आरवली टाक येथील श्री सरस्वती विद्यालयात शाळेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थ एकवटले आहेत. १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयामुळे या विद्यालयातील शिक्षक संख्या कमी होऊन भविष्यात शाळा बंद होण्याची गंभीर बाब पालकांच्या लक्षात आल्याने सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी हायस्कूलच्या परिसरात गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. आपल्या शाळेला भविष्यात होऊ पाहणारा धोका लक्षात घेऊन यावेळी उपस्थित सर्व पालकांनी आपली शाळा वाचवण्यासाठी आणि आपल्या परिसरातील विद्यार्थी याच शाळेत शिकावेत, यासाठी संयुक्त सह्यांची मोहीम राबविली.
आपले म्हणणे सरकार दरबारी मांडण्यासाठी चर्चेतून निवेदन तयार केले. यावेळी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अंतर्गत उपस्थित पालक व ग्रामस्थांची कृती समिती स्थापन करण्यात आली. कृती समितीचे अध्यक्ष म्हणून बबन बागकर, तर सचिव म्हणून यशवंत फटनाईक यांची निवड करण्यात आली. सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव यांनी या सभेचे नेतृत्व करीत आपण सर्व मिळून शाळेच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी एकत्रितरित्या मार्ग काढूया, असे आवाहन केले. आरवलीचे सरपंच समीर कांबळी यांनी आपल्या आजूबाजूची सर्व मुले या आपल्या शाळेकडे कशी दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शाळा वाचवण्याच्या कार्यात सर्व लोकांची सर्वतोपरी मदत घेऊन शासनाचा हा निर्णय कसा बदलता येईल, यासाठी सनदशीर मार्गाने शासन दरबारी सतत पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस पाटील बाबुराव चोपडेकर, पालक संघ उपाध्यक्ष नरेंद्र मोंडकर, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य समृद्धी कुडव, मेरी फर्नांडिस, स्मिता फर्नांडिस, गायत्री गोडकर, रचना गोडकर, सेजल नाईक, आत्माराम बागलकर, महेश गोडकर, आरवलीचे माजी सरपंच मयूर आरोलकर, घनःश्याम गोडकर, राजाराम बागकर, रवींद्र बागकर, त्रिवेणु चिपकर, विजय आरोलकर, सतीश फटनाईक, शंकर नाईक, बापू भानजी, कृष्णा धुरी, सिद्धी नरसुले, कार्तिकी कांबळी, माधुरी वराडकर, वेदिका गुरव, संतोष नाईक, नारायण वरगावकर, संजय भुबे आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोंडकर यांनी सांगितले की, सदर शाळा एक शिक्षकी होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यशवंत फटनाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा अत्यंत महत्त्वाची असून शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली.
