सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी प्रतिनियुक्तीवर १ अस्थिव्यंग तज्ज्ञ देणे, सीआर्म मशिन ८ आठवड्यात, इतर आवश्यक यंत्रसामुग्री ४ आठवड्यात आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे ६ महिन्यात भरतीचे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटल्याने यासंदर्भात वेगाने पुढील कार्यवाही करण्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी मान्य केले.अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गने दाखल केलेल्या जनहित याचिकेची न्यायमूर्ती निरज धोते, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. अभिनव फाऊंडेशनतर्फे वकील महेश राऊळ, वकील मिहीर मोंडकर, वकील निरज लवटे यांनी बाजू मांडली.
सरकारी वकील विकास माळी, शिरीर हिरे यांनी बाजू मांडली. अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या जनहित याचिका प्रकरणी तत्कालीन न्यायमूर्ती कर्णिक यांंनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंबधीचे व्दितीय अपील वेगाने निकाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राजघराण्यातील दोन्ही कुटूंबामध्ये तडजोड झाली. जागेच्या वादाचे व्दितीय अपील निकाली निघाले. त्यामुळे लवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरु होईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी तातडीने डॉ.सचिन बळवंते या अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरना प्रतिनियुक्ती
दिली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इतर रिक्त पदे येत्या सहा महिन्यात भरली जातील. १४४० पदांची वैद्यकीय अधिकारी पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आहेत. त्यातून सावंतवाडीला वैद्यकीय अधिकारी देऊ असे आरोग्य विभागाच्यावतीने
सांगण्यात आले. अभिनव फाऊंडेशनचे वकील महेश राऊळ यांनी उपसंचालक कोल्हापूर यांच्या नेतृत्वातील चार सदस्य समितीचा अहवाल ऑक्टोबर २०२६मध्ये आला, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यासंदर्भात न्यायमूर्ती देशमुख यांनी अहवालात नमुद आवश्यक वैद्यकीय यंत्रणा चार आठवड्यात खरेदी करावी, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सीआर्म मशीन ८ आठड्यात खरेदी करावे. आरोग्य संचालकांनी याप्रकरणी लक्ष घालावे. पुढील तारखेपर्यंत यासंदर्भात कार्यवाही करुन पुढील सुनावणीस पुन्हा आरोग्य संचालकांनी व्हि.सी.व्दारे हजर रहावे. केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी असे आदेश सर्किट बेंचने दिले. सुनावणीस अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिकेवरील सुनावणीस आरोग्य समितीचे अध्यक्ष एन.बी.रेडकर, तेजल परब, राहूल परब हजर होते.
