वेंगुर्ला रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

वेंगुर्ला रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरीपदी सुरेंद्र चव्हाण तर खजिनदारपदी नितीन कुळकर्णी यांची निवड झाली असून या सर्वांना ७ ऑगस्ट रोजी येथील साई डिलक्स हॉलमध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे नॉमीनेटेड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांनी शपथ दिली.

     यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, सुनील रेडकर, मावळते अध्यक्ष गणेश अंधारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या संजय गावडे, कार्मिस आल्मेडा, डॉ.जयश्री चमणकर (आरोग्य व कोविड रुग्णसेवा), कु.पूजा धुरी (चित्रकला), वंडर बॉय कु.विजय तुळसकर यांना बोरसदवाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वसंतराव पाटोळे यांनी कातकरी समाजातील मुलगी कु.काजल निकम हिला दत्तक घेऊन तिची शिक्षणाची पूर्णतः जबाबदारी स्वीकारली असून ती यावर्षी १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा व वसंतराव पाटोळे यांचा, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत वेंगुर्ला शहर विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल तसेच रोटरी स्थापनेपासून यंदाच असिस्टंट गव्हर्नर हे पद राजेश घाटवळ यांना मिळाल्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन बोरसदवाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुनाळेकर व नितीन कुळकर्णी यांनी तर आभार सुनील रेडकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu