शाळेतील संस्थात्मक विलगीकरणावरुन तणाव

शाळा व्यवस्थापन समिती व वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात न घेता भटवाडी शाळा नं.२ येथे रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केल्याबद्दल येथील नागरीकांनी रोष व्यक्त केला. तसेच नोडल अधिकारी यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत निवेदनाद्वारे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे लक्ष वेधले असून यापुढे भटवाडी नं.२ यासह अन्य वस्तीलगतच्या शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी वापरण्यात येऊ नये. तसेच न.प.प्रशासन कर्मचा-यांनी वॉर्ड नियंत्रण समिती व शाळा व्यवस्थापन समितीशी समन्वय ठेवावा असे त्या निवेदनात म्हटले आहे.

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार रेड झोनमधून वेंगुर्ला शहरात येणा-या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी वेंगुर्ला-भटवाडी शाळा नं.२ही शाळा नगरपरिषद कार्यालयाकडून ताब्यात घेण्यात आली असून त्याबाबत न.प. प्रशासनाकडून शाळा व्यवस्थापन समिती तसेच वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात घेतलेले नाही. मुख्य म्हणजे ही शाळेची इमारत भर लोकवस्तीत असून शाळेला लागूनच अनेक निवासी घरे आहेत. त्यात लहान मुले व वृद्ध नागरीकांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी रेड झोनमधून आलेल्या व्यक्ती विलगीकरणासाठी ठेवल्यास या परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका अधिक आहे. तसेच शाळेच्या इमारतीत नागरीकांनी लोकवर्गणीतून जमा केलेले संगणक, लॉकर, प्रोजेक्टर, इन्व्हर्टर, कपाट या सुविधा आहेत. या वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी विलगीकरणातील व्यक्ती घेणार आहेत का? असा प्रश्नही या निवेदनातून प्रशासनाला विचारण्यात आला आहे.      

       या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीमा मराठे, उपाध्यक्ष वैभव सावळ, माता पालक संघ अध्यक्ष निधी गावडे, लोकप्रतिनिधी प्रशांत आपटे, पालक वृषाली गंगावणे, रवी शिरसाट, विशाल सावळ यांच्यासह २१ जणांच्या स्वाक्ष-या आहेत. या शाळेच्या व्यवस्थापन समितीने संस्थात्मक विलगीकरणासाठी वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, पाटकर हायस्कूल, आयटीआय कॉलेज, बॅ.खर्डेकर महाविद्यालय तसेच रामघाट रोडवरच्या म्हाडाच्या नविन बांधकाम झालेल्या जवळजवळ २०० ते ३०० रुम, टेलिफोन ऑफिसजवळील कर्मचा-यांसाठीचे बांधलेले अपार्टमेंट आदी जागा सुचविल्या आहेत.

        नगराध्यक्ष यांनी समितीने सुचविलेल्या पर्यायी व्यवस्थांचा विचार करत असून त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Reply

Close Menu