वेंगुर्ला बंदरावरील चार ऐतिहासिक तोफा प्रकाशात

गेली कित्येक वर्षे वेंगुर्ला बंदर परिसरातील जमिनीमध्ये गाडलेल्या स्थितीत असलेल्या ऐतिहासिक चार तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवक व रणरागिणींनी बाहेर काढून एक नवा इतिहास रचला आहे. या कामी स्थानिक तसेच मेरीटाईम बोर्डचे विशेष सहकार्य लाभले.

      वेंगुर्ला बंदर जेटीवर वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत गाडल्या गेलेल्या या ऐतिहासिक तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेने पुनर्ज्जीवन देऊन इतिहासाला पुन्हा उजाळा दिला आहे. या तोफा अर्ध्या जमिनीत गाडलेल्या स्थितीत चार वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. यातील एक तोफ ही एका हॉटेलच्या गडग्याला लागून होती. दुसऱ्या तोफेला लाईटचा खांब जोडलेला होता. तिसरी तोफ ही डिझेलच्या टँकच्या खाली होती तर चौथी तोफ अशीच पडून होती. तोफा काढण्याच्या 2 दिवस व रात्री चाललेल्या या मोहिमेत सुमारे 40 दुर्गसेवकांसोबत सह्याद्रीच्या रणरागिणींनी सुद्धा मोलाचे योगदान दिले. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा, मुंबई, बेळगाव याठिकाणच्या दुर्गसेवकांचा समावेश होता. या तोफा बाहेर काढल्यानंतर  ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‘ ची घोषणा देत सर्व दुर्गसेवकांनी भंडारा उधळण करत जल्लोष साजरा केला.

Leave a Reply

Close Menu