मातृ-वंदना विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराच्या अन्नशांती सभागृहात ‘मातृ-पितृ देवो भव’ या संकल्पनेवर आधारित ‘मातृ-वंदना’ विशेष संस्कारी कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘आईसारखे दैवत नाही, माता ही सर्वश्रेष्ठ’ या भावनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून आई-वडिलांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात मुलांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून मातृवंदना केली.
       यावेळी ‘आई’ या विषयावर ५०० शब्दांची निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ८० निबंध प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. शालेय तसेच खुला गट अशा दोन विभागांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून १६ स्पर्धकांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मातृ-वंदना कार्यक्रमासोबतच स्तोत्रपठण, गणपती स्तोत्र तसेच अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यामध्ये पंचक्रोशीतील २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
त्यानंतर  आईचा महिमा कथन करणारे सुश्राव्य व सुंदर प्रवचन पावशी कुडाळ येथील रामदास तेंडुलकर यांच्या रसाळ वाणीतून झाले. त्यांच्या प्रभावी प्रवचनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. मातृ-वंदना कार्यक्रमातील त्यांचे प्रवचन विशेष दखलनीय ठरले. मातृ-वंदनेची संकल्पना रामदास तेंडुलकर यांनी सरंबळ येथे माजी सरपंच अजय कदम यांच्या घरी संत बाळूमामा सत्संगी मातृवंदनेच्या माध्यमातून साकार केली होती. या संकल्पनेने प्रभावित होऊन प्रकाश मिशाळ व उदय पार्सेकर यांनी वेतोबा देवस्थानचे जयवंत राय यांना प्रेरित केले आणि आरवली येथे मातृ-वंदना कार्यक्रम प्रत्यक्षात साकार झाला. या कार्यक्रमासाठी रामदास तेंडुलकर यांच्या सोबत संदीप तवटे, अजय कदम, प्रियंका मोरजकर व प्राजक्ता परब हे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीदेव वेतोबा देवस्थान, श्रीमत् भगवद्गीता भक्तपरिवार शिरोडा, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ, मळेवाड आणि आरंभ प्रतिष्ठान यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद नाईक, आरंभ प्रतिष्ठानचे उत्तम चव्हाण आणि भगवद्गीता परिवाराचे गुणेश पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत राय  व प्रमोद नाईक यांनी केले, तर उदय शिरोडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply