नीटच्या परीक्षेला पुन्हा सामोरे जाणाऱ्यांसाठी

गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे तुमच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता, चीड आणि संताप अत्यंत स्वाभाविक आहे. दोन ते चार वर्षे अहोरात्र घेतलेली मेहनत, पाहिलेली स्वप्ने अचानक एका अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्यासारखी वाटत असेल.
तुम्ही स्वतःला एका ‘चक्रव्यूहात’ अडकल्यासारखे अनुभवत आहात, हे मी समजू शकतो. पण लक्षात ठेवा, चक्रव्यूह कितीही कठीण असला, तरी तो भेदण्याची
क्षमता व ऊर्जा तुमच्यातील ‘अभिमन्यू’कडे नक्कीच आहे. आणि हा अभिमन्यू त्या चक्रव्यूहात अडकणार नाही, तर तो यशस्वीपणे भेदून विजयी होऊन बाहेर पडेल, हा विश्वास स्वतःवर ठेवा.

​सिस्टीमच्या चुकांमुळे तुम्हाला पुन्हा
एकदा या ‘अग्नीदिव्याला’सामोरे जावे लागत आहे. एनटीए (NTA) किंवा एकूण परिस्थितीवर राग असणे साहजिक आहे, पण सध्याच्या घडीला आपला वेळ आणि ऊर्जा सिस्टीमशी लढण्यात वाया घालवण्यापेक्षा, जी परिस्थिती समोर आहे तिचा स्वीकार करून अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

एक मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) म्हणून, तुमच्या या प्रवासात तुमचा ताण कमी करण्यासाठी आणि तुमचे मानसिक मनोधैर्य उंचावण्यासाठी मी तुम्हाला २४ सुवर्णसूत्रे (Tips) सांगत आहे. या गोष्टी तुम्हाला या कठीण काळातून मार्ग काढण्यास नक्कीच मदत करतील.

माइंडसेट आणि मानसिक आरोग्य – (Mindset & Mental Health)
१.परिस्थितीचा स्वीकार करा-जे आपल्या हातात नाही (उदा. पेपर फुटी, सरकारी निर्णय, एनटीएचे नियम), त्यावर विचार करून ऊर्जा वाया घालवू नका. जे आपल्या हातात आहे. म्हणजेच तुमचा अभ्यास आणि तुमची मानसिकता. त्यावर १००% लक्ष केंद्रित करा.

२. स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा- तुमची २ ते ४ वर्षांची मेहनत कुठेही वाया गेलेली नाही. ज्ञान तुमच्या मेंदूत साठवलेले आहे. ही परीक्षा फक्त त्या ज्ञानाची ‘उजळणी’ आहे, नव्याने सुरुवात नाही.

३.भावनांना वाट करून द्या -मनात राग, भीती किंवा निराशा असेल, तर ती दाबून ठेवू नका. आपल्या पालकांशी, शिक्षकांशी किंवा जवळच्या मित्रांशी मोकळेपणाने बोला. मन हलके केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

४.अपयशाची भीती मनातून काढून
टाका- नीट परीक्षा हे तुमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय नाही, ती केवळ एक पायरी आहे. परीक्षेचा निकाल काहीही लागो, तुमचे अस्तित्व आणि तुमचे कर्तृत्व या एका परीक्षेपेक्षा खूप मोठे आहे.

५.सकारात्मक आत्मसंवाद (Positive Self-Talk)- रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, “मी हे करू शकतो/शकते. मी आधीही अभ्यास केला आहे, आताही पूर्ण ताकदीने लढणार आहे.”

अभ्यासाचे योग्य नियोजन (Study Planning & Strategy)
६. रिफ्रेश बटण दाबा, री-स्टार्ट करा- अभ्यासाची सुरुवात करताना ‘मी पुन्हा शून्याने सुरुवात करतोय’ असा विचार करू नका. तुम्ही आधीच ७०-८०% अंतर पार केले आहे, आता फक्त उरलेले अंतर कापायचे आहे.

७. कमकुवत दुव्यांवर (Weak Areas)
काम करा-मागील परीक्षेमध्ये ज्या प्रकरणांमध्ये किंवा संकल्पनांमध्ये तुमच्या चुका झाल्या होत्या, त्यांना आधी सुधारा. या अतिरिक्त वेळेचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी करा.

८.मायक्रो-प्लानिंग(Micro-Planning) करा-राहिलेल्या दिवसांचे लहान-लहान तुकड्यांमध्ये नियोजन करा. दररोजचे छोटे उद्दिष्ट (Daily Goal) ठेवा आणि ते पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी द्या.

९.मॉक टेस्ट आणि वेळेचे नियोजन-नियमितपणे वेळेचे बंधन लावून मॉक टेस्ट सोडवा. यामुळे परीक्षेचा ताण घेण्याची मेंदूची क्षमता वाढते आणि प्रत्यक्ष परीक्षेत भीती वाटत नाही.

१०. रिव्हिजनवर भर द्या-नवीन पुस्तके किंवा नवीन स्टडी मटेरियल वाचण्याच्या फंदात पडू नका. तुम्ही आधी जे वाचले आहे, त्याच नोट्स आणि एनसीईआरटी (NCERT) पुस्तकांची पुन्हा-पुन्हा उजळणी करा.

​शारीरिक आणि भावनिक समतोल (Physical & Emotional Well-being)
११.सोशल मीडिया डिटॉक्स (Social Media Detox)-सोशल मीडियावरील उलट-सुलट बातम्या, अफवा व नकारात्मक चर्चांपासून पूर्णपणे दूर राहा. या बातम्या केवळ तुमचा ताण वाढवतील, अभ्यास नाही.

१२.पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची-मेंदूला माहिती साठवण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपेशी तडजोड केल्यास चिडचिड वाढेल आणि एकाग्रता कमी होईल.

१३. योग्य आहार आणि हायड्रेशन- सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. जंक फूड टाळा. शारीरिक स्वास्थ्य चांगले असेल तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

१४. लहान विश्रांती (Short Breaks)-सतत तासनतास अभ्यास करू नका. दर ५० ते ६० मिनिटांच्या अभ्यासानंतर ५-१० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. यात थोडे चाला किंवा दीर्घ श्वास घ्या.

१५. व्यायाम व ध्यान (Meditation)-दिवसातून किमान १५ ते २० मिनिटे हलका व्यायाम करा किंवा प्राणायाम/ध्यान करा. यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स (Endorphins) तयार होतात आणि ताण कमी होतो.

​अपेक्षा व वास्तव (Expectations & Reality)
​१६. स्वतःची तुलना इतरांशी करू नका-प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची आणि ताण हाताळण्याची पद्धत वेगळी असते. तुमचा लढा फक्त स्वतःशी आहे, इतर कोणाशीही नाही.

१७.परिपूर्णतेचा (Perfectionism)अट्टाहास नको- प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे असे नाही. १००% गुण मिळवणे आवश्यक नाही, तर उपलब्ध वेळेत सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे आहे.

१८.पालकांशी संवाद साधा- पालकांनाही तुमच्या मानसिक स्थितीची कल्पना द्या. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, दबावाची नाही.

​लढण्याची वृत्ती व भविष्याचा दृष्टिकोन (Resilience & Future Outlook)
​१९. हा एक अनुभव आहे, शेवट नाही-या संपूर्ण प्रक्रियेकडे ‘संकट’ म्हणून न पाहता एक ‘अनुभव’ म्हणून पहा. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके खंबीर बनवेल की भविष्यात तुम्ही एक उत्तम आणि धीरोदात्त डॉक्टर व्हाल.

२०. प्रक्रियेचा आनंद घ्या (Enjoy the Process)-अभ्यासाचा बोजा वाटू देऊ नका. तुम्ही डॉक्टर का बनू इच्छिता, त्या मागची तुमची जिद्द आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दलचे प्रेम आठवा.

२१. पर्यायी मार्गांचा विचार मनात असू द्या(Plan B)-मनात एक सुरक्षितता असू द्या की, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत. यामुळे परीक्षेचे अनावश्यक दडपण कमी होते.

२२.लहान यशाचा उत्सव साजरा करा- जेव्हा एखादा कठीण टॉपिक समजेल किंवा टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळतील, तेव्हा स्वतःचे कौतुक करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

२३.आव्हानाचा स्वीकार करा- मनाशी पक्के करा.”सिस्टीमने माझ्यासमोर आव्हानाचा डोंगर उभा केला आहे ना? मग मीही तो पार करून दाखवणारच!” तुमची ही जिद्दच तुम्हाला जिंकून देईल.

२४. लक्षात ठेवा, तुम्ही एक योद्धे आहात-दोन-चार वर्षे टिकून राहणे ही साधी गोष्ट नाही. तुम्ही आधीच या लढाईत स्वतःला सिद्ध केले आहे. हा शेवटचा टप्पा आहे, गाठ गाठायचीच आहे!

निकाल काय लागेल, कट-ऑफ काय असेल, याचा विचार आता करू नका. पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणे एवढेच आता आपल्या हातात आहे. ही परीक्षा तुमच्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा आहे. डगमगू नका, खचू नका. तुम्ही या आधीही स्वतःला सिद्ध केले आहे आणि या वेळीही तुम्ही या अग्नीदिव्यातून तावून सुलाखून अधिक चमकदार होऊन बाहेर पडाल.

चला, पुन्हा एकदा कंबर कसा आणि आत्मविश्वासाने या चक्रव्यूहाचा वेध घेण्यासाठी सज्ज व्हा! संपूर्ण वैद्यकीय जगताला तुमच्यासारख्या खंबीर डॉक्टरांची गरज आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद..!!
– डॉ. रुपेश धुरी, (कुडाळ) मानसोपचार तज्ज्ञ

Leave a Reply