पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण उपक्रमात नोंदी

          पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ला शहरातील पक्षी गणनेचा उपक्रम घेण्यात आला. या निरीक्षणात शहरातील दीपगृह परिसर (निमुसगा), तांबळेश्वर मंदीर परिसर आणि होळकर देवस्थान परिसर या भागातील पक्षी प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण 94 प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळल्या. त्यांच्या नोंदी व छायाचित्रण करण्यात आले.

      समुद्री गरुड, मधुबाज, खवलेदार होला, पाचू होला, पिवळ्या पायाची हरोळी, पिचू पोपट, टोई पोपट, पट्टेदार कोकीळ, मासेमार घुबड, बलाकचोच धीवर, भारतीय नीलपंख, हुदहुद, धनेश, तांबट, कुटूरगा, सोनपाठी सुतार, तारवाली भिंगरी, धान व वृक्ष तीरचिमणी, मोठा कोकीळ खाटिक, छोटा व नारिंगी गोमेट, सुभग, जेर्डनचा पर्णपक्षी, नारिंगी डोक्याचा कस्तूर, शामा, गप्पीदास, ठिपकेवाला सातभाई, राखी वटवट्या, टिकेलची निळी माशीमार, काळ्या मानेची आकाशी माशिमार, स्वर्गीय नर्तक, पिवळी रामगंगा, शिंजीर, ठिपकेवाली मनोली, भांगपाडी मैना, हळद्या तसेच भृंगराज कोतवाल यांसारख्या 94 वैविध्यपूर्ण पक्षी प्रजाती पक्षी निरीक्षणादरम्यान आढळून आल्या.

      या उपक्रमामध्ये पक्षी निरीक्षक कर्पूरगौर जाधव तसेच राजू वजराटकर, प्रसाद जाधव, मुकूल सातार्डेकर, सर्वार्थ जाधव आदी पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. यापुढील पक्षी निरीक्षणामध्ये वेंगुर्र्ला तालुक्यातील पाणथळ परिसरात आढळणाऱ्या पक्षी प्रजातींचा अभ्यास करण्याचे प्रयोजन असल्याचे पक्षी निरीक्षक कर्पूरगौर जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu