एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण

    शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आणि शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने मराठी युवकांना लॉजिस्टिक्स क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स’ यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
           हा प्रशिक्षण उपक्रम Federation of Freight Forwarders’ Associations in India, त्यांची शैक्षणिक शाखा Indian Institute of Freight Forwarders आणि स्थानीय लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. दोन महिन्यांच्या या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, कस्टम्स, फ्रेट फॉरवर्डिंग, शिपिंग तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील विविध विषयांचे सखोल सैद्धांतिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले.
     प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देशातील नामांकित लॉजिस्टिक्स कंपन्यांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग देण्यात आले. याशिवाय अनेक आघाडीच्या कंपन्यांनी प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मराठी युवकांसाठी जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात करिअर घडविण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.
              यावेळी FFFAI चे अध्यक्ष  अमित कामत, माजी अध्यक्ष दुष्यंत मुलाणी, विशेषतः कोलकाताहून उपस्थित राहिलेले FFFAI चे सचिव सुदीप डे, IIFF चे अध्यक्ष तेज कॉन्ट्रॅक्टर, FFFAI चे सल्लागार शांतनू भडकमकर, अखिल महाराष्ट्र लॉजिस्टिक्स फोरमचे अध्यक्ष शंकर हळदणकर, मनोहर पटाये, विरेन दयाल, चैताली मेहता, वरद अपराज, सुरेश कदम, निखिल कदम, मंगेश कांबळी, सचिन नाईक, अजिंक्य ह्याळीज आणि अजय यांचा उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याचबरोबर या अभ्यासक्रमासाठी अध्यापन करणारे तज्ज्ञ, प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे समन्वयक, प्रशिक्षक आणि सहकारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
मराठी युवकांसाठी अशाच प्रकारची एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स प्रशिक्षणाची पुढील बॅच लवकरच शिवसेना भवन येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
         मराठी युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य, रोजगार आणि उद्योगविश्वाशी थेट जोडणारा हा उपक्रम शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त साकारलेला एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरला असून, मराठी युवकांच्या रोजगारक्षमतेला नवी दिशा देणारा आदर्श प्रकल्प म्हणून त्याची व्यापक दखल घेतली जात आहे.

Leave a Reply