शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, वेंगुर्ला नगरपरिषद व अनुलोम संस्थेच्या सहयोगाने आयोजित महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २४९ महिलांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात घेतलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, उपकृषी अधिकारी संदीप देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल रगजी, नगरसेवक गौरी माईणकर, गौरी मराठे, रवींद्र शिरसाठ, सचिन शेट्ये आदी उपस्थित होते. शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहरी भागातील शेती करणाऱ्या महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, नगरपरिषदेमार्फत या उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्यासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि पात्रतेविषयी सविस्तर माहिती दिली. सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसले तरी प्रत्यक्ष शेतीशी संबंधित असलेल्या महिलांनी या प्रक्रियेची माहिती घेऊन नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती प्रसन्ना देसाई, सचिव वृंदा विनायक गवंडळकर, खजिनदार डॉ. दीपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, अनुलोमच्या श्रीहर्षा टेंगशे, बाजीराव काळे, प्रथमेश रेडकर, कृषी सखी गार्गी होडावडेकर व मयुरी दाभोलकर यांचीही उपस्थिती होती.
शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मात्र प्रत्यक्ष शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक महिलांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद झालेली नसते. विशेषतः सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसल्यामुळे अनेक महिलांना शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत संभ्रम असतो. हा गैरसमज दूर करून अधिकाधिक महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, आवश्यक माहिती, अर्ज करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सहकार्य करण्यात आले. आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच शेती व शेतीपूरक कामांची माहिती यांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.
