ओळख पर्यटनाची…?

वेंगुर्ला तालुक्याला नितांत सुंदर असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. येथील काही ठिकाणेही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येत आहेत. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार, प्रकर्षाने एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांचा वाढता राबता दिसून येतो आहे. देश-विदेशातील पर्यटक इथल्या महासागराची अथांगता पहाण्यासाठी व त्याची भव्यता डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. पर्यटकांसोबत चाकरमान्यांचेही समुद्राच्या ठिकाणी येणे-जाणे वाढले आहे. पर्यटकांना येथेच खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता यावा यासाठी स्थानिकांनी छोटी-मोठी दुकानेही सुरू केली आहेत. या सर्वांसोबत समुद्राच्या पाण्यावर स्वार होऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी साहसी पर्यटनही सुरू आहे. या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे.

    गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांविना ओस पडले होते. यावेळी मात्र, सर्व खुले झाल्याने वेंगुर्ला तालुक्यासह सिधुदुर्ग-कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजून गेले. परंतु, मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटत असताना मालवण-तारकर्ली येथे बोट उलटून तसेच शिरोडा-वेळागर येथे पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने साहसी सागरी पर्यटनाला गालबोट लागले. तसेच सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. लाईफ जॅकेटसारखी सुरक्षेची साधने असताना त्याकडे आपण जाणूनबुजून कानाडोळा करतो आणि जीव गमावून बसतो. एवढी मानवी जीवनाची किमत कमी आहे का? सागरी साहसी पर्यटनामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे.याबाबतीत आता सिधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

      स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे म्हणून आपल्याकडील समुद्रकिना-यांची ओळख देश-विदेशातही झाली आहे. त्यात वेंगुर्ला शहर तर स्वच्छतेच्याबाबतीत नेहमीच अग्रेसर आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे राहिले आहे. असे असताना एक किलोमिटरच्या अंतरावरील बागायत, सागरेश्वर किना-यांवर अस्वच्छता दिसून येत आहे. पर्यटनाच्या नावाखाली विविध प्रकारचा कचरा जमा होत आहे. त्यात प्रकर्षाने दारुच्या बाटल्यांचाही समावेश आहे.  सागरेश्वर किनारी दशक्रियासारखे विधीही पार पाडले जातात. त्यामुळे सकाळच्या सुमारासही अशा विधींसाठी येणा-या माणसांची वर्दळ असते. अशा ठिकाणी कचरा, दारुच्या बाटल्या आढळून आल्याने धार्मिक विधींसाठी आलेल्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

      आपण सर्वजण आपल्या घराची स्वच्छता अगदी मन लावून करतो. कचरा राहू नये यासाठी काळजी घेत असतो. असे असताना निसर्गनिर्मित पर्यटनाचा आनंद घेताना हा दुजाभाव का? आपल्याकडून टाकला जाणारा कचरा हा आपल्याच आरोग्याला हानिकारक आहे. तसेच हा कचरा समुद्रात गेल्यास पाणी प्रदूषणही होऊ शकते. हे सारे आपण अनुभवत असलो तरीही निसर्गाला आणि स्वतःच्या आरोग्याला हानी पोहचविण्याचे कार्य काही थांबवत नाही. दर दोन-तीन महिन्यांनी यु.एन.डी.पी., वेताळ प्रतिष्ठान, रोटरी क्लब, माझा वेंगुर्ला अशा अनेक स्वयंसेवी संस्था किनारा स्वच्छतेच्या मोहिमा राबवितात, तेव्हा सर्वात जास्त प्रमाण दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे असते. सागरेश्वरसारख्या तीर्थस्थानी दारूच्या बाटल्या आढळू नयेत यासाठी ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने याला आळा घालणा-या मोहिमा आखण्याची गरज आहे. स्थानिकांनी देखील किना-यावर दारू पिऊन तिथेच बाटल्या  टाकणा-यांना वेळीच रोखले तर हे प्रमाण बरेच कमी होईल.

      अस्वच्छता करण्याचे प्रकार स्थानिक आणि बाहेरुन येणा-यांकडूनही होत असतात. त्यामुळे येवा कोकण आपलाच आसाअसं म्हणताना आपण आपल्याकडे येणा-या पाहुण्यांचे स्वागत अशा अस्वच्छ घरात करायचे काय? आणि येणा-या पर्यटकांनीही लक्षात घ्यावे की, आपण पाहुण्यांकडे जाऊन अस्वच्छतेचा पसारा घालायचा की, स्वच्छतेचे नियम पाळायचे? हे सारे थांबले तरच दीर्घकाळ पर्यटन व्यवसाय चालेल. नाहीतर स्वच्छ आणि चांगल्या पर्यटनाची ओळख बदलायला वेळ लागणार नाही.

 

 

Leave a Reply

Close Menu