वेंगुर्ला गॅस एजन्सीद्वारे दिली जाणारी एचपी गॅस सिलेंडरची सेवा ही वेंगुर्ला शहरातील कलानगर ठिकाणावरून पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी अशी मागणी २८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला शहरासह पंचक्रोशीतील गॅस ग्राहकांनी वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.वेंगुर्ला गॅस एजन्सीद्वारे दिली जाणारी एचपी गॅस सिलिंडरची सेवा ही १५ ऑगस्टनंतर शहरापासून चार ते साडेचार किलोमिटर अंतरावर असलेल्या मठ गावातील गोडाऊन येथून दिली जात आहे. याचा फटका बऱ्याच ग्राहकांना बसला आहे. स्वतंत्र वाहने घेऊन गेल्यास वेळ व खर्च अधिक प्रमाणात होत आहे. सिलिंडरसाठी रिक्षा वाहन नेल्यास सुमारे दीडशे ते दोनशे रूपयांपेक्षाही जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहेत. चतुर्थीच्या सणात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने सिलिंडर ग्राहकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. गेल्या अनेक वर्षांपासून एचपी गॅस सिलिंडरचे वितरण हे कलानगर येथूनच होत आहे. त्याठिकाणी कोणताही अपघात अथवा अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही. अपघात किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित एजन्सी चालक त्याची खबरदारी घेत आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांना होणारा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी कलानगर येथूनच सिलिंडरचे वितरण व्हावे अशी मागणी गॅस ग्राहकांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सुमारे ६२ गॅस ग्राहकांची स्वाक्षरी आहे. निवेदन सादर करताना दत्ताराम नार्वेकर, आनंद केरकर, माजी नगरसेवक दादा सोकटे, अजित कनयाळकर, शंकर कोरगांवकर, दाजी धुरी, शेखर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. हे निवेदन महसूल नायब तहसिलदार क्षितीजा जोशी यांनी स्विकारले.
