माझा मानसिक आजार मी ओढवून घेतलेला नाही मला त्याबद्दल लाज का वाटावी?

मानसिक आजारांमध्ये मेंदूच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आकलन, स्मृती, जोडणे, विश्‍लेषण, कारणमीमांसा अशी संज्ञानात्मक कामं नेहमीच्या वेगाने होत नाहीत किंवा योग्य प्रकारे होत नाहीत. त्यामुळे आजाराने त्रस्त व्यक्तींची शैक्षणिक, सामाजिक कौशल्यं रकमी होतात, काही कौशल्यं नाहीशी होतात. परिणामी दैनंदिन जीवनात सफाईदारपणे वावरण्यात वेगवगळ्या प्रकारचे लहान-मोठे अडथळे येतात. भावनिक-मानसिक पातळीवर बरीच पडझड होते. आत्मविश्‍वास, सहनशक्ती, संयम, सहजता, निर्भयता, समयसूचकता डळमळीत होऊन उत्पादकता घसरते.

      मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींचा आजाराच्या लक्षणांमुळे बरेचदा गोंधळ होतो. बरेचदा त्यांच्या लक्षणांच्या विचित्रपणामुळे त्यांना कौटुंबिक – सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. लक्षणं कमी झाली, नगण्य असतील तरी मानसिक आजाराच्या बसलेल्या शिक्क्यामुळे अशा व्यक्तींना बरेचदा टाळलं जातं.

      काही वेळा त्यांना त्यांचं विचित्र बोलणं, वागणं थोड्या वेळाने लक्षात येतं. त्यांना होणाऱ्या भ्रम आणि भासांमुळे नक्की खरं काय आणि आभासी काय याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतात. विस्मरण, भावना-विचार-वर्तनातील असंबद्धपणा त्यांना त्रास देत राहतो. आपण काही चुकीचं तर वागणार नाही ना अशी धास्ती बरोबर घेऊन ही माणसं वावरत असतात. समाज ज्या पद्धतीने मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींकडे बघतो, त्यांच्या कुटुंबियांना ज्या प्रकारची अवहेलना सहन करावी लागते ती आजार व्हायच्या आधी सर्वांनीच बघितलेली असते. तीच अवहेलना आपल्या आणि घरच्या लोकांच्या वाट्याला येणार आहे आणि त्याला आपण कारणीभूत आहोत अशी अपराधीपणाची भावना पोखरून काढते.

      मानसिक आजार उद्भवण्यात जसा अनुवांशिकतेचा थोडा वाटा आहे, तसाच तो काही प्रमाणात कौटुंबिक आणि मोठ्या प्रमाणावर सामाजिक घटकांचा आहे. मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी करण्याच्या प्रयत्नांमध्ये आजाराने त्रस्त व्यक्तीला आजाराच्या स्वरूपामुळे बऱ्याच मर्यादा पडतात. त्यात समाजाच्या कलंकित दृष्टिकोनाची नकारात्मक भर पडते.

      मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती स्वतःचा आजार जेवढ्या प्रमाणात समजून घेऊ शकते, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगल्या प्रकारे इतर व्यक्ती मानसिक आजारांना समजून घेऊ शकतात. जवळच्या व्यक्तींनी आणि एकंदर समाजातील लोकांनी अशा व्यक्तींना सहजतेने स्वीकारले, सहकार्य केले तर त्यांच्या प्रयत्नांना उभारी मिळेल. मुळात मानसिक आजार कोणीही ओढवून घेतलेला नाही. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींची सुधारणा व्हायची असेल तर त्यांना हा विश्‍वास द्यायला हवा – तू तुझा आजार ओढवून घेतलेला नाहीस, त्यामुळे तुला त्याबद्दल लाज वाटण्याचं काहीही कारण नाही. आजाराचा असा स्वीकार समस्त समाजाने केला तर मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती आजाराची लाज न बाळगता त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतील.

– मीनाक्षी (मानसोपचार तज्ज्ञ)

अधिक माहितीसाठी संपर्क : सहज ट्रस्ट

फोन – 02363-299629/9420880529

Leave a Reply

Close Menu