सिधुदुर्गच्या विकास कामात वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा-ब्रिगेडियर सावंत

आपण राजकारणात आल्यापासून ते शेवटपर्यंत दीनानाथ वेर्णेकर हे आपल्यासोबत होते. मी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. मी खासदार असताना सिधुदुर्ग जिल्ह्यात जी जी विकासकामे केली त्यात तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या उभारणीतही वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी शोकसभेत बोलताना दिली.

      वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, जीवनसिधु सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दीनानाथ वेर्णेकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या मित्रमंडळातर्फे २५ मार्च रोजी दर्याराजा बीच रिसॉर्ट येथे शोकसभा पार पडली. यावेळी बिग्रेडियर सुधीर सावंत, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, माजी नगरसेवक कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, प्रशांत आपटे, राष्ट्रवादीचे सत्यवान साटेलकर, नितीन कुबल, आयुर्विमा विकास अधिकारी डी.जी.सावंत, जीवनसिधु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सदानंद बांदेकर, नामदेव भूते, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.केशव देसाई, जीवनसिधुच्या कर्मचारी संजना तेंडोलकर, झांटये, श्रीधर जाधव, मनिष परब, प्रदिप कुबल, साईश वेर्णेकर, पत्रकार मॅक्सी कार्डोज यांच्यासह वेर्णेकर यांचा बहुसंख्य मित्रपरिवार उपस्थित होता.

      वेर्णेकर यांच्या अकाली निधनाने राजकीय, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त करुन आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुरेश कौलगेकर यांनी तर आभार वेर्णेकर यांच्या कन्या ऐश्वर्या वेर्णेकर हिने मानले.

Leave a Reply

Close Menu