बिबट्या घुसला स्वयंपाकघरात

   दाभोली-कोऱ्याचीवाडी येथील बागायतदार विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात बिबट्या शिरल्याची घटना ८ एप्रिल रोजी घडली. तत्पूर्वी विवेक जोशी यांना हा बिबट्या आपल्या बागेत बसलेला दिसून आला.  मात्र, थोड्यावेळाने तोच बिबट्या जोशी यांच्या घराच्या नजिक असलेल्या गुरांच्या गोठ्यात बसला असल्याचे आढळून आले. यावेळी त्याला हाकलविण्याचा उपस्थितांनी प्रयत्न करताच तो थेट शेजारी असलेल्या जोशी यांच्या स्वयंपाकघरात घुसला. तो अत्यंत जखमी व अशक्त असल्याने त तो स्वयंपाकघरातच बसून राहिला. याबाबत जोशी कुटुंबियांनी वनविभागाला संपर्क केला.
यानंतर सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, नेरूर वनपाल सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक सागर भोजने, मठ वनरक्षक प्रविण कमळकर, नेरूर वनरक्षक सचिन पाटील, वनसेवक संतोष इब्राामपुरकर व शंकर पाडावे यांनी घटनास्थळी दाखल होत सविस्तर माहिती घेत बिबट्याच्या बचावाची तात्काळ तयारी केली.
यावेळी कुडाळ येथील जलदबचाव पथकाचे दिवाकर बांबर्डेकर, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, प्रसाद गावडे, सुशांत करंगुटकर, राहूल मयेकर यांनी स्वयंपाकघरात घुसत या जखमी बिबट्या जेरबंद केले. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.  यानंतर बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी डॉ. शरद जाधव, डॉ.सागर चव्हाण, डॉ.राजश्री जाधव यांनी त्याच्यावर उपचार करीत पुढे तिन दिवसांसाठी त्याला वनविभागच्या वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार व मठ वनपाल सावळा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या दोन वर्षे वयाचा मादी जातीचा आहे. काटेरी कुंपणातून रस्ता ओलांडत असताना त्याच्या मानेच्या मागील बाजूस जखम होऊन ती चिघळली व त्याला अशक्तपणा आल्याने तो आश्रयासाठी गुरांच्या गोठ¬ात आला. त्याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांना पाहून तो स्वयंपाकघरात घुसला. मात्र, तो घाबरलेल्या स्थितीत असल्याने त्याने कोणावरही हल्ला केला नाही. वैद्यकीय उपचार झाल्यावर बिबट्याची परिस्थिती स्थिर असून पुढील तीन दिवस बिबट्याला वैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या निरीक्षणाखाली ठेऊन त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आश्रयासाठी आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले.

Leave a Reply