“केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा, ज्ञान येतसे फार … “

या सुभाषितात पर्यटनाचे महत्त्व फार पूर्वी मांडले गेले आहे. कालानुरूप पर्यटनाची व्याख्या बदलत गेली आणि ज्ञानसाधनेसाठीचे पर्यटन हे हळूहळू मौजमजेसाठी देखील होऊ लागले. कोकण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वर्गीय स्वप्न. त्यामुळे येथील पर्यटन हे देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालते. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा आणि घनदाट झाडांनी बहरलेला सह्याद्री पर्यटकांना नेहमीच साद घालत असतो. सिंधुदुर्ग हा जिल्हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून उदयास आला तेव्हा येथे पर्यटन पूरक व्ययसाय निर्मिती देखील झपाट्याने होत गेली. विविध प्रकारचे प्रयोग यशस्वी होऊ लागले. नवनवीन सुखसोयी निर्माण झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली. स्थानिक पातळीवर उत्पन्नाचा नवा झरा मिळाला आणि आता त्याचे रूपांतर हे नदीत होत असताना आपण पहात आहोत.

      कोरोना काळात कोकणातील पर्यटनाला सर्वात जास्त फटका बसला. ऐन पर्यटन हंगामाच्या काळात टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे काही करोडोंचे नुकसान स्थानिक व्यावसायिकांना भोगावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीच यंत्रणा उभी राहिली नाही, पण कर्जाचे डोंगर मात्र निर्माण झाले. हळूहळू गाडी पूर्वपदावर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देखील करण्यात आल्या. परंतु त्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आणि यावर्षी देखील स्थानिक व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागले. कोरोनाने दिलेली शिकवण प्रत्येकाच्या मनात आता रुजत आहे. आरोग्याचा प्रश्‍न हा सर्वात महत्त्वाचा आहे हे जाणून घेतले तर त्यातुन देखील चांगल्या दर्जाचे पर्यटन निर्माण होऊ शकते हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहे.

      महाराष्ट्र सरकारने 2012 ला ‘आरोग्य पर्यटन’ हा विषय चर्चेसाठी घेतला होता. केरळ आणि दिल्ली या दोन राज्यांची आरोग्य पर्यटनातील प्रगती पाहून महाराष्ट्र सरकारने काही प्रमाणात योजना देखील सुरू करण्याचे ठरवले होते, परंतु स्थानिक पातळीवर त्या राबविण्यात अपयश आले. यामागचे कारण देखील तसेच आहे. स्थानिक पातळीवर असलेली उपचारकांची कमी. सरकारने जाहीर केलेल्या योजनेत 80% भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे असे अधोरेखीत करण्यात आले होते. परंतु भूमिपुत्रांनी याकडे दुर्लक्ष केले आणि या योजना राबविण्यात सरकार अयशस्वी झाले.

      केरळच्या धर्तीवर जर कोकणात आपल्याला आरोग्य पर्यटन विकास करायचा असेल तर स्थानिक पातळीवर उपचारक निर्माण होण्याची गरज आहे. मोठमोठ्या संस्थानी हे आव्हान आता स्वीकारले पाहिजे. कोकणाला लाभलेले निसर्ग सौंदर्य हे आरोग्याला खूप फायदेशीर आहे याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा फायदा होईल यात शंका नाही. कोकणातील जीवनशैली आणि आहार याचा विचार करता हे काही कठीण नाही फक्त त्याच्याकडे शास्त्रीय दृष्ट्या पाहण्याची गरज आहे. जर हे शिक्षण आपण भूमिपुत्रांना देऊ शकलो तर एक नवीन व्यवसाय निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही.

पण ह्या करतला कोण…

      वेगळ्या वाटा निर्माण होत नाहीत असं नाही पण त्या वाटेवरून चालणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून सगळे मळलेल्या वाटेवरून चालणे पसंत करतात.

      आरोग्य पर्यटन ही संकल्पना जरी आपल्याला नवीन वाटली तरी कोकणात पूर्वीपासूनच ती कार्यान्वित आहे. आता फक्त त्याकडे व्यावसायिक दृष्ट्या पाहण्याची गरज आहे. उदा. मे महिन्यातील सुट्टीत मुंबईवरून जेव्हा नातवंड आपल्या आजोळी येतात तेव्हा आज्जी रोज सकाळी नातवंडाच्या डोक्यावर रात्री शिजवून मातीच्या भांड्यात थंड करत ठेवलेली उकड्या तांदळाची पेज एका पंचात बांधून डोक्यावर ठेवते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते व मे महिन्यातील रानमेवा किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा त्रास त्या मुलांना होत नाही. हा जरी आपल्याला साधा उपचार वाटला तरी याचे परिणाम हे खूप काळापर्यंतन टिकतात आणि त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांची तीव्रता कमी होते.

      कोकणातील आरोग्य पर्यटनात ह्याच उपचारांचा विचार करणे आवश्‍यक आहे. आपण जे उपचार घरच्या घरी करून आपले आरोग्य चांगले ठेवतो त्याच उपचारांची शास्त्रीय माहिती आता गोळा करणे ही काळाची गरज आहे. लुप्त होत चाललेले उपचार पुनर्जीवित करणे हे आपले सर्वांचे काम आहे. या कामाला निश्‍चितच वेळ लागेल प्रथमतः काही आर्थिक फायदा देखील होणार नाही. पण पुढील 25 वर्षांचा विचार करता निश्‍चितच हा एक मोठा बदल असेल यात शंका नाही.

-डॉ. प्रणव अशोक प्रभू

 मोबा. 9421073907, 8329897515

Leave a Reply

Close Menu