विकासाच्या नावाखाली मातीची घरे पाडून सिमेंट काँक्रिटची घरे बांधली जात आहेत. याचा विपरित परिणाम पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर सुध्दा होत आहे. आणि जवळपास प्रत्येकाने तो अनुभवलाय. मातीचे जिवंत घर सोडून सिमेंटच्या निर्जीव घरात रहात असलेल्या माणसाची निसर्गाशी नाळ तुटत चालली आहे. आणि याचे दुष्परिणाम अनेक आहेत. त्यामुळे मातीशी तुटत चाललेले नाते पुन्हा जोडण्यासाठी तसेच तीच्या आरोग्यादायी गुणधर्मांचा अनुभव देण्यासाठी ‘घर मातीचं का आणि कसं बांधायचं?’ यावर चार दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी हवामानबदलावर मात करण्यासाठीच्या ठोस उपायांची माहिती सुध्दा देण्यात आली.
आर्किटेक्ट अजितकुमार परब आणि ‘डिझाईन जत्रा’चे प्रख्यात आर्किटेक्ट प्रतिक धामनेर यांनी ६ ते ९ डिसेंबर कालावधीत ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या आर्किटेक्टसह एकूण ५० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. कार्यशाळेसाठी तुळस येथील मांगर फार्म स्टे आणि कुडाळ तालुक्यातील बांव गावाची निवड केली होती. यात प्रशिक्षणार्थींना जुनी जतन केलेली मातीची घरे आणि दगड मातीने नविन बांधलेली घरे दाखविण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मातीच्या घरांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. तसेच त्यांना मातीच्या घरांची आवश्यकता, बांधकाम पध्दतीची माहिती, फायदे, खर्च आदींची माहिती देण्यात आली.
