खानोली येथील श्री सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नूतन भव्य इमारतीचा शुभारंभ सोहळा १४ नोव्हेंबर रोजी पार पडला. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फित कापून नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संस्था चेअरमन प्रशांत प्रभूखानोलकर, पं.स.सदस्य शितल राऊत, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या योगिता खानोलकर तसेच माजी सरपंच महेश प्रभूखानोलकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, संस्था सदस्य सुधाकर खानोलकर, सुरेश कामत, गुरूनाथ कांबळी, प्रदिप सावंत, विद्याधर प्रभू, सिद्धेश्वर प्रभू यांसह अन्य उपस्थित होते. सोसायटीने पारंपरिक कामाकाजासोबतच बदलत्या काळाजी गरज ओळखून उत्पन्न वाढीचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत. संस्थेमार्फत आंबा खरेदी, काजू खरेदीसारखे उपक्रम सुरू करून स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांना सहकार्य करता येईल. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच संस्थेच्याही उत्पन्नात वाढ होईल. यासाठी दूरदृष्टी ठेऊन नियोजन करावे आणि सहकाराच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासाला चालना द्यावी, असे आवाहन मनिष दळवी यांनी केले. आनंद दाभोलकर यांनी आभार मानले.
