आपल्याकडे ऋण काढून सण साजरे केले जातात. एरव्ही काटकसरीने वागणारा माणूस सणासुदीला मनसोक्त खर्च करतो. वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करतो. यावर्षीची गणेश चतुर्थीही अशाचप्रकारे संपन्न झाली. गतवर्षी कोरोनामुळे ब-याच नियमांच्या अधिन राहून गणेशभक्तांना हा सण साजरा करावा लागला होता. परंतु, यावर्षी नियमांत शिथिलता आल्याने वाहतुक व बाजारपेठ यांमध्ये वर्दळ दिसून आली. उलाढालीने उच्चांक गाठला नसला तरी कोरोना काळात आर्थिक फटका बसूनही खरेदी होत होती. गणेशभक्तांनी तन, मन, धन अर्पून गणपतीची सेवा केली. पहाटेपर्यंत सर्वत्र भजनाचे सूर घुमत होते. हे सर्व करीत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी सर्वजण घेत होती. एकंदर चतुर्थीचा सण सर्वांनी एकत्र येत साजरा केला.

       अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुलभूत गरजा समजल्या जातात. जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. मनुष्याची महत्त्वाची गरज ही अन्न आहे आणि ते प्रतिदिन वापरले जात असून सुद्धा याचे दर नेहमी वाढतेच राहिले आहेत. आपण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शासनाला कर देत असतो. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत करांच्या रुपात पैसा जमा होत असतो. असे असताना शासनाने जीवनावश्यक वस्तचे दर नियंत्रणात ठेवावेत अशी अपेक्षा असते. राजकीय पक्षांकडून जनतेला कामापुरता मामाअशा स्वरुपात वागवले जाते. निवडणूकीच्या तोंडावर सण आल्यास विविध वस्तूंचे वाटप होते. हा केवळ मतांसाठीचा असलेला स्वार्थ सर्वसामांन्यांच्या लक्षात येऊन  सुद्धा लोक शांत राहतात. मात्र, हे किती दिवस चालणार? कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवले असतानासुद्धा एवढी महागाई का वाढावी? सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सुरळीत नाही, कंत्राटी डॉक्टरांना पगार नाही, सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या आजारावरची लस घेताना मारामारी, पहाटेपासूनच नंबर लावा, चारदा तरी खेपा घाला. नियोजनाचा प्रचंड अभाव. हे सर्व सहन करणारी, वास्तवात जगणारे आपण मुग गिळून गप्प का बसलोय? याचा सोक्षमोक्ष लागणे कठीणच. आपण का नाही वाचा फोडत आहोत? आपणच कोणाचे तरी देणेकारी आहोत अशाच स्वरुपात आपण का राहतो. लोकशाहीचा वापर का केला जात नाही? या सर्वांचीच उत्तरे ऐकण्यापेक्षा अन्यायाविरोधात आणि स्वहितासाठी केलेली कृतीच आपल्याला तारु शकते.

       महागाई वाढली तरी आजपर्यंत लोक उपाशी राहिले नाहीत. प्रत्येकाला जगण्याची प्रबळ इच्छा असते. उद्याचा सूर्य पहाण्यासाठी आपण रात्रंदिवस काम करुन महागाईशी लढत आहोत. असे असताना आपल्याच मतदारांची सत्ताधारी म्हणा किवा विरोधी पक्ष नेते तसेच सत्तेत नसलेल्यांना जाणिव असून नये हे कितपत योग्य आहे?

       देशाचे, राज्याचे रहाटगाडे सुरळीत राखण्यासाठी सूज्ञ मतदार नेत्यांना विश्वासाने निवडून देतात. त्यांचा हा अशाप्रकारे विश्वासघात करणे आपल्या तत्त्वाला साजेसे आहे काय? अलिकडच्या काही वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधी वरिष्ठ नेता घेईल तसा झेंडा आपल्या हातात घेतात. स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार झेंडा बदलणा-या लोकप्रतिनिधींची पण समाजाविषयीची काही जबाबदारी आहे की नाही? स्थानिक विकासकामांबरोबरच आपण राहतो, ज्याला स्वतःलाही सामोरे जावे लागते, अशी महागाईबाबतची समस्या वरिष्ठांपर्यंत का पोहचवली जात नाही.  प्रत्येकाच्या मनात असणा-या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध जागे होऊ. नाहीतर हे ओझ्याखालचे जिणे मात्र, असेच आपण सर्वजण वाहत राहू आणि मूकी बिचारी कुणीही हाकाअशी आपली अवस्था होईल किबहूना त्याला सुरुवात झाली आहे. त्या बुद्धिविनायकाने आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि राज्यकर्त्यांना जनहिताचे निर्णय घेण्याची बुद्धी देवो हिच गणरायाकडे प्रार्थना!

Leave a Reply

Close Menu