माजी विद्यार्थी संघ,मुंबईचे काम आदर्शवत – सीमा मराठे

 आपल्या मागे गावातील आपल्यासारख्या अडचणी पुढील विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी 1988 साली वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, मुंबईची स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून हायस्कूलमध्ये गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि भौतिक सुविधा निर्माण करताना वर्गखोल्यांचे केलेले नुतनीकरण आदर्शवत असल्याचे प्रतिपादन किरात साप्ताहिकच्या संपादक सीमा मराठे यांनी केले.

      वेंगुर्ला हायस्कूलच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, मुंबईतर्फे हायस्कूलच्या पाच वर्ग खोल्यांच्या पूर्नबांधणीसाठी टप्प्या टप्प्याने आर्थिक सहाय्य केले होते. यातून वर्गखोल्यांच्या पूर्नबांधणीचे काम पूर्णत्वास आले. या पूर्नबांधणी केलेल्या नविन वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 28 जून 2022 रोजी साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तेरेखोलकर, सचिव प्रताप पवार, माजी विद्यार्थी आत्माराम गावडे, कोल्हापूर चर्च कौन्सिल संस्थेचे अध्यक्ष एस.व्ही.जयकर, चिटणीस डी.व्ही.कदम, आर.एन.सूर्यवंशी, ॲड.डी.डी.धनवडे, डॉ.जे.एस.कुरणे, व्ही.व्ही.माजगांवकर, एस.बी.धनवडे, प्रा.आर .बी.चोपडे, जे.एस.कांबळे, जे.एस.वायंगणकर, मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, माजी मुख्या. एस.एस.काळे, बांधकाम ठेकेदार परशुराम काकतकर आदी उपस्थित होते.

      या हायस्कूलचे माजी विद्यार्थी रमेश गावडे हे मुंबईमध्ये शिक्षक असताना आपल्या सहकारी शिक्षकांना वेंगुर्ला येथे आणून इथल्या मुलांनाही शिकवत असत. या संघाच्या संकल्पनेतून काही वर्षे सराव परीक्षा पेपर किरातमध्ये छपाई करून शाळेत वाटले होते. शाळेतील गुणवंतांना कायम त्यांनी बक्षीसरूपी आर्थिक सहकार्य करून प्रोत्साहनाची थाप दिली आहे. मैत्रीचा हात किती सुंदर काम करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर नूतनीकरण केलेल्या वर्गखोल्यांच्या माध्यमातून आले असल्याचे सीमा मराठे यांनी बोलताना सांगितले.

      ‘किरात’ हा नेहमी चाकरमानी आणि वेंगुर्ला यांच्यातील दुवा म्हणून काम करीत आहे. म्हणूनच बित्तंबातमी आमच्यापर्यंत पोहचते. त्याच प्रेरणेतून गावाशी असलेली नाळ सामाजिक उपक्रम घ्यायला प्रवृत्त करते. त्यामुळेच किरातच्या सध्या कार्यरत असलेल्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे असा आग्रह माजी विद्यार्थी संघाने धरला. वयोमानानुसार तसेच मनुष्यबळा अभावी आमचा हा संघ आम्ही बरखास्त करीत असलो तरी सध्या स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्ही.एच.एस. असोसिएशनला आम्ही नक्कीच सहकार्य करु असे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तेरेखोलकर म्हणाले.

      प्रारंभी तेरेखोलकर यांनी माजी विद्यार्थी संघातील दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या सर्व मित्रांमुळेच जमा झालेल्या देणगीतून आम्हाला उपक्रम घेता आले असल्याचेही सांगितले.

      यावेळी दहावी उत्तीर्ण झालेल्या मानसी गावडे, चेतना शेणई आणि सनिषा आरमारकर यांचा संस्था, हायस्कूल आणि माजी विद्यार्थी संघातर्फे सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी आत्माराम गावडे, सचिव प्रताप पवार, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे अध्यक्ष एस.व्ही.जयकर, कार्यकारिणी चिटणीस बी.व्ही.कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      पी.एन.सामंत यांनी सूत्रसंचालन, मुख्याध्यापक पी.डी.कांबळे यांनी प्रास्ताविक तर पर्यवेक्षक आर. व्ही. थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu