत आहे. पण, कोरोना प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारे मास्क आणि सॅनिटायझर आता जीवनाचा एक भाग बनणे आवश्यक झाले आहे.

      बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर मंदिरे सुरु झाली. ‘दर्शनाची आस लागली जीवास, झालो कासाविस तुजविण‘ अशी भक्तमंडळींची स्थिती झाली होती. मंदिरे उघडताच भाविकांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेत समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी नियम व अटींच्या अधीन राहून मंदिरे सुरु होण्यासाठी ठिकठिकाणी भाजपाने सर्व मंदिर व्यवस्थापक, ट्रस्टी, मानकरी, पूजारी व भक्तमंडळींना घेऊन ‘घंटानाद‘ आंदोलनही केले होते.

       कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिवसेना असे शितयुद्ध दिसून आले. सत्तेच्या खुर्चीवरुन जनकारभार चालविताना एकमेकांच्या चुका जनतेला कशा दिसून येतील यात दोन्ही पक्ष व्यस्त होते. त्यामुळे मुलभूत प्रश्नांवर जनतेचे लक्ष जाणार नाही, लोक भावनिक, धार्मिक गोष्टींमध्येच गुंतून राहतील याची पुरेपुर काळजी घेतली गेली. खाजगी रूग्णालयांचे दर परवडत नाहीत, आणि सरकारी आरोग्ययंत्रणेतील त्रुटींमुळे कोरोना पॉझिटीव्ह नसूनही कित्येक रुग्णांना योग्य उपचाराविना प्राण गमवावा लागला. सत्ताधा-यांनी हीन पातळीवरचे राजकारण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आरोग्यविषयक प्रश्न सोडविणे, सरकारी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे यासाठी दिला असता तर आज कित्येक जणांचे प्राण वाचले असते. देशावर किवा राज्यावर सत्ता गाजविण्यासाठी गावपातळीवरची निवडणूकही राजकिय पक्षांना महत्त्वाची असते. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावातील वाडीवस्त्या पिजून काढणा-या नेते मंडळींनी आपल्या मतदारांना आरोग्यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणत्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या,  आपण जाहिरनाम्यानुसार मतदारांशी किती प्रामाणिक राहिलो याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ मतदार आणि लोकप्रतिनिधींवर आली आहे.

      अलिकडे कोरोनाचे रुग्ण आढळण्याची संख्या कमी  होत असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. यावर प्रभावी लस येईपर्यंत आपणच आपली काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. स्वतःसह आपल्या कुटुंबांची काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहूया.

Leave a Reply

Close Menu