महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजकीय धुळवड सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक उडविली जात आहे. चिखलफेकीचा हा खेळ कोणत्या स्तरावर जाणार, हे सांगणे अवघड आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा असलेल्या या भूमीत सध्या चाललेला राजकीय धुमाकूळ महाराष्ट्राच्या विकासाला मारक ठरणारा असा आहे, त्याचपद्धतीने नव्या पिढीसमोर हाच आदर्श ठेवायचा काय? याचा गांभिर्याने विचार आणि चिंतन सर्वच राजकीय पक्षांनी करण्याची वेळ आली आहे.

            वृत्तवाहिन्यांवर गेल्या दोन आठवड्यापासून पत्रकार परिषदांचा धडाका सुरू आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील आघाडीवरील अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. या मैदानात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक यांनी उडी घेतली. तपास यंत्रणेतील अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करून त्यांनी आरोपसत्र सुरू ठेवले आहे. स्वाभाविकपणे वानखेडे यांच्याकडूनही त्याचपद्धतीने प्रत्युत्तर दिले जात आहे. काही काळानंतर आता राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा राजकीय रंग या प्रकरणाला आला आहे. संपूर्ण राजकारण या एकाच मुद्यावरून ढवळून निघत आहे. आतंरराष्ट्रीय माफियांशी एकमेकांचे संबंध असल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी केला जात आहे. यातील काही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली आहेत.

     महाराष्ट्रातील आजची स्थिती पाहिली तर दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महागाईचा प्रश्न जनतेला मेटाकुटीस आणत आहे. स्वयंपाकाचा गॅस, डिझेल-पेट्रोल यांची प्रचंड दरवाढ आणि त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तूंच्या भाववाढीत झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले आहे. उपासमारीची वेळ आली आहे. विविध कारणाने आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मेळघाटात कुपोषित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आहे. अंगणवाडीसह विविध सेवेत असलेल्या महिलांचे प्रश्न आणि त्यावरील आंदोलने सुरूच आहेत. ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. यालाही राजकीय वळण मिळाले आहे. दैनंदिन दळणवळणाची व्यवस्थाच मोडकळीला आली आहे. त्यात झालेली रस्त्याची दुर्दशा नियमित प्रवास करणा-या प्रवाशांचे कंबरडे मोडकळीस आणत आहे. खाजगी वाहतुक सेवांचे दरही वाढल्याने सर्वसामान्यांना महिन्याची हातमिळवणी करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शेतक-यांचे प्रश्न गंभीर आहेतच. शासन आणि विमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई मिळत नसल्याने आणि वारंवार येणा-या नैसर्गिक आपत्तींमुळे जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. त्याला सुद्धा कर्जाचा डोंगर आणि नैसर्गिक आपत्ती अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

          बेरोजगारीमुळे युवक वर्ग अस्वस्थ आहे. शिक्षण व्यवस्थेत दररोज नव्या प्रश्नांची भर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकवर्ग अस्वस्थ आहे. ही प्रश्नांची मालिका जनतेच्या जीवनाशी निगडित आहे. राज्य आणि केंद्र शासनाने या प्रश्नाची सोडवणूक करून जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच सत्ताधारी आणि विरोधक गुंतलेले आहेत. सारे राजकीय पक्ष एकाच माळेत उभे आहेत. या प्रश्नावर लक्ष्य विचलित करण्यासाठीच राजकीय चिखलफेकीचे प्रकार सुरू आहेत काय? असा थेट प्रश्न सर्वसामान्य माणूस करीत आहे. हे सारे आता वीट आणणारे ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवा एवढीच आमची अपेक्षा असताना रोज उठून नवा राजकीय प्रश्न आणि त्यावर आरोप-प्रत्यारोप यामध्ये आम्हाला बिलकुल स्वारस्य नाही. त्यामुळे हे सारे बस्स झाले आता, अशीच सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.

     महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची वैचारीक बैठक लक्षात घेता सध्या चाललेले राजकारण कोणालाही रूचणारे नाही, याचे भान राजकीय पक्षांनी जपण्याची गरज आहे. सर्वच बाबतीत संपूर्ण देशासमोर महाराष्ट्राने अनेक बाबतीत आदर्श ठेवलेला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचा राजकीय गदारोळ महाराष्ट्राच्या प्रतिमेला बाधा आणणारा ठरत आहे. किमान याचे तरी भान राजकीय पक्षांनी राखावे, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. सामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नाकडे तातडीने आणि गांभिर्याने राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न करावा, अशाच प्रतिक्रिया सार्वत्रिक स्वरूपात जनमानसातून ऐकायला मिळत आहेत.

Leave a Reply

Close Menu