आयुष्यातले काही क्षण असे असतात की जे सदैव आपल्या आठवणीत घर करून राहतात. त्या क्षणांचा आवाका एवढा प्रचंड असतो की त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. काहीतरी नवं करण्याची एक नशा चढते. आपलं भविष्य एका वेगळ्या वळणावर न्यायला असेच काही सोन्याचे क्षण कारणीभूत असतात. काही वेळा हे क्षण सोन्याचे असतात तर काही वेळा दगड-धोंड्याच्या, चिखल-मातीच्या आडवाटेवरून कुठल्यातरी अनोख्या काळोख्या दुनियेत भेटलेले असतात. पण तरीही त्यांचं मोल सोन्याहून कमी कधीच नसतं. खरंतर असेच आडवाटेवरून ठोकर खात चालताना भेटलेले दोन सुखाचे क्षण सोन्याच्या चकाकीलाही लाजवणारे भासतात. त्यांचं मोल पैशात नसतं, सोन्यातही नसतं. त्याचं मोल फक्त आपल्या काळजात असतं. कारण काळजाला पडलेली काजळी मिटवून त्यावर प्रेमाचा लख्ख मुलामा देणारे हे क्षण असतात. हे क्षण कधीच कॅमे-यात पकडता येत नाहीत. सहजासहजी कागदावर मावले जात नाहीत. की कुणा कलाकाराला कुंचल्यातून ते रंगांत अवतरता येत नाहीत. त्याची अनुभूती होते ती फक्त त्याच ठिकाणी. त्या क्षणांच्या गंगोत्रीजवळ.

     तर असेच काही क्षण माझ्याही मनात घर करून राहिलेत. त्यांचं अस्तित्व मला रोज कोणत्या ना कोणत्या रुपात खुणावत असतं. काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा देत असतं. त्यापैकीच काही क्षण मला भेटले होते, मेळघाटच्या त्या आदिवासी पाड्यात. जिथं जगणंही टाहो फोटतं आणि श्वासही दोन घासांसाठी तळमळून विव्हळतो तिथंचं, त्याच स्मशानघाटात, मेळघाटात. निमित्त होतं ते डॉ. रवि कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी आयोजित केलेल्या ‘ तरुणाई शिबिराचं’. संपुर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेरूनही जवळजवळ दोनशे शिबिरार्थींची निवड या आगळ्यावेगळ्या शिबिरासाठी केली जाते. आगळंवेगळं यासाठी की चार भिंतींचं जग सोडून इथं बिनभिंतींच्या जगात राहायचं असतं. कधीही न पाहिलेलं यांचं जगणं, हा इथला गुढ साद घालणारा एकाकी निसर्ग अगदी जवळून, त्यांच्यात मिसळून पाहायचा असतो. आठ दिवस त्यांच्यातलाच एक होऊन जगायचं असतं. आयुष्यातला एक निराळा अनुभव असतो हा. तो अनुभव मला घेता आला आणि सोन्याचा खजिनाच मिळाला. मेळघाटचे आईवडिल असणारे डॉक्टर दांपत्य आमचेही आईवडिल कधी बनलेत तेही कळलं नाही. या आठ दिवसांत अनेक आठवणीतले क्षण मिळालेत. ते कायम स्मरणात राहतीलच. पण त्यातही एक क्षण असा होता जो काळजातल्या माणुसकी नावाच्या संज्ञेची सारी व्याख्याच बदलवून टाकणारा होता. तो क्षण आजही आठवला की मनाची सारी कवाडं धाड्कन उघडली जातात आणि त्यात लपून बसलेल्या साऱ्या चित्तार कथा आपलं सार चव्हाट्यावर येऊन मांडतात.

    ते दिवस हिवाळ्याचे होते आणि तेही मेळघाटातल्या हिवाळ्याचे होते. एव्हाना पहाटेचे पाच वाजले होते. डिसेंबरची हाडं गोठवणारी थंडी मी म्हणत होती. थंडीचा अवाका एवढा प्रचंड होता की अंगात दोन-तीन स्वेटरं चढवली तरीही सारं शरीर गोठून बर्फ झाल्यासारखं वाटतं होतं. अजून सारा काळोखच भरून राहिला होता. या आदिवासी पाड्यात कित्येक शतकं भरून राहिलाय अगदी तसाच. उगवतीलाही अजून गच्च काळोख. रविराज क्षितिजावर यायला अजून अवधी होता. पण या मेळघाटच्या अवनीवरचा ‘रवि’ कधीच उगवला होता. आपल्या अंगच्या कार्याच्या तेजानं आम्हालाही ऊब देत होता. मग आम्हीही झपाट्यानं कामाला लागलो. आज एक वेगळं काम करायचं होतं. प्राणायाम, व्यायाम सारं अगदी चोखपणे करून झालं. कारण मार्गदर्शक खुद्द आमच्या स्मिता मामी होत्या. मग नाश्ता झाला आणि सारी आवश्यक ती तयारी करून आम्ही सारे आमच्या नव्या मिशनसाठी रवाना झालो. मिशन होतं, ते या आदिवासी लोकांच्या पाड्यात जावून त्यांच्यातलाच एक बनून जाणं. त्यांचं मन आणि त्यांचं जगणं जाणून घेणं. रस्त्यानं घोषणा देत साफसफाई करत काही वेळातच आमचा चमू या पाड्यात दाखल झाला.

     दुनी. साधारण दोन-तिनशे वस्तीचं एक लहानसं गाव. सरकारच्या नकाशावर असेल की नसेल तेही माहित नाही. कोलुपुरहून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर. सिपनाचा पुल ओलांडून पलिकडं आलं की या गावाची वेस लागते. गावात मुख्यतः कोरकू जमातीचे लोक मोठ्या संख्येनं राहतात. त्यानंतर गोंड समाजाचे लोक. याशिवाय मुसलमान, ख्रिश्चन आणि काही प्रमाणात नवबौद्ध समाजाची वस्ती या गावात आढळते. कोरकू समाज बहुसंख्य असला तरिही सारे अधिकार इकडच्या मुसलमान लोकांकडेच. कारण गुलामीचं मूळ आणि सत्तेचं बी हे पैशातच रुजलंय. पण गाव अगदी  निसर्गसौंदर्यानं बहरलेलं. फुललेलं. सिपनाच्या पाण्यानं इथं माणुसपण रुजवलेलं. तसं बघायला गेलं तर सारा मेळघाटच निसर्गानं आपल्या  खास कुपीतून रेखाटलेला आहे, असाच दिसतो. पण  तरिही येथे कुपोषणाचा राक्षस का बळावला, ते एक गुढच. तर अशा या गावात आमची सारी ‘तरुणाई टिम’ येऊन पोहोचली. गाव कसला तो एक आदिवासी पाडाच होता. पत्र्यांची, अर्धी मातीची, झाडांनी शाकारलेली घरं. बांबूच्या तट्ट्यांवरती शेणा-मातीचा गिलावा काढलेला आणि त्याच्या भिंती उभ्या केलेल्या. माडाच्या झावळांनी शाकारलेल्या छपरांच्या अर्ध्या कोसळलेल्या झोपड्या. एखादा भूकंप होऊन मातीत मिसळून जाव्यात अगदी तशाच. आताशी कुठं उगवतीला लाली आली होती. पाखरांचा एक थवा आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडला होता. त्यांचा कोलाहल एक वेगळीच धून आळवत होता. कदाचित ‘मित्राच्या’ आगमनानिमित्त भूपाळीच गात असावा. आता कुठं थोडंसं ऊन पडलं होतं. पण हवेत गारवा अजूनही तसाच होता. दिवसभर तो असाच असतो. मी सारं काही डोळ्यात खोलवर साठवत पुढे चालतच होतो. उगवतीनं फेकलेल्या त्या कोवळ्या उन्हात काही म्हातारी माणसं, लहानं पोरं शेकत बसली होती. काही जण आपल्या शेळ्या घेऊन रानात जात होते. काही शेळ्या तिथंच दावणीला चरत होत्या. एक कोरकू आपली बैलजोडी घेऊन शेतात नांगरणीला जात होता. काही लंगोटी नेसलेली लहान पोरं तिथं मातीतच गोट्यांचा डाव खेळत होती. दूरवर दिसणारी मराठी आणि ऊर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आपली दारं-कवाडं बंद करून कुठल्यातरी ऊबेसाठी आसुसली होती. बाजूलाच सिपना मंदपणे वाहत होती. तिचा तो  मंजूळ आवाज वातावरणात प्रसन्नता आणत होता. काही माणसं नदीकडून गावात परतत होती. माझ्यापासून काही अंतरावर ‘सुलभ शौचालय’ असं ठळक अक्षरात लिहिलेला एक लाकडी बोर्ड तुटून मातीत पडला होता. संडासाचं भांडं काही झाडांचा आसरा ठरलं होतं. आडोशाचा काही प्रश्नच नव्हता. कारण तिथं आडोशाचा कधी जन्मच झाला नव्हता. नाही म्हणायला एक कागद तिथं कधीतरी होता, असं म्हणतात. पण सध्या त्याचं अस्तित्व शून्यच आहे. काही बड्या असामींच्या घरी जाण्यासाठी अगदी लख्ख सिमेंटचे रस्ते होते. तर आदिवासी पाड्यात जायला एक साधीशी पायवाट अन् तिही दगडधोंड्यांत आणि खड्ड्यांतच अडकलेली. आम्ही गावात पाऊल ठेवलं आणि सारी लोकं एखादं जनावर घरात घुसावं तशी बाहेर पडली. ‘आता हे कोण नवीन पाहुणे ? आता कोणती बरं नवी निवडणूक आलीय ?’ असंच म्हणत असतील ते. कारण अशा नव्या पाहुण्यांचं आगमन या पाड्यांत फक्त निवडणुकीच्या दिवसांतच होतं. मग निवडणूक झाली की परत दुष्काळ… आम्हाला पाहून एक लहान मुलगा धावतच जावून आपल्या आईला म्हणाला, “अम्मा, जांगडी आयो, जांगडी.” जांगडी म्हणजे जो मेळघाटमध्ये जन्माला आला नाही तो. अर्थात कोणीतरी परका, उपरा माणूस.

     आमच्या गावात येण्यानं सारा परिसर गाण्यांनी आणि घोषणांनी दणाणून गेला. लहान पोरं डोळे किलकिले करून आम्हालाच पाहत होती. बाकीची लोकंही कुतूहलानं सारं पाहत होती. खरंतर तीही माणुस होती अन् आम्हीही. पण काहीतरी उणिव लख्ख दिसत होती. त्यांच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होती. खरंतर त्यांचे कपडे, त्यांचं राहणीमान आमच्यापेक्षा वेगळचं होतं, म्हणून असेल कदाचित. आम्ही काही वेळातच आम्हाला दिलेलं काम पूर्ण केलं आणि आमच्या खऱ्या कामाला लागलो. गावात घरं तशी फारशी नव्हतीच. पण आम्हाला तेवढीच पुरेशी होती. प्रत्येकानं आपलं एक घरं निवडलं आणि आमचा तांडा त्या एका अंधाराच्या दिशेनं निघाला.

     दगडधोंड्यांतून कसाबसा रस्ता शोधत एका घरासमोर मी येऊन थांबलो. घर फक्त म्हणायला होतं. त्याची अवस्था गुरांच्या गोठ्यासारखीच होती. दारासमोर एक शेळी बांधलेली होती. बाजूलाच तिचं कोकरू आईच्या कुशीत झोपलं होतं. मला बघताच तिने कान टवकारले आणि खडबडून उठली. तिचं ते खडबडणं ऐकून आतल्या खोलीतून एक बाई ‘कोण है रे चंद्रे’. असं म्हणत बाहेर आली. असेल साधारण पन्नास पंचावन्न वर्षांची. ‘हम ही है काकी. पासही के कोलुपुरसे आए है. डाक्टर कोल्हे के यहाँ से. थोडासा पाणी मिलेगा क्या ?’ मी म्हणालो. ती थोडी अडखळत चालत माझ्यासमोर आली आणि डोळ्यांच्या खोबणीतली पांढरी पडलेली बुब्बुळं माझ्यावर फिरवत म्हणाली, ‘ तुम लोग जांगडी है ना. क्या काम से यहाँ आए हो ? किसी पार्टी के हो तो यहाँ से चले जाव. यहाँ कुछ नही मिलनेवाला.’ तिचा आक्रोश तिच्या बोलण्यातून अगदी साफ दिसत होता. डोळ्यांनी जरी ती अधू असली तरी मनानं ती अतिशय खंबिर होती. राजकारणानं केलेला विश्वासघात, त्यांना दिलेला दगा तिच्या डोळ्यातून अंगाऱ्यासारखा पेटला होता. मी तिला कोण, का आलो, कोठून आलो ते सारं सांगितलं. तिच्या मनाची खात्री पटली आणि तिनं मला घरात यायचं आमंत्रण दिलं. पाण्याचा एक तांब्या भरून आणला आणि म्हणाली ‘आरामसे पिओ’. मी पाणी पिलं. एक प्रेमाचा गोडवा जाणवला त्यात. तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं. ज्या दारातून मी आलो होतो, त्या दाराला कवाडंचं नव्हती. आडोसाच नव्हता. त्याच नव्हे कोणत्याच दाराला नव्हता. मी तिला विचारलं, तर ‘क्यो चाहिए ? क्या है घरमें ? क्या रखा है इस तुटे हुए झोपडी में ?’ हे तिचं उत्तर. तिचं खरंच तर होतं, काय होतं त्या फाटक्या संसारात शिवण्यासारखं ? उसवून उसवून धागे अगदी जीर्ण झाले होते. थोडंसं ओढलं तरी त्याच्या चिंध्या झाल्या असत्या. तिचा नवरा तिथंच एका कॉटवर पडला होता. दोन वर्षापासून तो अगदी तसाच पडलाय. तिथेच. दोन वर्षांपूर्वी तो रानात आपल्याच झाडांची सुकलेली लाकडं आणायला गेला होता. तो लाकडं घेऊन परतत असताना गावातीलच काही बड्या लोकांनी त्याला चोर समजून मरेपर्यंत चोपला आणि घरासमोर आणून टाकला. कसातरी या बाईनं त्याला मरणापासून वाचवलं पण तो कायमचा ताप घेऊन पडून राहिला तो आतापर्यंत तसाच पडलाय. त्याच कॉटवर. केवळ कुंकवाचा आधार बनून. आता घरचं सारं हिच पाहते. आपल्या हातून जे होतंय ते सारं करते. मनाला कसंतरी मारता येतं पण पोटं विव्हळतं त्याचं काय ? घरात तसं फार काही नव्हतंच. चार दोन कपड्यांचे जोड, एक जुनी पुरानी ट्रंक, एका कोपऱ्यात भाजी वगैरे आणून ठेवलेली, त्याच्याच दुसऱ्या टोकाला लाकडांची एक मोळी आणि त्यालाच खेटून थपकन घालून बसलेली एक जुनाट, वयोवृद्ध चूल. कधी ढेपाळून जाईल ते सांगता यायचं नाही. अचानक दुसऱ्या एका कोपऱ्यात नजर गेली. तर तिथं भिंतीलाच टांगलेला एक देव्हारा होता. त्यात काही देवांच्या मूर्त्या आणि तसबीरी होत्या. तिला विचारलं, ‘आप हिंदू हो ?’ ‘हा हम हिंदू है. हम गणपती लाते है. इकठ्ठा होकर त्योहार मनाते है. होली मे ढोलक बजाकर नाचते-गाते है. चतुर्थीका उपवास रखते है.’ ती अगदी मनातून बोलत होती. खुप वर्ष हे सारं भरभरून बोलण्यासाठीच तहानली होती, असंच वाटत होतं. तिला तिचं नाव विचारलं. ‘या जुमू जानुबाई सखाराम भिलावेकर.’ तिनं सांगितलं. (कोरकू भाषेत ‘या जुमू’ म्हणजे माझं नाव. मध्यप्रदेशच्या सिमेवर असल्यानं त्यांच्या बोलण्यात हिंदीचा सर्रास वापर असतो. पण मराठी तशी कच्चीच इथं.) ती अगदी मनमोकळी होऊन बोलत होती. मीही कान देऊन ऐकत होतो. जो गुन्हा त्यांचा नसतोच तो त्यांच्या शिरावर थोपला जातो. अनेकदा तो कबूल करून घेण्यासाठी फॉरेस्टवाले, पटेल, कोतवाल लाथाबुक्क्यांचा मार देतात. इथे अजून लाईट आलीच नाहीय. मग बाजूच्या खांबावरून लाईट चोरून घ्यावी लागते. घरची अवस्था तर पार मोडकळीस आल्यासारखी. कधीतरी नेते येतात. आश्वासनं देतात आणि निवडून आले की पुढची पाच वर्ष इकडचं तोंड पाहत नाहीत. रोजगाराची हमी फक्त कागदावर. तो पैसा पटेलच खातो. नवीन जन्माला आलेलं पोरं जगलं तर आपलं नाहीतर देवाचं म्हणून सोडून द्यायचं. अशी तिची चार मुलं पहिला वाढदिवस बघायच्या आधीच देवाघरी गेली. दरहजारांतली तिनशे मुलं पहिला वाढदिवस पहायच्या आधीच मृत्यूमुखी पडतात. तसंच मातामृत्यूचंही प्रमाण फार मोठं आहे, असं मी देखिल मेळघाटविषयी ऐकून होतो. परंतु डॉ. कोल्हे सरांच्या इथं येण्यानं ते प्रमाण आता चाळीसपर्यंत कमी झालंय हेही एक सत्य आहे. इकडची लोकं अंधश्रद्धाळू नाहीत तर ती परिस्थितीनं गांजली होती. ‘जब यहाँ कोई डॉक्टरही नही तो हम भगत के पासही जाऐंगे ना.’ असं तिचं म्हणणं. पण जेव्हापासून डॉक्टर इथं आले तेव्हापासून भगताचं नामोनिशान मिटायला सुरुवात झाली परिणामी कुपोषणाचंही. आता सारेजण वैद्यकीय उपचारच घेतात. गावात शाळा आहे. तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत आहे. आणि जातपंचायतीला तर कधी मरणचं नाहीय. तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत फक्त बुधवारीच उघडते आणि शाळा मास्तर आला की. तो कधीतरीच वेळ भेटला तर येतो.  बहुतेक तर बदली करून घेतात नाहीतर पळून तरी जातात. पण हल्ली थोडंसं व्यवस्थित चाललंय. गावात गॅस  आलेत. लाईटही येऊ लागलीय असं म्हणतात, पण इकडे कायमचा अंधाराच. गावात काही नवं सांगायचं असलं की दवंडी पिटली जाते. ‘आमच्या लग्नात नवरा मुलगा नवऱ्या मुलीला पैसा देतो. थोडंसं गूळ हातावर ठेवलं की आहेर मिळाला. तसंचं जी विधवा असते किंवा नवऱ्यानं सोडलेली असते तिचा परत विवाह करता येतो. त्याला पाट लावणं असं म्हणतात. माझंही लगिन पाट लावूनच झालंय,’ असं तिनंच सांगितलं. फार वर्षांपासून दाबून ठेवलेला हुंदका आज बाहेर पडला होता.

     तेवढ्यात तिचा मुलगा धावतच घरात आला. साधारण दहाएक वर्षांचा. मला समोर बघून थोडासा बुजल्यासारखाच झाला. त्याच्या आईनं त्याच्या चाहुलीनचं त्याला ओळखलं. डोळ्यातले अश्रू पुसत ती त्याला जवळ घेत म्हणाली. “ये मेरा लडका. चौथीमें है. पढता है. हम तो कुछ सिखे नही. लेकिन मेरे रामा को मै पढाऊंगी. उसे मराठीभी आती है.” मी त्याला जवळ बोलावलं. तो लाजत घाबरत बाजूला येऊन उभा राहीला. त्याला नाव विचारलं. त्यानं सांगितलं, ‘रामफळ सखाराम भिलावेकर.’ नाव ऐकून सुरुवातीला खरंच थोडं हसू आलं. असं कोणाचं नाव असतं ‘रामफळ’. पण लगेच वास्तवाची जाण झाली आणि माझीच मला लाज वाटली. ज्या समाजाला कित्येक वर्ष असंच लुबाडलं जातं, वेळ पडल्यास ज्यांचा गळा घोटून खाल्लं जातं, त्यांना हेच नाव योग्य. ‘रामफळ’. रामफळ चौथीत आहे. पण त्याची जिद्द अफाट आहे. त्याला शिक्षक व्हायचंय. खुपखुप शिकायचंय. मलाही खुप भरून आलं. तेवढ्यात ती माऊली एका जर्मनच्या ताटात एक भाकरी आणि लसणासा नि शेंगदाण्याचा झक्कास असा ठेचा घेऊन आली. एका हक्काच्या वाणीनं मला थांबवत म्हणाली, ‘अरे बेटा, गरीब के घरका ये थोडासा खा लेना. इस माँ को अच्छा लगेगा.’ ऊर भरून आला. माणुसकी अशी चराचरात भरून राहिलीय. फक्त ती शोधायला आपल्यात माणुसकी पाहिजे. याची जाणीव मनात सुखाचे डोह भरून गेली. मलाही त्या माणुसकीची चव चाखायचीच होती. म्हणून मीही ‘हा ना माँ जरूर. मुझे अच्छाही लगेगा.’ असं म्हणत त्या भाकरीचा अन् ठेच्याचा आस्वाद घेतला. खरंच या मायेच्या हातची चव खुपच गोड होती. भाकरी खावून मी मागच्या दारी हात धुण्यासाठी आलो. तर तिथे एक साधारण पंचवीशीतली मुलगी धुणी धुत होती. मला तिथं पाहताच ती लाजून तिथून आतल्या खोलीत पळाली. मला काही समजलचं नाही. मग त्या बाईंनीच सांगितलं की ती मुलगी तिथं कपडे धुण्याचं काम करते. बिचारी मुकी आहे. बोलता येत नाही. पण पाचवीपर्यंत शिकलीय. हल्लीच तिचं लग्न ठरलंय. त्या बाईंनी तिला बाहेर बोलावलं. ती दाराआडून बाहेर आली. जसा पुनवेचा चांद ढगाआडून उगवावा तशी. तिच्या चंदेरी चेहऱ्यावरचं हसू तिच्या साऱ्या पिढ्यांना दुःख विसरायला लावणारं होतं. म्हणूनच की काय तिचं नाव ठेवलं असावं, ‘सुस्मिता’. तीला कंठ दिला नसल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर कधीच नव्हतं. होती फक्त एक स्मितरेषा, सारं दुःख विसरून नवं जगणं जगायला शिकवणारी.

     आतासा खुपच वेळ झाला होता. आम्हाला परत कोलुपुरलाही परतायचं होतं. मी त्या तिघांचाही निरोप घेतला. पाय तिथून उचलत नव्हते. पण गत्यंतर नव्हतं. त्या मायेच्या पाया पडून मी निघालो. तेव्हा तिच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू स्पष्ट दिसत होते. मी रामफळला बाहेर बोलावलं. त्याचं एक पेन मला द्यायला सांगितलं. त्यानेही काही आडकाठी न घेता आपलं आवडतं पेन मला दिलं. मी ते माझ्या एका खिशात ठेवलं आणि दुसऱ्या खिशातून माझं नवं कोरं आवडतं पेन काढून त्याच्या हातात दिलं आणि म्हणालो, ‘खूप शिक रामफल. आणि तू जे काही करशील ते रोजच्या रोज या पेनाने लिहत जा. लेखकाची लेखनी हेच मोठं शस्त्र असतं हे ध्यानात ठेव. मग बघ, एक दिवस या रामफळाचं मोठं झाडं झालेलं दिसेल.’ त्याच्या डोक्यात किती गेलं, ते मला माहित नाही. पण एक वेगळीच चकाकी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यानं इतरांसारखंच मातीत मिसळून जावं, असा मला वाटत नव्हतं. मी मग तसाच मागे फिरलो. कोलुपुरला परत आलो. काही दिवसांत शिबिरही संपलं आणि पुन्हा सारे आपआपल्या घरट्यात परत गेले.

     मीही परत घरी आलो. शिबिर संपलं होतं. पण माझ्या मनात तो सोन्याचा क्षण अजूनही तसाच आहे. तो प्रसंग आठवला की मनात काहीतरी भिरभिरत राहतं. कसलीतरी अनाहूत ओढ, काहीतरी करत राहण्याची प्रेरणा सातत्यानं अस्वस्थ करत राहते. कधीतरी खूप खचून गेल्यासारखं वाटतं, तेव्हा मी ते रामफळनं दिलेलं पेन बाहेर काढतो. मग मला ती जानूबाई आठवते. तिचं प्रेम, धडपड जाणवते. रामफळची अफाट जिद्द नवी प्रेरणा देऊन जाते. आणि सुस्मिताच्या गोड चेहऱ्यावरचं मंद स्मित सारा वाईट, पराभवाचा इतिहास विसरवून नवं यशाचं भविष्य रेखाटायचं बळं देऊन जातं. आणि मग सिपनाच्या काठावर बसून माझंच मन मला खुणावतं,  ‘ ए… जांगडी आयो रे, जांगडी…                                                -श्रेयश अक्षया अरविंद.  9404917814

Leave a Reply

Close Menu