‘कसरत’ आत्मकथनाचा अभ्यासक्रमात समावेश

वेंगुर्ला येथील दिवंगत मुख्याध्यापक आत्माराम पुंडलिक जाधव यांच्या ‘कसरत’ या आत्मकथनाचा समावेश सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला सत्र २ साठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी हे मुंबई विद्यापीठ संचालित स्वायत्त महाविद्यालय असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी १० वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता दिली आहे. जीवनाची कसरत सांभाळताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या माणसांविषयी व्यक्त झालेला आत्मिय भाव हा या आत्मकथनाचा गाभा आहे. हे आत्मकथन आपल्या जिवलगांशी हितगुज करावे तसे आणि सुसंवादाची निखळ अपेक्षा व्यक्त करणारे मनस्वी असे आहे. सामाजिकदृष्ट्या उपेक्षित, वंचित आणि परकोटीचे दारिद्र्य असलेल्या पार्श्वभूमीवर हताश न होता शिक्षणाचा ध्यास घेऊन आपले जीवन समृद्ध करणाऱ्या एका जिद्दी आणि स्वाभिमानी व्यक्तीचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांनी अनुभवावा, त्यांच्या जीवनातही तो मार्गदर्शक आणि प्रेरक ठरावा या हेतूने ‘कसरत’ या आत्मकथनाचा समावेश अभ्यासक्रमात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने केला आहे.

Leave a Reply