वादळानंतर…!

तौक्तेनावाचे वादळ आले आणि गेले. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार फटका बसला. राज्यात १९ जणांचे बळी गेले. शेकडो घरे पडली. मच्छिमारांची प्रचंड हानी झाली. गेल्यावर्षी अशाच निसर्गनावाच्या वादळाने कोकणची प्रचंड वाताहत केली होती. त्यातून अद्याप सावरले नसताना यंदा वादळाने पुन्हा हजेरी लावली. वादळ येऊन गेल्यानंतर नेते मंडळींचे दौरे सुरु झाले. पळा पळा… कोण पुढे पळे तो..!अशीच शर्यत यावेळी सुद्धा पहायला मिळाली.

      मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी वादळग्रस्त भागाचा दौरा केला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे दौरे झाले. या दौ-यात साधले काय? हा प्रश्न दौरे करणा-या नेत्यांनाच विचारला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक यंत्रणा आहे. सर्व पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी कामही सुरु केले होते. या दौ-यामुळे प्रशासन काम सोडून नेत्यांची सरबराई करण्यात गुंतले. त्यामुळे पंचनामे आणि अन्य कामांना गती देता आली नाही. या दौ-यांची खरोखर आवश्यकता आहे का? हे गांभिर्याने तपासले पाहिजे. नेत्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. दौरे नकोत, आश्वासने नकोत; मदतीचे बोला! अशीच मागणी वादळग्रस्तांची आहे आणि ती मागणी रास्तच आहे. दौरे-आश्वासने, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण यांचा जनतेला आता वीट आला आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी आणि खास करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. समन्वयातून काम करण्याची तयारी नसेल तर निदान शांत बसावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

      याच वादळाचा फटका शेजारील गुजरात राज्यालाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गुजरातचा दौरा केला आणि १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. गुजरातला ही मदत जाहीर करायलाच हवी होती. पण प्रश्न असा उपस्थित होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा का केला? महाराष्ट्राकडे ते का आले नाहीत? मदतीचा तर पत्ताच नाही. हा विषय भाजपविरोधी पक्षांना आयताच मिळाला आहे. गुजरातला झुकते माप द्या; पण महाराष्ट्राला मदत दिली असती तर योग्य झाले असते. दुजाभाव दिसला नसता. असो!

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवसात पंचनामे करुन तातडीने मदत देण्याची घोषणा केली आहे. खरे तर आधी पॅकेज जाहीर करुन त्या मदतीचे वाटप थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे व नंतर पंचनाम्याचा सोपस्कार करणे योग्य ठरले असते. केंद्राने गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

      विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समन्वय आहे कुठे? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी जरुर तर कर्ज काढावे पण तातडीने वादळग्रस्तांना मदत देऊन कोकणच्या जनतेला दिलासा द्यावा, अशी सूचना केली आहे. स्थानिक प्रशासनाने तांत्रिक बाबींवर बोट ठेवण्यापेक्षा कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून वादळग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही त्याबाबत संकेत दिले आहेत. या सर्व परिस्थितीत कोकणचे भोग संपणार कधी? हे पहायचे बाकी राहिले आहे.

Leave a Reply

Close Menu