प्रवीण दशरथ बांदेकर साहित्य अकादमीने सन्मानित

साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील ‘साहित्य अकादमी’ हा साहित्य लेखन क्षेत्रात दर्जेदार लेखनाची दखल घेणारा मानाचा पुरस्कार अलीकडेच सिंधुदुर्गातील कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या बहुचर्चित कादंबरीला घोषित झाला आहे.

      त्याबद्दल त्यांचे कौतुक असले तरी बांदेकरांनी ज्या विषयाची निवड केली आणि सामाजिक अपप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या विषयावर बेतलेल्या कादंबरीला हा पुरस्कार मिळतो आहे ही बाब विशेषत्वाने नमूद करावी लागेल. यामुळे निवडकर्त्यांचेही अभिनंदन करावे लागेल. लेखक सामाजिक विसंगती नजरे समोर ठेऊन जेव्हा लिहितो तेव्हा तो समाजातील असहाय्य लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. म्हणूनच सर्व तऱ्हेने नाडलेल्या लोकांवर  तळागाळातील शेवटच्या घटकावर विविध प्रकारची बंधने लादून समाजातीलच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व तऱ्हेने सशक्त असलेला घटक जेव्हा अशा लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लेखकाला लिहावे लागते. लेखकाचा यामध्ये कुठचाही स्वार्थ अथवा वाईट हेतू नसतो हे समजून घ्यायला पाहिजे. समाजातील प्रश्‍न समजावून घेऊन त्या प्रश्‍नांची भेदकता नजरेसमोर ठेऊन लिखाण करणे आजच्या काळात फार अभावानेच पहायला मिळेल. परंतु प्रवीण बांदेकर यांनी अशाही काळात कादंबरी सारखा व्यापक साहित्य प्रकार हाताळून रोजच्या जगण्यातील काही एक अभाव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे दबलेला एक समाजगट – जो अभावग्रस्त आहे त्यांचा आवाज बुलंद करण्याचाही तो प्रयत्न असतो असेच म्हणावे लागेल.

      प्रवीण बांदेकर यांचा कादंबरी लेखनाचा आवाका विस्तीर्ण आहे. त्यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीला जरी हा मनाचा व राष्ट्रीय पातळीवरील मोठा व तगडा पुरस्कार मिळाला असला तरी त्यांच्या इतरही दोन्ही कादंबऱ्या विशेष प्रभावी आहेत. त्या म्हणजे ‘चाळेगत’ आणि ‘इंडियन ॲनिमल फार्म’. उजव्या सोंडेच्या बाहुल्या मध्ये समाजिक प्रश्‍नांची उकल अतिशय टोकदारपणे मांडली असून त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चाळेगत कादंबरीत कोकणातील दशावतार आणि शंकासुराच्या माध्यमातून व्यवस्थेतील एकूणच संभ्रमावर बोट ठेवले आहे. तर अलीकडच्या इंडियन ॲनिमल फार्म या कादंबरीच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थ्ाा आणि सामान्य माणूस यातील संघर्ष व सामान्य माणसाची होणारी फरफट नेमकेपणाने दाखवली आहे. ह्या तिन्ही कादंबऱ्या एका सूत्रात बांधल्या तर इथला परिस्थितीशरण सामान्य माणूस, लहान तुकडा बाळगून जगणारा छोटा शेतकरी एका बाजूला आणि जमीन, जंगल, नदी, समुद्र नष्ट करायला निघालेली अजस्त्र अवजारे एका बाजूला असलेली दिसतील.

      बांदेकरांच्या कादंबरी लेखनाच्या बरोबरीनेच कवितांमधील आशय ही असाच समाजाभिमुख आणि व्यवस्था निखळतेला पूरक असलेला आहे. ‘येरू म्हणे’ आणि ‘चिनभिन’ हे संग्रह मैलाचा दगड म्हणण्याइतके महत्त्वाचे आहेत. प्रवीण बांदेकर यांचा साहित्य प्रवास पहाता, ते सुरवातीला डॉ. वसंत सावंत यांनी स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या माध्यमातुन साहित्य क्षेत्रात ओळखले जाऊ लागले. काहीकाळ वृत्तपत्रातून “कॅलिडोस्कोप“ हे वाचनीय सदर प्रसिद्ध होत असल्याने प्रवीण बांदेकर यांचे एकही पुस्तक प्रसिद्ध न होताही लेखक म्हणूनच महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. इथेच त्यांच्यातील कविता आणि कादंबरीतील बीजे रुजली गेली असावीत. असे असले तरी नावाक्षर दर्शन या मासिकाचे संपादक म्हणून बांदेकर महाराष्ट्रभर पोचलेले दिसतात. साधारण दहा वर्षे हे मासिक चालविल्यानंतर दोन वर्षापूर्वी “वैनतेय“ या साप्ताहिकाचे ते संपादक म्हणून प्रसिद्ध झाले. ह्या साप्ताहिकातील सर्वंकष लेखन साहित्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

      एकंदर मोठा साहित्य आवाका असलेल्या या लेखकाची पुढील काळात येणारी पुस्तके यावर आता पासूनच चर्चा सुरू असलेली दिसते आहे. मुख्यतः संत तुकारामावरील संशोधन ग्रंथ आणि गोवा राज्यातील परकीय राज्यकर्त्यांच्या काळात झालेली तिथल्या मूळ राहिवाशाची झालेली एकूणच सांस्कृतिक उलथापालथ इ. एका समृद्ध लेखणीतून उतरेल. वाचकांचे याकडे डोळे लागून राहिले असतील. त्यांच्या या एकूणच प्रवासाला साहित्यप्रेमींच्या शुभेच्छा!

-मधुकर मातोंडकर, 9423513072

Leave a Reply

Close Menu