तहसिल कार्यालयांना शासकीय गाड्या द्या!

गेल्या चार ते पाच वर्षात जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी सातत्याने, वारंवार लेखी व तोंडी मागणी करुन देखील अद्यापपर्यंत कोणत्याच तालुक्याला महाराष्ट्र शासनाकडे निधी असूनही नविन शासकीय गाडी दिली नाही. त्यामुळे सर्व तहसिल कार्यालयामधील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व वंचित सातही तहसिलदारांना तात्काळ शासकीय गाडी उपलब्ध करून देण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन नंदन वेंगुर्लेकर, जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, अतुल बंगे, योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी एकाच तालुक्याच्या तहसिलदारांना शासकीय गाडी उपलब्ध आहे. परंतु, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तर वैभववाडी तहसिल कार्यालयात जुनी गाडी उपलब्ध असून ती लवकरच निर्लेखित होण्याच्या मार्गावर आहे.

                      वेंगुर्ला तहसिल यांच्या ताब्यात असलेली शासकीय गाडी सुमारे ३ वर्षापूर्वी शासकीय नियमाप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करुन अधिकृतपणे निर्लेखित करण्यात आली. पण त्या जुन्या गाडीच्या बदल्यात नविन गाडी मागणीचा शासकीय प्रस्ताव शासनाच्याच लालफितीत मागील ३ वर्षे लोंबकळून गर्दीत अडकला असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Close Menu