दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व बालरोग तज्ज्ञांनी त्वरित पेशंटला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले. वालावलकर रुग्णालयात येताच कान -नाक -घसा विभागाच्या डॉ. सीजा यांनी पेशंटला तपासले व प्राथमिक तपासणी करून घेतली. क्षणाचाही विलंब न करता पेशंटला ऑपरेशन थेटरमध्ये घेण्यात आले व कान-नाक-घसा विभागाचे तज्ज्ञ डॉ. राजीव यांनी युसोफॅगोसकोपी करून सेफ्टी पिन काढण्यात यश आले. सेफ्टी पिन उघडी असल्याकारणाने ती अन्ननलिकेसाठी धोकादायक होती म्हणूनच ती लवकरात लवकर बाहेर काढण्याची गरज होती. तसेच एक्स-रे मध्ये ती घशामध्ये दिसत होती. परंतु ऑपरेशनला घेईपर्यंत ती अन्ननलिकेत गेली होती. त्यामुळे हे अति जोखमीचे ऑपरेशन डॉ. राजीव व डॉ.सीजा यांनी लीलया पार पाडले. तसेच सात महिन्याच्या बाळाला भूल देण्याचे अतिशय अवघड काम रुग्णालयाच्या भूल तज्ज्ञांनी कुशलतेने केले व ऑपरेशन नंतर लागणारे लहान मुलांचे आयसीयू याठिकाणीच असल्याकारणाने ऑपरेशन नंतरची रिकव्हरी सुखकर झाली. कान-नाक-घसा तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ अशा तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांनी सात महिन्यांच्या चिमुकलीला जीवनदान मिळाले. सद्यस्थितीत या चिमुकलीची प्रकृती उत्तम असून काही दिवसात तीला घरी सोडण्यात येईल.
अशा अति जोखमीच्या शस्त्रक्रिया यापूर्वी देखील वालावलकर रुग्णालयात झालेल्या आहेत. या ठिकाणी असलेले डॉक्टर व अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शस्त्रक्रिया या महात्मा फुले आरोग्य योजनेतून केल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवरील आर्थिक भार देखील कमी होत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका सुवर्णा पाटील यांनी सांगितले.
