वेंगुर्ल्यात साकारणार कवितेचे गाव

शासनाने महाबळेश्‍वर जवळील भिलार या गावी पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठी गावकऱ्यांनी देखील या कामी एकजुट दाखविली. त्यामुळेच भिलार या पुस्तकांच्या गावाची नेोंद सर्वदूर पसरली. पुस्तकांच्या गावापाठोपाठ राज्य सरकारतर्फे आता ‘कवितेचे गाव’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दलची घोषणा केली. वेंगुर्ला येथे ‘मंगेश पाडगावकर कवितेचे गाव’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अमरावतीच्या रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे काम कालबध्द पध्दतीने पूर्ण करण्यात येणार आहे. 2024-25 साठी माहिती तंत्रज्ञान विभागास 920 कोटी, माहिती व जनसंपर्क विभाग, विधानमंडळ सचिवालयास प्रत्येकी 547 कोटी आणि मराठी भाषा विभागास 71 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

      प्रशासकीय लालफितीत सदर प्रकल्प न अडकता विहीत वेळेत पूर्ण व्हावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. हा प्रकल्प साकारल्यास साहित्यप्रेमी आणि पर्यटकांनादेखील एक नवे दालन खुले होईल.

      शासन अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी निधी देते. त्यातून इमारत उभी राहते. मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा होतो. परंतु काही वर्र्षांनंतर देखभाल दुरुस्तीच्या तरतुदी अभावी अशा प्रकल्पांची दुरावस्था होते. शासनाने साहित्यिकांची स्मारकरुपी कलादालने उभारताना त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशिष्ट निधीची तरतूद करायला हवी.

      शिरोडा येथे अ. वि. बावडेकर महाविद्यालयात उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या पुढाकाराने व डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या संकल्पनेतून वि. . खांडेकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाची दुरुस्ती देखभाल शाळेतर्फे करण्यात येते. त्यामुळे नवी पिढीही या स्मारकाशी जोडली गेली आहे.

      शासनाने साहित्यिकांची स्मारके उभारताना त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच्या तरतूदीसोबत काही नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विचार करावा.

Leave a Reply

Close Menu