बँक ऑफ महाराष्ट्र वेंगुर्ला, आजगाव, दोडामार्ग, रेडी, बांदा आणि सावंतवाडी या सहा शाखांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक संपर्क कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, वाणिज्य विभागाच्या प्रा. प्रियांका प्रभू आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्राहक हा बँकिंग व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हे कोणत्याही बँकेच्या यशाचे महत्त्वाचे मापदंड आहेत. बदलत्या काळानुसार बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, ग्राहकांनी आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांचा सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. ग्राहकांनीही केवळ कर्ज घेण्यापुरते बँकेशी संबंध न ठेवता बचत, गुंतवणूक, विमा, डिजिटल व्यवहार आणि विविध आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून बँकिंग सेवांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.गोस्वामी यांनी केले.
कार्यक्रमाला सहाही शाखांमधील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी वेंगुर्ला शाखेचे शाखा व्यवस्थापक आशिष कुमार, आजगाव शाखेचे ऋषिपाल सिंह, दोडामार्ग शाखेच्या ज्योती धैया, रेडी शाखेचे संतोष कुमार, बांदा शाखेचे अतिश कम्बळे, सावंतवाडी शाखेचे श्री.विकास उपस्थित होते. ग्राहकांना बँकेची नवीन उत्पादने, विविध कर्ज योजना, बँकिंग सुविधा आणि आर्थिक सेवांची माहिती देणे तसेच बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी ग्राहकांना त्यांच्या बँकिंगविषयक गरजा मांडण्याची तसेच विविध आर्थिक सुविधांबाबत मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमादरम्यान नुकत्याच मंजूर झालेल्या कर्जांचे मंजुरीपत्र संबंधित लाभार्थ्यांना डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ग्राहकांनी बँकेच्या सेवा, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
