शहराला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा केसरकर यांचा प्रयत्न-येरम

                 शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे प्रयत्नातून व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने वेंगुर्ला नगराच्या विविध स्वरूपाच्या विकासकामासाठी ३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आज शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाची विविध विकासकामे सुरु आहेत. या विकास कामांमुळे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्याचा मानस श्री. केसरकर यांचा आहे, अशी माहिती शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      सप्तसागर कॉम्प्लेक्समधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजेरकर यांचा समावेश होता. केसरकर यांनी गेल्या वर्षभरात शहराच्या विकासाचे व्हीजन समोर ठेवून मंत्री व सत्ताधारी आमदार म्हणून मिळणा­या विविध हेड खाली फार मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला आहे. यात नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजनेकरिता ३ कोटी १ लाख ५३ हजार ४०० रुपये मंजूर असून यात पाण्याची पाईप लाईन बदलणे व मिटर बसवणे या कामांचा समावेश आहे. विशेष रस्ता अनुदानमधून ६ कोटी १९ लाख २७ हजार १२५ रुपये मंजूर असून शहरांतील सर्व रस्त्यांची कामे सुरु झालेली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान मधून ८ कोटी ७१ लाख २३ हजार ३०७ रुपयांचा निधी मंजूर आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथ्थान महाअभियानमधून ३ कोटी ९२ लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. तसेच आमदार स्थानिक विकास फंडातून ५५ लाख रुपयांचा निधी वेंगुर्ला  न.प.स प्राप्त झालेला आहे.

      झुलत्या पुलापासुन बंदरकडे जाणा­या रोडच्या मध्यवर्ती पासून समुद्राच्यादिशेने रोड वायडींग, सायकलींग ट्रॅक, वॉकींग ट्रॅक व फुडमॉल तयार करणे या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी १५ कोटी ३६ लाख रूपये मंजूर झालेले आहेत. बंदर ते झुलता पूलापर्यंत  रस्ता डांबरीकरणासाठी पर्यटन हेडमधून ७५ लाख रू. निधी मंजूर झालेला आहे. पर्यटन हेडमधून रामेश्वर देवस्थान सुशोभिकरणकरिता ३५ लाख रू. निधी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर झालेला असून त्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झालेले आहे. 

निविदा प्रक्रिया झालेली व सुरु झालेली कामे

    वडखोल येथील धरणग्रस्त लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर पंप बसविण्यासहित इतर कामांसाठी २० लाख रुपये, दाडाचे टेंब ते पंप हाऊस पर्यंत जाणा­या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आणि स्मशानभूमीच्या ठिकाणी संरक्षक भिंत यासाठी ३५ लाख रुपये, कुबलवाडा ते गणेश हार्डवेअर दुकानापर्यंतचा रस्ता ३५ लाख रुपये, कॅम्प म्हाडा येथे एक लाख लिटर पाण्याची टाकीसाठी २५ लाख रुपये, सातेरी मंदिर ते शासकीय गोदाम पर्यंतचा रस्ता सिमेंट  करणे १५ लाख रुपये मल्टीपर्पज हॉलमध्ये सुविधेच्या दृष्टीने जनरेटर बसवण्यास ३५ लाख रुपये, भांगले यांचे घर ते सातेरी मंदिर रामदास परब यांच्या घरापर्यंतच्या गटाराचे आरसीसी कामासाठी २५ लाख रुपये निधी प्राप्त झालेला असून त्याची निविदा प्रक्रियाही झालेली आहे. तर वडखोल येथे सागर गावडे घरापर्यंत रस्ताच्या ठिकाणी अत्यावश्यक असणा-­या संरक्षक भिंतीसाठी ४५ लाख रुपये निधी प्राप्त असून सदर काम सुरु झाले आहे.

      गेल्या दोन वर्षात वेंगुर्ला न.प.वर प्रशासकाचा कारभार असल्याने वेंगुर्ल्याच्या विकासाकडे लक्ष असलेल्या केसरकर यांनी या भागाचा आमदार व लोकप्रतिनीधी म्हणून प्रशासक सावंतवाडी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी शहर सौंदर्यीकरण स्पर्धेबाबत केलेल्या सुचनांमुळे प्रशासनाकडून केलेल्या कामांमुळे सौंदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ला न.प. अव्वल ठरली असल्याचे सचिन वालावलकर यांनी सांगितले.

         शहरातील स्वच्छतेसाठी दोन स्टेनलेस स्टील टॉयलेट श्री.केसरकर यांच्या प्रयत्नातून २५ लाखाच्या निधीतून कँम्प स्टेडियम व मानसी गार्डन येथे  बसविण्यात आली आहेत. तसेच २० लाख रुपयांच्या निधीतून कचरा गोळा करणा­या ५ चारचाकी, २ ऑटो टीपर व १० लाख रुपयांच्या निधीतून दोन ट्रॅक्टर न.प.स प्राप्त झालेले असल्याची माहिती उमेश येरम यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu