कोरोना महामारीमुळे सर्व क्षेत्रांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. साप्ताहिक ‘किरात‘ही त्याला अपवाद नाही. तरीही गेल्या ९८ वर्षांचा हा वसा सभासद, जाहिरातदार, हितचितक यांच्या सहकार्याने निभावण्याचा प्रयत्न साप्ताहिक ‘किरात‘ने या काळात केला. वर्षभरात साप्ताहिक ‘किरात‘च्या दिवाळी अंकासह ४५ अंक प्रकाशित झाले. या अंकांमध्ये स्थानिक वर्तमानासह विविध सदरे, स्पेशल रिपोर्ट, प्रासंगिक, माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध करण्यात आले.

      वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‘ वाचकांच्या भेटीला आले. यासाठी संजय घोगळे, मिलिंद कुलकर्णी, द्वारकानाथ संझगिरी, श्रेयस अक्षया अरविंद, मधुरा तिळवे-पाडगांवकर, शरद रेडकर यांनी लेखन सहकार्य केले. सलग तिस-या वर्षी श्रुती संकोळी लिखित मनाला नवी उमेद देणा-या ‘मन सुद्द तुजं‘ या सदराची वाचक आजही आतुरतेने वाट पहातात. मोजक्या शब्दांमधून आशयसंपन्न लिखाण लॉकडाऊन दरम्यान वाचकांच्या मनाला उभारी देणारे ठरल्याचा प्रतिसाद लेखिकेसह आम्हालाही आला.

       अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे दृश्य हात असतात. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी त्यांच्या अस्तित्वाचा फार मोठा परिणाम आयुष्यावर होत असतो. याच भावना रेखा तुळशीदास बेहरे, मेघा परब, शशांक मराठे, शेफाली खामकर-किन्नरकर, वंदना करंबळेकर, ऋषी देसाई, रवी परब, रा.पां.जोशी, राजन गावडे, सूर्यकांत खानोलकर, शुभांगी नाईक, श्रीकृष्ण झांटये, मधुसूदन साळगांवकर, पुष्पलता गोवेकर, शुभांगी व प्रशांत देशपांडे, डग्लस सिटन, बाबूराव साळगांवकर, हेतल जाधव, पुष्कराज कोले, नम्रता दिवाडकर (उषा शेणई), किर्ती आशुतोष गुर्जर यांनी ‘शब्द सुमानांजली‘ या सदरातून व्यक्त केल्या.

          सीआरझेड संदर्भात जाणते अजाणते -पणाने समज गैरसमज लोकांमध्ये पेरले गेले आहेत. बहुतेक लोकांना सीआरझेड म्हणजे काय, हेच माहिती नसते. त्यांच्या फायद्यासाठी केल्या गेलेल्या कायद्यालाच ते विरोध करताना दिसतात. यासाठी प्रा.भुषण भोईर यांनी ‘सीआरझेड म्हणजे नक्की काय?‘ ही लेखमाला लिहून वाचकांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

         प्रा.डॉ.सुमेधा नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष घुमे, वरिष्ठ पत्रकार ऋषी देसाई, संजय रोगे, डॉ.रुपेश पाटकर, महेंद्र मातोंडकर, नितीन साळुंखे, प्रथमेश गुरव, डॉ. अनिल मोकाशी, यशवंत मराठे, महेंद्र पराडकर, दुर्गा ठिगळे, मृणाली डांगे, श्वेता हुले, अंकिता आरोलकर, लक्ष्मण तारी, डॉ.धनश्री पाटील, मेघना जोशी, संजय वेंगुर्लेकर, सुवर्णा वैद्य, गंगाधर सबनीस यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर ‘स्पेशल रिपोर्ट‘ लिहून साप्ताहिक ‘किरात‘चा दर्जा उंचावला आहे. यामध्ये ‘आजच्या सावित्री समोरील आव्हाने‘, ‘सीमा भागात चाललय काय?‘, ‘मत्स्य दुष्काळ एक ज्वलंत समस्या‘, ‘प्रेम इनफॅक्चुएशन‘, ‘आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणजे काय?‘, ‘एक झुरका आयुष्याचा सत्यानाश‘, ‘स्थलांतरानंतरचे प्रश्न‘, ‘अर्थचक्र फिरण्यासाठी‘, ‘कोरोना आणि शिक्षण‘, ‘निमित्त कांदळवन संवर्धनाचे‘, ‘तुफानी बारदानी वारा अन् पुरस्थिती‘, ‘शेतीतील प्रेरणादायी प्रवास‘, ‘महिलांवरील अत्याचार आणि राजकारण‘, ‘देशप्रेमाची संकल्पना बदलते आहे काय?‘, ‘मिनिमॅलिझम‘, ‘चौकशी आयोग एक नौटंकी‘ यासारखे ग्लोबल विषय मांडताना‘ कोकण पर्यटनाचे आव्हान‘, ‘जनसमन्वयावरच वेळागर प्रकल्पाचे भवितव्य‘, ‘वेंगुर्ला शहराची टँकरमुक्तीकडे वाटचाल‘, ‘सेंटलुक्स पुन्हा सुरु होणार?‘, ‘नारळाचे अच्छे दिन कधी?‘, ‘वेंगुर्ला बाजाराला प्रतिक्षा मच्छिमार्केटची‘, ‘झारीतील शुक्राचार्यांनी रोखले वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय‘ अशा स्थानिक विषयांवरही साप्ताहिक ‘किरात‘ने प्रकाशझोत टाकला. ‘लोकल टु ग्लोबल‘ अशी ‘किरात‘मधील लेखांची मांडणी वाचकांना अंतर्मुख करत असल्याच्या प्रतिक्रिया लेखक आणि आमच्यापर्यंत पोहोचल्या.

       समाजातील बदलत्या घडामोडींचा लेखाजोगा ‘प्रासंगिक‘ लिखाणामधून वाचकांना विस्तृतरित्या वाचायला मिळावे यासाठी ‘किरात‘ कायमच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहील.

       ‘महिला दिन‘ विशेष अंकांमधून ‘पण लक्षात कोण घेतो‘ या शिर्षकाखाली याहीवर्षीही वंदना करंबेळकर यांनी वाचकांच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला आहे. ‘तिचं क्षितीज विस्तारताना‘ या लेखातून सिंधुभूमीतील पत्रकार सख्यांची ओळख तसेच ‘सलाम साहसाला‘ या मुलाखतीतून दिव्यांगांचा आधारवड असलेल्या रुपाली पाटील यांच्या कार्याची ओळख ‘महिला दिन‘ विशेष अंकाच्या निमित्ताने ‘किरात‘ वाचकांना उपलब्ध करुन दिली.

       ‘भरारी विशेष‘ अंकांमधून ‘मराठी-इंग्रजी‘ माध्यम संघर्षाच्या काळात मराठी माध्यमातून शिकलेल्या वयाच्या ३४व्या वर्षी न्यूयॉर्क येथे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मुख्यप्रंबधक म्हणून कार्यरत असलेले निर्मल गव्हाणकर, जम्मू-काश्मिरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती मिळालेले राजीव ओमप्रकाश पांडये तर गरिबीचे चटके सहन करीत मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गृहनिर्माणमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले, उत्कृष्ट लेखक तसेच व्यंगचित्रकार वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांच्याशी हितगुज साधत त्यांचा जीवनपट ‘किरात‘ मधून उलगडला. ‘गणपती विशेष‘ अंकामधून पौर्णिमा गावडे-मोरजकर यांनी गणपती बाप्पालाच एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर सिधुदुर्गातील गणेशोत्सवाची अनोखी परंपरा आणि कोरोना काळातील नियोजन यामध्ये खवळे, आचरा, नेरुर, वेंगुर्ला येथील वैशिष्ट्यपूर्ण गणपती तसेच सार्वजनिक गणपतींचा विशेष आढावा घेण्यात आला.

       कोरोनाच्या आणिबाणीच्या प्रसंगी कोरोनाचा प्रादूर्भाव फैलावू नये यासाठी विविध क्षेत्रात कार्य करणा-या कोरोना योद्धांचे कार्यही ‘किरात‘च्या माध्यमातून आपण समजून घेतले. ‘श्रीधर मराठे विचार जागरांचा २०२०‘ या कार्यक्रमामधून ग्रामविकासासाठी स्थानिक ग्रामस्थांची मानसिकता, परिस्थितीनुसार डोळस बदल स्वीकारणे, पारंपरिक पदवीबरोबर कौशल्यावर आधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण यावर ‘भगिरथ प्रतिष्ठान‘चे कार्यकर्ते अनंत सामंत यांनी बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ‘विकासाचा मानवी चेहरा‘ या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न झाले. कचरा या वैश्विक समस्येवर ‘जीवामृता‘चा प्रचार-प्रसार करणारे अजित परब यांचा विशेष सत्कार तर पत्रकारितेबरोबरच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आंबोलीचे काका भिसे यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात www.kiratonline.in या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. ही वेबसाईट बनविणा-या संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळची विद्यार्थीनी साहीना शेख व मार्गदर्शक प्रा. खेमराज कुबल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेबसाईटचा लॉकडाऊन काळात किरातवाचकांपर्यंत स्थानिक वर्तमान पोहचविण्यासाठी बराच उपयोग झाला.

       ‘किरात दिवाळी अंक २०२०या अंकात यावर्षी स्थलांतरयावर लेख व मुलाखत या विशेष विभागाचा समावेश होता. तर पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या खुल्या लेखन स्पर्धेमुळे अनेक लिहित्या हातांना चालना मिळाली. या अंकासाठी लेखक, कवी, जाहिरातदार, वाचकांच्या सहकार्याने दर्जेदार साहित्यिक परंपरा अखंडीत ठेवता आला.

       नविन वर्षात किरातनव्या संकल्पनांसोबत जुन्या-नव्या सदरांसह आपल्या भेटीला येईल. किरातला सहकार्य करणा-या ज्ञातअज्ञात सर्वांचे मनःपूर्वक आभार! किरातपरिवारातर्फे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Close Menu