‘माझा वेंगुर्ला’ संस्थेच्या वतीने दि. १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित तीन दिवसीय दिवाळी विशेष कार्यशाळा सलग चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडली. सुट्टीचा काळ केवळ मनोरंजनात आणि मोबाईलमध्ये न दवडता, मुलांमध्ये चिकित्सक विचारसरणी, आत्मविश्वास, निसर्गप्रेम, पर्यावरण भान आणि व्यावहारिक जीवनकौशल्ये रुजवणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत विविध सत्रांचा आनंद घेतला. येथील बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन अॅड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना अॅड. नकुल पार्सेकर यांनी ‘माझा वेंगुर्ला’ आणि वेंगुर्लावासीयांच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले. मुलांना सतत नवे काहीतरी शिकण्याची संधी देणारे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या काळात वाढत्या मोबाईल वापराचे दुष्परिणाम लक्षात घेता, मुलांनी योग्य निर्णय कसे घ्यावेत आणि दैनंदिन जीवनात सतर्क कसे राहावे, यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उद््घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.कार्यशाळेची सुरुवात श्री. निखिल तेली यांच्या लाठीकाठी प्रशिक्षणाने झाली. यातून विद्यार्थ्यांना पारंपरिक लाठीकाठीची ओळख होण्यासोबतच शारीरिक लवचिकतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्पमित्र महेश राऊळ यांनी सिंधुदुर्गातील सर्पविविधता, विषारी व बिनविषारी साप ओळखण्याची पद्धत, घ्यावयाची काळजी आणि स्वतःचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील सापांविषयीची भीती दूर केली. दुपारच्या सत्रात श्री. गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीपासून भांडी तयार करण्याचा आनंद लुटला. चित्रकार सुनील नांदोसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘दगडावरील चित्रकला’ (स्टोन पेंटिंग) सत्रात, सपाट कागदाऐवजी ओबडधोबड दगडांवर मुलांनी कल्पकतेने सुंदर चित्रे साकारली. पहिल्या दिवसाची सांगता सीमा मराठे यांच्या ‘आवाजातील गमती जमती व नाट्यछटा’ या सत्राने आणि मजेशीर खेळांनी झाली.
दुसऱ्या दिवशी ची सत्रे श्री. दाजी परब यांच्या निसर्गरम्य आंब्याच्या बागेत, औदुंबराच्या झाडाखाली घेण्यात आली. शिवानी नाईक यांनी मुलांकडून झुंबा व योगा करून घेतला ‘तरुण भारत’च्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक श्री. शेखर सामंत यांनी ‘सिंधुदुर्गातील निसर्गाचे रहस्य व अंधश्रद्धा’ या विषयावर संवाद साधत विविध दंतकथा व समजुतींमागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. गोवा येथील रजत नाईक आणि त्यांच्या टीमने फ्रिज मॅग्नेट बनवणे आणि करवंटीवरील चित्रकला शिकवून सर्जनशीलतेला वाव दिला. यानंतर श्री. गोपाळ कोरगांवकर यांनी नारळाच्या चुडतांपासून विविध कलाकृती व कंदील बनवण्याचे तंत्र शिकवले, तर नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेत कम्पोस्ट डेपोची सफर केली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी गोपाळ कोरगांवकर यांनी ‘कोकेडमा’ या आकर्षक वनस्पती कलेची माहिती व प्रात्यक्षिक दिले. धामापूर येथील मार्गदर्शक मोहम्मद शेख यांनी ‘जैवविविधता व त्याचे संवर्धन’ तसेच वाळवीसह निसर्गातील सूक्ष्म जीवसृष्टीचे महत्त्व पीपीटीद्वारे स्पष्ट केले. रामचंद्र श्रृंगारे यांनी कोकणातील ‘रानभाज्यांची ओळख’, त्यांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. तर प्रशांत आपटे आणि प्रवीण सातार्डेकर यांनी ‘पाणी व त्याचे व्यवस्थापन’ या विषयावर प्रबोधन करत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज विशद केली. कार्यशाळेची सांगता विद्यार्थ्यांच्या बहारदार ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रमाने झाली. सहभागीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले
नगराध्यक्ष राजन गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे, सचिन वालावलकर, राजन गावडे, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेटे, खेमराज कुबल, यासीरशहा मकानदार, अमृत काणेकर, अमोल खानोलकर, संदीप परब, महेश वेंगुर्लेकर, शिवम वारंग, प्रिती वाडकर, प्रथमेश घारे, अमेय जोशी, पवन सामंत यांच्यासह ‘माझा वेंगुर्ला’चे सदस्य उपस्थित होते. सुट्टीचा विधायक वापर करत भावी पिढी घडविणारा हा उपक्रम पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी ठरला.
