बीज अंकुरे अंकुरे….

आरती आणि राहुल हॉस्पिटलमधून आले आणि घरात एक अनामिक शांतता पसरली. नैसओिर्गक गर्भधारणा होत नाही म्हणून दोघांनी ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा प्रयत्न केला होता. पण तो फसला आणि गर्भ टिकला नाही. त्यामुळे घरातले सारेच अस्वस्थ होते.

      “टेन्शन नका घेऊ रे! होतं असं बऱ्याच वेळा! हे काही 1+1 सारखे गणित नाही,  शास्त्र आहे. असू दे…. परत प्रयत्न करु!” अशी त्यांची समजूत घातली खरी पण मनात मात्र वेगळेच विचार चालू झाले.

      स्त्री आणि पुरुषबीज एकत्र करुन तयार गर्भ गर्भाशयात घातला तरी त्याला शंभर टक्के यश का येत नसावे? काय अडचण येत असावी? जीवनशक्ती किंवा आत्म्याची अनुपस्थिती तर नसेल?

      म्हणूनच आजकाल सर्वच गोष्टींचे परफेक्ट नियोजन करणाऱ्या भावी आई-वडिलांनी गर्भधारणा होण्यापूर्वीसुद्धा योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे. उत्तम पिक येण्यासाठी जातिवंत शेतकरी बियाणे पेरण्यापूर्वीच जमिनीची मशागत करतो. अनावश्‍यक तण काढून टाकून उत्तम बीज पेरतो. त्याला योग्य ते खत-पाणी देतो. त्यानंतर ते पिक उत्तम येते. अशीच तयारी गर्भधारणेपूर्वी करावी लागते. चार प्रमुख गोष्टींची पूर्वतयारी लागते. ज्याला गर्भसंभवसामग्री असे म्हणतात.

  1. ऋतू- नियमित मासिक पाळी (ovulation)- पूर्वतयारी
  2. क्षेत्र- गर्भाशय (endometrium)- जमीन
  3. अंबु- गर्भपोषणासाठी आहाररस- खत/पाणी
  4. बीज- स्त्री+पुरुषबीज- बियाणे

      वास्तविक आजकाल प्रत्येकालाच आपले मूल सर्वगुणसंपन्न हवे असते. परंतु बुद्धीच्या जोरावर उत्तम शिक्षण घेतले तरी व्यवहारचातुर्याने व्यवसाय नोकरी निवडता यायला हवी. करियर सुरू झाले तरी ते उत्तम संस्कारांनी टिकवता, वाढवता आले पाहिजे. तसेच जीवनात आनंद-शांती-समाधान मिळवण्यासाठी एखादी कला किंवा छंद जोपासता यायला हवा. तरच जीवन परिपूर्ण होईल. आणि यासाठीच गर्भसंस्कार आपल्याला मदत करतात.

      स्वराज्याची ओढ लागलेल्या जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला आले. राक्षसकुळातील राणी कयाधु हिने आपला पुत्र राक्षसी वृत्तीचा जन्माला येऊ नये म्हणून गर्भावस्थेत नारदमुनींकडून उत्तम संस्कार करुन घेतले आणि भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. गर्भावस्थेत असतानाच अभिमन्यूने श्रीकृष्णाच्या तोंडून चक्रव्यूहभेदनाची कला ऐकली व ती त्याला अवगत झाली.

      गर्भावर ध्वनीच्या माध्यमातूनही उत्तम संस्कार करता येतात. ओंकार, वेगवेगळे मंत्र, उत्तम संगीत असा कोणताही रेझोनन्ट आवाज आई व गर्भ दोघांवरही चांगला प्रभाव टाकतात. याचा उपयोग गर्भाचे आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी होतो. यावर प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करण्यात आले आहे. भीतीदायक संगीत व शांत-मधुर संगीत ऐकवल्यावर गर्भाच्या आलेखात फरक पडलेला दिसून आला.

      म्हणूनच या काळात चिडचिड न करणे, चांगल्या गोष्टी ऐकणे, बघणे, वाचणे, योग्य आहार व नियमित व्यायाम चालू ठेवले पाहिजे. याशिवाय तणावपूर्ण वातावरणापासून आई-वडील दोघांनीही लांब राहिले पाहिजे. याचाच अर्थ या संपूर्ण काळात केवळ उत्तम संततीच्या दृष्टीनेच आपला जीवनक्रम आखला गेला पाहिजे.

      त्यामुळे गर्भधारणेच्या वेळी स्त्री- पुरुषाचे योग्य वय, पंचकर्माने शरीरशुद्धी, अष्टांगयोगाने मनःशुद्धी, चिंतनाने आत्मशुद्धी आणि निर्भय प्रसन्न मनाने उत्तम संततीचे चिंतन करणे आवश्‍यक आहे. निरोगी, सुसंस्कारित आणि बुद्धिमान मुलेच राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करु शकतील. म्हणूनच अशा मुलांना जन्म देणे ही प्रत्येक स्त्री-पुरुषाची जबाबदारी आहे.

– डॉ. स्मिता संदीप डोळे.

नारायणगाव. 9890234058

dolesmita@gmail.com.

या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ना जरूर भेट द्या-

https://www.facebook.com/104877777971544/posts/199255655200422/?sfnsn=wiwspwa

Leave a Reply

Close Menu