निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले दिलीप गिरप यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष दालन फुलांनी सजिवण्यात आले होते. तब्बल चार वर्षे रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदावर ते विराजमान झाले.
या निवडणुकीत भाजपाने नगरसेवक पदाच्या २० पैकी १६ जागांवर विजय मिळविला. निवडून आल्यानंतर जिल्हा बँक संचालक मनिष दळवी, संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पपू परब, रविंद्र मडगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप गिरप यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या कार्यालयाकडे एकत्र येत पक्ष कार्यालय, दाभोली नाका, बाजारपेठ ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. त्यानंतर स्वामी विवेकांनद सभागृहात स्वामी विवेकांनद यांच्या पुतळ्याला गिरप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दाजी परब, दादा केळुसकर, साईप्रसाद नाईक, ज्ञाने·श्वर केळजी, एम.जी.मातोंडकर, हेमंत गावडे, सत्यविजय गावडे, नितीन चव्हाण, मनोज उगवेकर, धर्मराज कांबळी, प्रार्थना हळदणकर, पुंडलिक हळदणकर यांच्यासहीत कार्यकर्ते व गिरप कुटुंबिय उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष गिरप म्हणाले की, मागच्या पाच वर्षात भाजपाच्या माध्यमातून आम्हाला विकासासाठी भरघोस निधी मिळाला. जसजसा निधी आम्ही मागत गेलो, तसतसा आम्हाला निधी मिळत गेला आणि तो आम्ही मार्गी लावला. परिणामी, विकासाच्या दृष्टीने कायपालट झाला. अनेक कामे मार्गी लावली. या निवडणुकीत नागरिकांकडे आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन गेलो. या सर्व वाटचालीत भाजपाचे वरिष्ठ नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचे मोलाचे पाठबळ मिळाले. आता आमची जबाबदारी वाढली आहे, आम्ही सर्व सतरा जणांची टिम घेऊन वेंगुर्ल्याच्या विकासासाठी झोकून घेऊन काम करू असे सांगितले.
यावेळी मनीष दळवी यांनीही दिलीप गिरप यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले. तसेच आपटे यांचा जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
