वेंगुर्ल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व : दिलीप गिरप दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी

अत्यंत चुरशीच्या आणि तेवढ्याच प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारपैकी दोन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष, शिंदे सेनेचा एक आणि शहर विकास आघाडीचा एक नगराध्यक्ष विजयी झाला आहे. सावंतवाडीत राजघराण्यांच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी तर वेंगुर्ल्यातही भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप विजयी झाल्याने आमदार केसरकर यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगर परिषदा त्यांच्या हातून गेल्या आहेत.

      मालवणात शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्याने आमदार नीलेश राणे यांनी आपला करिष्मा दाखवत शिवसेनेचा गड कायम राखला आहे. कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाल्याने पालकमंत्री नीतेश राणेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. भाजपविरोधात दोन्ही सेना व इतर पक्ष एकत्र येण्याचा प्रयोग कणकवली यशस्वी झाला आहे. स्वबळावर लढलेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे सेना व काँग्रेसला एकही नगर परिषद मिळवता न आल्याने व मोठ्या पराभवास सामोरे जावे लागल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

वेंगुर्ल्यात भाजपची एकहाती सत्ता

      वेंगुर्ल्यात भाजपने पुन्हा एकदा सरशी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप ४३० मताधिक्याने विजयी झाले. या ठिकाणी २० नगरसेवकांपैकी सर्वाधिक भाजपाने १६ जागांवर विजय मिळविला. शिंदेसेना एक आणि ठाकरे सेनेने तीन जागा मिळविल्या आहेत. वेंगुर्ल्यात भाजपने आपले वर्चस्व राखल्याने आमदार केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही नगरपालिका हातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

सावंतवाडीत भाजपचे वर्चस्व

      सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले १३६४ मताधिक्याने विजयी झाल्या. या ठिकाणी २० नगरसेवक पदांच्या जागांमध्ये भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळविला. शिंदे शिवसेनेला सात, ठाकरे सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला.

कणकवलीत शहर विकास आघाडीचा विजय

      कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय एकवटले होते. विशेष करून शिंदे शिवसेना आणि ठाकरेसेना सुद्धा एकत्र आली होती. त्यामुळे कणकवलीची निवडणूक खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख असे असले तरी शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने भाजपविरुद्ध दंड थोपटण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार नीलेश राणे, माजी आमदार राजन तेली यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचारात उतरले होते. तर दुसऱ्या बाजूने पालकमंत्री नीतेश राणे भाजपसाठी मैदानात उतरले होते. मात्र अटीतटीच्या या निवडणुकीत अखेर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर १४५ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. मागच्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या ३६ मतांनी पराभव झाला होता. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील महत्वाची असलेली नगर पंचायत हातून गेल्याने पालकमंत्री श्री. राणे यांच्यासाठी मोठा थक्का ठरला आहे. १७ नगरसेवकांपैकी भाजपचे ९, तर शहरविकास आघाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत.

नीलेश राणेंचा मालवणात करिष्मा

      पैसे वाटपाच्या मुद्यावरून लक्षवेधी ठरलेल्या मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आपला करिष्मा दाखविला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर १३०० मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी २० नगरसेवकांपैकी भाजपचे ५, शिंदे सेनेचे १०, ठाकरे सेनेचे ४ आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना एकसंध असताना मालवण नगरपरिषद शिवसेनेकडेच होती. आता ती शिंदे शिवसेनेकडे आली असल्याने शिवसेनेने आपला गड राखला आहे.

Leave a Reply