विश्वचषक आणि आम्ही

आमच्यावेळी कॉलेज अगदी वेळेवर सुरु व्हायचं आणि दरवर्षी परत एकदा अॅडमिशन-फॉर्म भरुन फॉरमॅलिटीज पूर्ण कराव्या लागायच्या, म्हणून २ दिवस आधीच कॉलेजमध्ये जावं लागे. दुसरंच वर्ष होतं कॉलेजचं आणि सावंतवाडी मधलं! मी सुट्टी संपवून मालवणहून जरा वैतागूनच वाडीला आलेले, आरतीही शिरोड्याहून आलेली! १९८३ जूनचा दुसरा आठवडा!! त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे विश्वचषक स्पर्धा चालू होणार होती. आम्ही ज्या मावशींकडे पेईंगगेस्टम्हणून रहायचो, त्यांचा ट्रांझिस्टर रात्री आमच्याकडे असायचा. त्यामुळे कॉमेंट्री तरी ऐकता येणार होती. त्यावेळी सावंतवाडीत अजून घरोघरी टिव्ही नव्हते आणि होते त्यांच्या कडेही नीट दिसायचे नाहीत. सगळे सामने इंग्लंडमध्ये असल्याने आपल्या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ नंतर सुरु व्हायचे. आपली मॅच असली की आम्ही एक इनिंग तरी एम.व्ही.सरांकडे बघायला जायचो. खूप जणांमध्ये बघायला मजा यायची (आता विचार केला तर वाटतं बावळट होतो आम्ही, सरांकडे कसं जायचं, त्यांना डिस्टर्ब तर होणार नाही असा विचारही मनात यायचा नाही). उरलेल्या मॅचेस घरीच रात्री हळू आवाजात ट्रांझिस्टरवर ऐकायचो.

                पहिल्या काही मॅचेस कॉलेज सुरु व्हायच्या आधीच झाल्या, नंतरच्या मॅचेसची चर्चा दुस-या दिवशी कॉलेजमधे मस्त रंगायची. या चर्चेत मुली कमीच असायच्या. पण मला आणि आरतीला खूप मजा यायची. त्यात गावस्कर आणि रवी शास्त्री वाईट खेळले की आम्हां दोघींना सगळे खूप चिडवायचे. आम्हाला पहिल्यावर्षी फिशपाँडही गावस्कर आणि शास्त्रीची जोडीअसा पडलेला. त्याचा खरंतर त्या दोघांशी किवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नव्हता. फक्त आमच्या दोघींच्या उंचीत तसा फरक होता एवढंच! मी तर गावसकरची फॅन आधीपासूनच होते. पण रवी शास्त्री नवीनच होता आणि दोघींच्याही एवढा आवडीचा नव्हता. संदीप पाटीलही मला नुकताच आवडायला लागलेला. वेंगसरकर आवडीचा होताच. त्याचं पोर्ट्रेटही काढलेलं मी! तर सांगायची गोष्ट म्हणजे दिवस पुढे सरकत होते कभी हार कभी जीतअसा भारताच्या संघाचा खेळ चालू होता. जेव्हा आपला संघ करो या मरोया प्रसंगाला तोंड देत उपांत्य फेरीत जाऊन धडकला, तेव्हा आमचं स्फुरण आणि उत्सुकता शिगेला पोचली होती. कॉलेज नुकतंच सुरु झाल्याने अजून फुलफ्लेज लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स होत नव्हती. तेही आमच्या पथ्यावरच पडलं. एकदा तर कॉलेजवरुन परस्पर न खातापिताच सरांकडे मॅच पहायला गेलो. अटीतटीचे सामने आणि समोरच्या संघांचा आत्मविश्वास भलताच, त्यामुळे घाबरत घाबरतच अर्धी मॅच बघायची. मग मनात नसताना मावशींकडे परतायचं. रात्रीचं जेवण आटपलं की ट्रांझिस्टर ताब्यात घ्यायचा. रेडिओवर ऐकताना उत्सुकता वेगळीच असायची कारण शब्दनशब्द कान देऊन ऐकायला लागायचा. अशावेळी मी व  आरती एकाच कॉटवर शिफ्ट व्हायचो. दोघींच्यामधे  ट्रांझिस्टर! मावशींना काहीही माहिती नसायचं. त्या रोजच्या रामरगाड्यात असायच्या. घरी कोणी पुरुष नसल्याने खेळाविषयी फारशी माहितीही नाही आणि आसक्तीही नाही.

               शेवटची मॅच सुरु झाली, प्राण कानात आणून ऐकत होतो. अगोदरच्या मॅचमधे इंग्लंडला त्यांच्याच ग्राउंडवर हरवल्याने जरा जोश आला होता. पण तेव्हा वेस्ट इंडिज फॉर्मात, त्यांची टीम बलाढ्य होती. आधीचे दोन्ही विश्वचषक त्यांनी जिंकले होते. त्यामुळे ते फारच कॉन्फिडंट वाटत होते. विव रिचर्ड्स, लॉईड, ग्रिनीज, डेस्मंड हेन्स नामही काफी थे! त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी एकदम सरस होती. क्षेत्ररक्षणात तर ते राक्षसच होते. वेग, पॉवर सगळंच आपल्या पेक्षा जास्त! त्यामुळे टेन्शन होतंच. त्यातच आपली टीम ५५व्या ओवरमधे १८३ करुनच ऑल आऊटझाली. (तेव्हा वनडे ६० ओवर्सच्या होत्या) हे टारगेट पुरेसं नव्हतं. त्यांची बॅटिंग सुरु झाली तशी धडधड वाढणार असे वाटत असतानाच कॉमेंट्री ऐकताना त्यांचे ओपनर बीट होऊ लागलेत असं वाटलं आणि ‘….ग्रीनीज आऊटअसं कॉमेंट्रीटर म्हणाला.  कानावर विश्वासच बसेना. तिथे जाऊन बलविंदरला मिठीच मारावी असं वाटलं पण ते शक्य नव्हतं, मग आम्ही एकमेकींनाच मिठी मारुन सेलिब्रेट केलं. त्यानंतर लॉईड आऊट होईपर्यंत बोटाची नखं चावतच होतो आणि तो आऊट झाल्यावर मात्र आत्मविश्वास हळूहळू का होईना वाढू वागला. मार्शलचा कॅच गावस्करने घेतला आणि मी कॉलर एकदम ताठ केली (कारण, या सर्व सीरिजमध्ये माझा हिरो चमकला नव्हता). हे सगळं सेलिब्रेशन आमच्या खोलीत गपचूप चाललं होतं. पण होल्डिंगची विकेट गेल्यावर काय झालं कोणास ठाऊक… दोघीही (न ठरवता) एकदम एवढ्या जोरात किचाळलो की मावशी दचकून उठल्या आणि धडपडत आमच्या रुममध्ये आल्या. तेव्हा त्यांना बघून आम्ही काय केलं असावं याचा अंदाज आला, त्यांच्या चेह-यावर आधी काळजी आणि मग राग दिसला. आम्ही ओशाळून सॉरी म्हटलं. पण ट्रांझिस्टर परत दिला नाही कारण अजूनही कॉमेंट्री चालू होती. जल्लोष चालू होता. मोहिंदर अमरनाथला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. दुस-या दिवशी कॉलेज मधे धम्माल चर्चा आणि सेलिब्रेशन, त्यावेळच सेलिब्रेशन म्हणजे कॉलेज-कॅन्टीनमध्ये चहा व वडा!

                नशीबाने कोणी गावस्कर आणि शास्त्रीवरुन चिडवलं नाही. कारण तो दिवसच निखळ आणि सार्वत्रिक आनंदाचा होता. असे काही अविस्मरणीय प्रसंगच जगण्यात मजा आणतात…. आठवणीच्या जगात ओढून नेतात!

 – श्रुती संकोळी, ९८८१३०९९७५

Leave a Reply

Close Menu