भाजी मार्केटच्या रखडपट्टीमुळे वेंगुर्ला बाजारपेठेवर परिणाम

प्रत्येक ठिकाणच्या बाजारपेठेवर त्या शहराची आर्थिक सुबत्ता अवलंबून असते. वेंगुर्ल्याचे क्रॉफर्ड मार्केट ही केवळ बाजाराची जागा नसून हा एक ऐतिहासिक वारसा आहे. सन 2018 मध्ये गावठी बाजाराची सकल्पना उदयास आली. याला अपवाद ठरला तो वेंगुर्ला बाजार. कारण, या दैनंदिन बाजारपेठेची रचनाच ही सर्वसमावेशक अशी आहे. त्यामुळे येणारा ग्राहकही क्रॉफर्ड मार्केटमध्ये यायला उत्सुक असतो. आता तर सुसज्ज मच्छिमार्केटही अस्तित्वात आले. लवकरच ‘पवनपुत्र भाजी मंडई’चे बांधकाम पूर्ण होऊन शहराची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार या प्रतिक्षेत नागरिक होते. परंतु भाजी मार्केटचे कामकाज धीम्या गतीने अजूनही चालू असल्याने या वास्तूचे लोकार्पण होऊ शकलेले नाही. त्यामुळे  ग्राहकांसोबत विक्रेते आणि वेंगुर्ला बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.

      दोन वर्षे कोरोना काळामुळे ग्रहण लागलेल्या या मार्केटला अजूनही उर्जितावस्था आलेली नाही. मच्छिमार्केट बांधकामाच्यावेळी पर्यायी जागेत हलवलेला आठवडा बाजार अजून मूळ जागेवर आला नाही.

      आधीच विक्रेत्यांच्या स्थलांतरामुळे ग्राहक आणि विक्रेता यात दुरावा निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विखुरलेली बाजारपेठ फिरण्यापेक्षा नजरेसमोर दिसेल ते घेणे ग्राहक पसंत करीत आहेत. विक्रेत्यांनाही कडक उन्हाळ्याचा सामना करताना, जागा मिळेल तिथे आपली दुकाने मांडवी लागत आहेत. याचा परिणाम विक्रेत्याच्या आर्थिक बाजूवर झाला आहे. यातील बरेचसे विक्रेते हे मालाची आयात करुन त्यांची विक्री करतात. मंदावलेली विक्री, ग्राहकांची अनास्था, माल विक्रीपेक्षा वाढत चालेली थकबाकी, सातत्याने बदलणारे हवामान  या सर्वांमुळे विक्रेत्यांचे कंबरडेच मोडण्याची वेळ आली आहे. त्यात सध्या एसटीही पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने बाजारपेठेतून जाणारी एसटीही अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळेही एसटीतून उतरणाऱ्या प्रवाशांच्या चॉकलेट, बिस्किट, थंडपेय या किरकोळ विक्रीवर सुद्धा फार मोठा परिणाम झाला आहे.

      लॉकडाऊननंतर मोडकळीस आलेला बाजारहाट पूर्ववत होऊन किमान हा हंगाम तरी व्यापाऱ्यांना मिळावा या आशेने प्रत्येकजण पवनपुत्र भाजी मंडई बांधकामाच्या पूर्णत्वाकडे डोळे लावून आहे. धीम्या गतीने चाललेले हे काम लवकर पूर्ण होऊन पावसाळ्यात होणारी गैरसोय तरी थांबावी या आशेवर विक्रेते आणि ग्राहक आहेत.

लोकार्पणानंतर नियोजन महत्त्वाचे

      या भाजी मंडईचे लोकार्पण झाल्यानंतर मच्छिमार्केटमध्ये ज्याप्रमाणे रोजच्या रोज साफसफाई होते. त्याप्रमाणे या भाजी मंडईतही व्हावी अशी अपेक्षा स्थानिक विक्रेते ठेवून आहेत. शिवाय तालुक्यातील छोटे शेतकरी जे आपला माल विक्रीसाठी घेऊन येतात त्यांनाही या भाजी मंडईत स्थान मिळावे, जेणेकरून जागेअभावी कवडीमोल दराने त्यांचे उत्पादन त्यांना विकावे लागणार नाही. या छोट्या शेतकऱ्यांनाही व्यवस्थित जागा उपलब्ध झाल्यास आपले उत्पादन रास्त दरात ग्राहकांना उपलब्ध करून देता येईल, तसेच भाजी मंडई ही ठराविक लोकांची मक्तेदारी होऊ नये अशीही मागणी स्थानिक कष्टकरी छोट्या शेतकरी वर्गाकडून होत आहे.

मत्स्य बाजारपेठेसमोरील दुर्गंधीवर उपाययोजना कधी?

      वेंगुर्ला बाजारपेठेत पहाटे 6 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत माशांचा लिलाव हा नुतन मच्छिमार्केट समोर केला जातो. त्याचे पाणी रस्त्यालगतच्या गटारात उतरते. सध्या भाजी मार्केटचे काम सुरु असल्याने या गटारातून सांडपाणी प्रवाहीत होत नसल्याने ते तेथेच साठून त्याची दुर्गंधी पसरत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार सूचना, तक्रारी देऊनही त्याची कार्यवाही न झाल्याने तेथील विक्रेत्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. देशभरातील नगरपालिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या, फाईव्ह स्टार रेटिंगकडे वाटचाल करणाऱ्या वेंगुर्ला नगरपरिषदेकडून  निश्‍चितच हे अपेक्षित नाही. प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी नागरिकांची  अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया –

      नाशवंत माल म्हणजे भाजीपाला. 45 दिवसात तुम्हाला पुन्हा सुसज्ज जागा उपलब्ध होईल असे म्हणताना आता वर्ष होत आले. नुकसान सोसून प्रत्येक व्यापारी आपला माल विक्री व्हावा म्हणून प्रयत्नात राहीला. खरेतर जिथे गर्दी तिथे लोकांचा ओघ अधिक या मार्केट फंड्यामुळे वेंगुर्ला बाजाराची अक्षरशः या वर्षभरात रयाच गेली. कारण जागेअभावी गावच्या वेशीवरच बाजार भरु लागला जो आमच्यासारख्या काही विक्रेत्यांना सोईचा नव्हता. भाजी मंडई पूर्ण क्षमतेने सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे. तसेच वेंगुर्ल्यातील ट्रॅफिक समस्या निकाली काढण्यासाठी नगरपरिषदेने मच्छिमार्केटच्या बेसमेंटमध्ये केलेल्या वाहनतळाची सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.  तीही लवकरात लवकर सुरु व्हावी.                                                                                              – एक भाजी विक्रेता, वेंगुर्ला

      वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती बाजारपेठ असताना गावच्या वेशीवर दुसरा आठवडी बाजार भरणे हे मुख्य बाजारपेठेच्या दृष्टीने घातकच आहे. इमारत नुसती बांधून उपयोग नाही. त्याचे योग्य नियोजनही आवश्‍यक आहे. पवनपुत्र भाजी मंडई लवकरात लवकर सुरु झाल्यास अवकळा आलेल्या वेंगुर्ला बाजाराला उर्जितावस्था येईल अशी आशा आम्ही व्यापारीवर्ग बाळगून आहोत.

                                                                                                                    – एक व्यापारी,  वेंगुर्ला

28 मार्च रोजी लोकार्पण

      तालुक्याची मुख्य बाजारपेठ वेंगुर्ला शहरात नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली येते. एप्रिल-मे या काळात पर्यटकांच्या माध्यमातून बाजारातही आर्थिक स्तर वाढलेला असतो. त्यामुळे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून युद्ध पातळीवर पवनपुत्र भाजी मंडईचे कामकाज सुरू असून येत्या 28 मार्च रोजी पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते या मंडईचा लोकार्पण सोहळा करण्याचे नियोजन करत आहोत.                                                 -डॉ. अमितकुमार सोंडगे,  मुख्याधिकारी, वेंगुर्ला नगरपरिषद

Leave a Reply

Close Menu