हिंदी प्रचार सभा, वेंगुर्ला या संस्थेचा वर्धापनदिन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली 4 एप्रिल रोजी वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या हिंदी शुद्धलेखन, अनुवाद, निबंध, वक्तृत्व, गायन स्पर्धांमधील तसेच हिंदी परीक्षा बालबोधीनी, प्राथमिक, प्रवेशिका, सुबोध, प्रविण, पंडित परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर हिंदी प्रचार, वेंगुर्ला संस्थेचे संस्थाध्यक्ष का.हु.शेख, कार्याध्यक्ष विशाखा वेंगुर्लेकर, सचिव महेश बोवलेकर, कैवल्य पवार व चित्रा खानोलकर उपस्थित होते. हिंदी प्रचार सभेच्या भवन बांधणीसाठी योगदान देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष गिरप यांनी दिले. संस्थेतर्फे श्री.गिरप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांची ओळख कैवल्य पवार यांनी करून दिली. तर स्वागत विरधवल परब यांनी केले. प्रास्ताविक विशाखा वेंगुर्लेकर यांनी तसेच सूत्रसंचालन चित्रा खानोलकर यांनी केले. या कार्यक्रमाला मधुकर कुबल, संस्था सदस्य विद्याधर कडुलकर, हिंदीच्या माजी शिक्षिका ए.जी.खानोलकर, सौ.मार्गी, सौ.बोवलेकर, लेखनिक भाग्यश्री धुरी यांच्यासह हिंदी प्रेमी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश बोवलेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
