भूमिहीन, बेघर लाभार्थ्यांना घरकुल

          वेंगुर्ला न.प.ची सर्वसाधारण सभा २७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व खात्यांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. शहरातील ज्या नागरिकांकडे स्वत:ची जमीन नाही, पक्के घर नाही तसेच बेघर आहेत, अशा नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना घटकांअंतर्गत घरकुल संकुल बांधून देण्याबाबत शासनाने केलेल्या योजनेचा लाभ देण्यास या सभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
       प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक क्र.२ अन्वये एएचपी अंतर्गत ईडब्ल्यूएस घटकातील नागरिकांसाठी कमीत कमी ३० चौ.मी.चटई क्षेत्रफळापर्यंतची घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर योजनेच्या घटक क्र. २ एएचपी (परवडणारी घरे) अंतर्गत युडब्ल्यूबी पोर्टलवर ज्यांच्याकडे जागा नाही अशा १७ नागरिकांनी नोंदणी केली असून तर ४५ जणांचे ऑफलाईन असे एकूण ६२ नागरिकांचे घरकुल मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
       महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यामार्फत तिलारी प्रकल्पांतर्गत वेंगुर्ला शहरास पाणीपुरवठा करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे यावर चर्चा करण्यात आली. या योजनेतून ऑक्टोबर २०२४ पासून नियमित स्वरूपात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, सावंतवाडी यांनी ५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला न.प.स पत्राद्वारे कळविले आहे. या पत्राची प्रत सभेसमोर अवलोकनार्थ सादर करण्यात आली असता म.जि.प्रा.च्या अटी व शर्ती या त्रासदायक वाटत असल्याने जेव्हा गरज भासेल, त्या त्या वेळी पाणीपुरवठा घेतला जाईल, पण पाण्याचे जे बिल असेल तेच भरले जाईल. या स्वरूपाचा ठराव करण्यात आला. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना कौन्सिलमध्ये बोलावून घेऊन याबाबतची निश्चिती करण्याचे ठरविण्यात आले.
        न.प.हद्दीमध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अवयवदान करणेकामी प्रोत्साहन व जनजागृती करणे या संदर्भात सभागृहात चर्चा होऊन त्यास मंजूरी देण्यात आली. मात्र, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्रशासनाने पत्र पाठवावे, असे नगरसेवक प्रशांत आपटे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक रिया केरकर यांनी मासळी बाजारपेठेतील महिलांच्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे सूचित केले.

Leave a Reply