कोविड सेंटरबाबत शासन आदेश येईपर्यंत आरवली येथे इतर वैद्यकीय सेवा सुरुच

आरवली विकास मंडळ संचलित आरवली मेडिकल सेंटरला ७ मे २०२१ ला प्रांत, तहसिलदार वेंगुर्ला आणि वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली. आपल्या जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची चिंताजनक वाढ लक्षात घेता आरवली पंचक्रोशीतील कोविड -१९ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी  आरवली मेडिकल सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या दृष्टीने या अधिका-यांची ती पाहणी भेट होती. या अधिका-यांनी संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष व इतर सभासदांशी आरवली मेडिकल सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरु होण्यासाठी चर्चा केली व  पुढील दोन दिवसात असे केंद्र सुरु करताना ते एकतर आरवली विकास मंडळाने सुरु करावे किवा जिल्हा प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी असे दोन पर्याय देण्यात आले.

   आरवली विकास मंडळाच्या अध्यक्षांना त्यांचा निर्णय कळविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्या मुदतीच्या पूर्वीच संस्थेने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून आरवली मेडिकल सेंटर शासनाच्या स्वाधीन करण्याच्या संस्थेच्या तयारीबद्दल तर कळवले. शिवाय, विविध पत्राद्वारे सिव्हिल सर्जन, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मागील महिनाभर वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन संस्थेच्या पदाधिका-यांनी सतत पाठपुरावा केला. तसेच जिल्हा प्रशासनाकडे वैद्यकीय केंद्राची देखरेख व संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी घेण्याची विनंती पुन्हा केली.

      परंतु, या बाबतीत सुयोग्यवेळी जिल्हा प्रशासनाकडून संस्थेला या बाबतीत कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, आजतगायत या बाबतीत जिल्हा प्रशासनाकडून संस्थेला कोणताही आदेश मिळालेला नाही.

       दरम्यान, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आरवली येथे कोविड केअर सेंटर सुरु होण्याबाबत विविध बातम्या येत आहेत. त्यामुळे गोंधळलेल्या विविध कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीग्रस्त रुग्णांनी या ठिकाणी कोविड सेंटर सुरु झाले असा समज करुन घेतल्याने आरवली मेडिकल सेंटरकडे रुग्णांचा ओघ घटला आहे.

        कोरोना महामारीच्या या संकट काळात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला आरवली मेडिकल सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास संस्था कटिबद्ध आहे. शासनाचे कोविड सेंटर सुरु करण्याची मान्यता मिळेपर्यंत आरवली मेडिकल सेंटरमधील दैनंदिन ओ.पी.डी.व इतर वैद्यकीय सेवा विनाखंड सुरु आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती आरवली विकास मंडळाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष व रुग्णालय प्रमुख डॉ.डी.टी.शिवशरण आणि सल्लागार माजी आमदार शंकर कांबळी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Close Menu