दशावतारी कलावंतांच्या डोक्यावरचा बोजा अजूनही तसाच

हिदू धर्म परंपरेनुसार विष्णू देवाला सृष्टीचा पालनकर्ता मानले गेले असून, धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयूग ते कलीयूगप्रारंभापर्यंत भगवान विष्णूने एकंदरीत २४ अवतार धारण केले, त्यापैकी जे दहा प्रमुख अवतार मानले गेले त्यास दशावतारम्हणून संबोधिले जाते. केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरी, जनार्दन, अच्युत, पुरूषोत्तम व पद्मनाभ इ. या अवतारांची प्रमुख देवता विष्णू व नारायण यांना मानले जाते. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, दत्तात्रय, धन्वंतरी व सूर्य यांची प्रतिकात्मता या अवतारांत मानली जाते. स्वर्ग, आकाश, जल ही त्यांची निवासस्थाने असून वैकुंठ हे वास्तव्य केंद्र मानले गेले आहे.

        दशावतार व डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. आधुनिक जीवशास्त्रानुसार सर्वप्रथम पृथ्वीवर एक पेशीय जीव पाण्यात जन्माला आला, त्याने पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन केल्याने त्यातून बहुपेशीय सजिवांची निर्मिती झाली व प्रजोत्पादनानुसार विविध दशअवतारांची निर्मिती केली गेली.

१) मत्स्यावतार-मत्स्य हा सर्वांत विकसित जीव मानला जातो. या अवतारामध्ये सत्ययुगात प्रभू विष्णूंनी माशाचे रूप धारण केले. प्राचीन कथेनुसार मनू सकाळी सूर्य देवतेला अर्घ्य देत असताना कमंडलूमध्ये लहान मासा अचानक आला, तो त्याने एका छोट्याशा कलशात ठेवला. परंतु, तो मासा अचानक आकाराने वाढत गेल्याने त्याला समुद्रात सोडणे भाग पडले. त्या माशाने भविष्यवाणी वर्तविल्याप्रमाणे महासागराच्या पातळीमध्ये अविश्वसनीय वाढ होत जावून जगाात महापूर आला. परंतु, त्या संबंधी अधिक काळजी घेतल्याने पृथ्वीवरील मानव जात व इतर जीवसृष्टी वाचली व ती परत संस्थापित झाली. ह्या अवताराचे प्रतिक मासा असल्याने त्याला मत्स्यावतारसंबोधले गेले.

२) कुर्मावतार – कुर्मम्हणजे कासव. हा उभयचर प्राणी असून त्याला कुर्मावताराचे प्रतिक मानले जाते. जेव्हा मेरू पर्वत समुद्रात बुडु लागला तेव्हा भगवान विष्णूने कुर्मावतार घेत आपल्या पाठीवर त्याला तोलून धरले.

३) वराहवतार –उभयचर प्राण्यांत उत्क्रांती होऊन त्यातून वराह अवताराची निर्मिती झाली. त्याची प्रजननशक्ती खूप अधिक असून घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असल्याने त्याच्यात माग काटण्याचे कौशल्य जास्त आहे म्हणून त्याला राजशक्तीचे प्रतीक मानले जाते.

४) नरसिंहावतार – नरसिंह म्हणजे अर्धमानव व अर्धसिंह. या अवतारात भगवान श्री विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले.

५) वामनावतार – वामन म्हणजे बुटका. ज्याचे शरीर, शक्ती सिमित असते. परंतु, तो बुद्धीचा वापर करतो. त्याने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर बळी असूर राजाला पातळात धाडले.

६) परशूरामावतार –मानवामध्ये उत्क्रांती होत जावून तो जीवन जगवण्यासाठी विविध साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर परशू (कु-हाड) म्हणून केला, त्याचे प्रतिक म्हणून ह्या अवताराला परशूरामावतार मानले जाते.

७) रामावतार – मानवाने उत्क्रांती करत स्वतःस सुरक्षित ठेवण्यासाठी व शत्रुवर मारा करण्यासाठी धनुष्यबाणासारखे शस्त्र  विकसित केले, की ज्याचा वापर पुराणकाळात विशेषत्वाने श्रीराम प्रभूंनी केला म्हणून त्या अवताराला रामावतार म्हणतात.

८) श्रीकृष्णावतार – हा भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्ण या शब्दाचा अर्थ कृष्णवर्णीय मुखाचा. पण सर्वांना आकर्षित करणारा, पराक्रमी मुष्टीयोद्धा, उत्कृष्ठ सारथी व तत्वज्ञानी असा होतो. ह्या अवताराच्या समाप्तीनंतर कलयुगाचीसुरूवात झाली असे मानले जाते.

९) बौद्धावतार- बुद्धहे नाव नसून ती ज्ञानाला दिलेली उपाधी आहे. प्रचंड ज्ञानी म्हणजे बुद्ध‘. भगवान गौतमाने आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्ञानाच्या जोरावर ती प्राप्त करून घेतली. संबुदध म्हणजे ज्ञान प्राप्त करून स्वतःवर विजय मिळवलेलाम्हणून या अवताराला बौद्धावतारसंबोधले जाते.

१०) श्रीकलीवतार – हा भगवान विष्णूचा भविष्यात येणारा अवतार मानला जातो. पुराणानुसार कलीयुगात पाप वाढल्यावर व पापाने परिसिमा गाठल्यावर दृष्टांचा संहार करण्यासाठी श्री विष्णू हा अवतार घेईल असे मानण्यात आले आहे.

                प्रत्येक ठिकाणच्या पद्धतीनुसार मंदिरांमध्ये जत्रौत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यात रत्नागिरी, रायगडमध्ये नमन, जाकडी, खेळे, तर खारेपाटण ते बांदा, दोडामार्ग, व पुढे गोव्यात दशावतारी नाटके सादर केली जातात. मालवणी माणूस व दशाावतारी नाटक यांचा अतूट व जिव्हाळ्याचा संबंध फार पूर्वपासूनचा आहे. दशावतार या लोककलेला सुमारे ८०० वर्षांपेक्षाही अधिक कालावधीचा समृद्ध वारसा आहे, की जो आज एकविसाव्या शतकात दशावतार कलावंतानी जोपासला आहे. दशावतार लोककला ही अलिखित नाट्यसंहिता असून, त्याचे कुठेही पूर्वी लेखन करून ठेवलेले नाही. या लोककलेमध्ये वर उधृक्त केलेल्या दहा अवतांरावर आधारित वेगवेगळे नाट्यप्रयोग सादर केले जातात. रामायण, महाभारत, भगवद्गीता यासारख्या पौराणिक ग्रंथांचे पठण करून त्यांचे रूपांतर नाट्यकलेद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. मनोरंजनाबरोबरच अध्यात्मिक, बौद्धिक व मानसिक प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य या दशावतारी कलाकारांकडून केले जाते. स्व. मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरणया  नाटकातून मालवणी कलाकार व मालवणी भाषेला केवळ राज्यात, देशातच नव्हे, तर पार परदेशातही एक मानाचे व मोलाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. परंतु, असे असले तरीही दुर्देवाने हा कलावंत रात्रीचा राजा व सकाळी डोक्यावर बोजाया कथीत म्हणीप्रमाणे आजही बेदखल दिसून येतो. ह्या कलावंतानी जणू काही स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवत या कलेला अखंडपणे वाहून घेतले आहे. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता केवळ विद्या व कलेची देवता श्रीगणेशालानतमस्तक होतं पाच ते सहा महिने कुटुंबापासून घराबाहेर रहात अत्यंत अल्प मानधनात जनतेचे मनोरंजन करण्याचा वसा जोपासत आहेत.

           दशावतार मध्ये विविध, पौराणिक, सामाजिक प्रसंग विविध रूपांत सादर केले जातात. यामध्ये प्रमुख आकर्षण असतं ते शंकासूराचं. एरव्ही ८ ते ९ महिन्यांमध्ये चालणा-या या दशावतारी नाटकांपैकी फक्त जत्रौत्सवाला हा शंकासूर दिसतो. दशावतारी कलाकार रंगभूषा, वेशभूषा हे स्वतःच करीत असल्याने हे कलावंत कलेच्या बाबतीत नेहमीच स्वावलंबी असतात. कलांच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन माणसातील माणूसपणाची जपणूक करतो, नातेसंबंध जपत असे. परतु, काळाच्या ओघात सद्यस्थितीत मात्र माणूस भौतिक सुखाच्या मागे अव्याहतपणे धावू लागल्याने तो माणूसकी, नातेसंबंध यांना मनाने पारखा होत आहे. मनोरंजनाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने माणूस स्वतःच्या घरातच एकमेकांपासून दुरावला जात आहे. केवळ व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम,लॅपटॉप या सारख्या कृत्रीम साधनांचा वापर करत स्वतःमधील माणूसपण हरवून बसला आहे. एकाच घरात राहून आपल्या नातेवाईंकाशीही तो प्रत्यक्ष संवाद साधण्याचे कष्ट न घेता मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधू लागला आहे. हीच खरी आधुनिक तंत्रज्ञानाची शोकांतिका बनत चालली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पूर्वीची मनोरंजनाची साधने माणसात माणूसकी निर्माण करत. परंतु, आजची साधने मात्र माणसाला माणसापासून बहुतांशी दुरावण्याचे काम करतात ही खरी आजची सामाजिक अधोगती बनत चालली आहे. मालवणी माणूस कलेचा फारच वेडा. त्याच्या नसानसात कला भिनलेली. त्यातही त्याचं दशावतारी लोक कलेचं प्रेम तर जगजाहीरचं.

        दशावतारी कलावंताना कलेची उपासना करताना द्यावी लागणारी आर्थिक झुंज पूर्वीपासून आजतगायत तशीच आहे. गेल्या दोन अडीच वर्षात कोरोना सारख्या महामारीमुळे या कलावंतांवर तर आर्थिक अरिष्ट्यच कोसळलं आहे. ज्या कलेवर त्यांची उपजीवीका, कुटुंब चालत ती कलाच सादर करण्यासाठीच बंधनं निर्माण झाल्याने त्यांच्यासमोर रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला. काही ठराविक कलावंतानाच शासनाचे मिळणारे तुटपुंजे आर्थिक मानधन हे केवळ बुडत्याला काडीचा आधार बनून गेलं आहे, ते सुद्धा योग्य वेळेतच मिळेल याची शाश्वती नाही. कित्येक वर्षे ज्या कलाकरांनी आपले सारे आयुष्य या कलेसाठी खर्ची घातलं. पण ज्यांना सद्यःस्थितीत कोणतेही श्रमीक काम करणे अशक्य आहे, जे वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत, एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, विकलांग आहेत, असे कलावंत तर उर्वरीत आयुष्य अत्यंत दयनीय परिस्थितीत जगत आहेत. दुर्देवाने काही कलावंताचा ह्या महामारीने बळी घेतल्याने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती तर अत्यंत शोचनीय बनली आहे. ह्या लोक कलाकारांची ही परिस्थिती बदलविणे समाजाची व प्रामुख्याने शासनाची जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात आर्थिक व मानसिक आधाराची गरज आहे, त्यासाठी त्यांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. तरच हे कलावंत त्यांच्या कलेची योग्य जोपासना करून पुन्हा एकदा अशा या संकटातून नव्याने उभारी घेत रसिकांचे मनोरंजन करतील. कलाकरांच्या मनातील ही खंत निश्चितच समाजाला व शासनाला विचार करावयास लावणारी आहे.

संजय तांबे, फोंडाघाट-कणकवली.

मो. ९४२०२६१८८८

Leave a Reply

Close Menu