दुसरी संधी?

             जगण्याची एक संधी मिळावी म्हणून बरोबर एक वर्षभरापूर्वी कित्येक लोक झगडत होते. मागची दोन वर्षे आपण एका अदृश्य भयाच्या सावटाखाली जगत होतो.

   कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील ओळखीतील किमान एकजण एका न दिसणा-या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू.., फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना? आपल्याला ती संधी मिळालीही आणि आपण आज काय करतोय?

    जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की, भारतातील दंगली असो की, महाराष्ट्रातील सध्याचं दिवसेंदिवस खालच्या थराला जात चाललेलं राजकारण असो. माणूस म्हणून लाज वाटावी अशी स्थिती आली आहे! प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारतील, आरोग्य-शिक्षण व्यवस्थेवरील बजेटमध्ये भरघोस वाढ होईल. येत्या पाच वर्षात सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असे काही धोरणात्मक निर्णय राजकारण बाजूला ठेवून घेतले जातील अशी नागरिकांची भाबडी अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे. पुन्हा एकदा भोंगे, हनुमान चालीसा, किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य, संजय राऊत यांनी मांडलेले सर्व मुद्दे जीवन-मरणाचे प्रश्न बनत चालले आहेत की काय? अशी स्थिती वृत्तवाहिन्यांवर आली आहे. सतत तेच मुद्दे आणि त्याच विषयावरील नेत्यांच्या बाईट दाखवून जणू काही महाराष्ट्रात इतर काही घटना घडतच नाही की काय अशा स्वरूपाचे वृत्तांकन गेल्या काही दिवसात सुरू आहे.

        तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचा. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोग-या आवाजात ‘‘डॉक्टर वाचवा, जीव घाबरलाय‘‘ म्हणत तरण्याताठ्या लोकांनी प्राण सोडले. हे वास्तव विसरून आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी यासाठी तेव्हा होणारे प्रयत्न आता दिसत नाहीत. आपली स्थिती कायमच तहान लागली की, विहिर खोदायची अशी राहणार आहे काय?

    खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे. पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचा-यांनी आपलं योगदान दिलं, रूग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणा-या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. पण या तणावरूपी वातावरणाने अनेक डॉक्टर, सर्जन, सिस्टर यांनाही काळाने त्यांच्या कुटुंबापासून हिरावून घेतले. हे सर्व आपण एवढ्यातच विसरणार का? तेव्हाचे आपले प्रयत्न जगण्यामरणाचा संघर्ष हे सर्व आजचे दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं. माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!

   शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून सॉरी बोलणं आलं. आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली, झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते. इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं. एक माणूस दुस-या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं. एकाच वर्षात सगळं संपलंय!

   आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक! यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत. नोक-या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

   ही वेळ राजकारण आणि धर्मकारण करण्याची निश्चितच नाही. आपल्याला जगण्याची दुसरी संधीमिळाली आहे त्याचा विनियोग आपण कशाप्रकारे करतो त्यावरच आपली, समाजाची आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीची दिशा ठरणार आहे.

Leave a Reply

Close Menu