‘वेस्टमधून बेस्ट’ची निर्मिती

आपली हस्तकला लोकांपर्यंत पोहचविताना वेंगुर्ल्यातील दोन तरुणांनी ‘वेस्टमधून बेस्ट’ची निर्मिती केली आहे. यामेश खवणेकर व पंकज घोगळे अशी या दोन तरुणांची नावे असून त्यांनी टाकाऊ बॉटलचे रुपांतर नाईट लॅम्प, गिफ्टमध्ये केले आहे. त्यामुळे त्यांची हस्तकला वेगळ्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचत आहे.

      काचेच्या बॉटल्समधील पेय संपल्यावर त्या टाकून दिल्या जातात. ठिकठिकाणी अशा बाटल्या आपल्या नरजेस पडतात. मात्र, या बाटल्यांचा रोजच्या जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल यासाठी फाईन आर्टस्‌चे शिक्षण घेतलेल्या यामेश व पंकज यांनी दूरदृष्टीने अभ्यास केला आणि त्यांच्या कल्पक बुद्धितून अनोख्या कलेचे विश्व अस्तित्त्वात आले. भंगारामध्ये बाटल्या एकत्र करुन त्यांनी त्या स्वच्छ केल्या आणि आपल्या हस्तकलेचा वापर करुन त्यावर देवदेवतांची, दशावतारी कलाकार, व्यक्तिचित्रे रेखाटण्यात आली आहेत. हे ‘शो पिस’ लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच भेट म्हणूनही देता येण्यासारखे आहेत. तर काही बॉटल्सवर दिपगृहासारखी पर्यटनाची ठिकाणे रेखाटून त्यात विद्युत बलही सोडण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी अशा बॉटल्सचा उपयोग ‘नाईट लॅम्प’ म्हणून करता येणार आहे. सुबक आणि आकर्षक दिसणारे हे ‘शो पिस’ लक्षवेधी ठरत असून त्यांच्या कलेची लोकांना भुरळ पडत आहे.

      या दोन युवकांनी आपल्याकडील कलेतून स्वत:चा आगळावेगळा रोजगार उपलब्ध केला आहे. समाजात वावरताना आपल्या आजूबाजूचा परिसर विविधांगीने नटलेला आहे. त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करुन घेता येईल यासाठी तरुणांनी स्वत:कडे दूरदृष्टी ठेवावी असे यामेश खवणेकर (9405817515)व पंकज घोगळे (8856003463)यांनी सांगितले.                            – प्रथमेश गुरव, 9021070624

Leave a Reply

Close Menu