‘जन’सेवा.. खरोखरच ‘तिळा’ एवढे कार्य… पण ‘गुळाचा’ गोडवा!

तिळ….गूळ दोन्हीही आपापल्या जागेवर आहेत. दोन्ही एकत्र आलेत की ‘तिळगूळ’…पण दोन्हीही श्रेष्ठ! तसंच पत्ाी-पत्नीचं नातं!

      ‘कुंकू’… जीव अडकलाय तिचा! पुसलं म्हणायचं नाही, ‘वाढवलंय’ म्हणायचं. कालपर्यंत ‘सवाशिण’ असणारी नवरा गेल्यानंतर तिचा मान काढून घेतला जातो. अशा महिलांचा सन्मान जनसेवा प्रतिष्ठाने घडवून आणून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. संजीव लिंगवत आणि डॉ. सई लिंगवत  यांनी पाच वर्षापासून “सवाष्ण नसलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू“ हा अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

      जीवन आणि सौभाग्य याला परंपरेचे ‘फेव्हीकॉल’ चिकटवून नैराश्‍येची बिजे पेरली जातात. पती, पत्नीचं नातं स्वाभाविक, नैसर्गिकरित्या बनलेलं. पतीच्या जाण्यानं तिचं अस्तित्व संपतं का? ‘आधार’ गेल्यानंतर ‘स्वाभिमान’ जपण्यापेक्षा ‘अपमान’ उदयास यावा, यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. देवीच्या कपाळी पशुबळीचा रक्ताचा टीळा लावल्यानंतर ‘कुंकू’ या शब्दाचा जन्म झाला. वास्तविक ‘कुंकू’ हे सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतीक! त्यानंतर द्रवीड स्त्रियांनी ही प्रथा सुरूच ठेवली ती आजतागायत! मनुस्मृती काळातील बंधने, आजही काही प्रमाणात आहेत.

      पतीनंतर तिनं, ‘कोनाडा’ धरावा, कोपऱ्यात कुठंतरी तोंड लपवून बसावं, धार्मिक कार्यक्रमात सहभागास नकार, नुकतंच कुणाला बाळ झालं असेल तर तिनं ते पाहायचं नाही. शुभकार्यात तिनं घरातच थांबायचं, पती निधनानंतर वर्षभर कुणाला तोंड दाखवायचे नाही, अशा काही परंपरा आजही ग्रामीण भागात पाहावयास मिळतात. कुठला नवरा सांगेल की माझ्या नंतर तिला अशी वागणूक द्या? तिला वैधव्य येणं हे तिच्या हातात असतं का? बरं, पती, पत्नी दोन्हीही एकाचवेळी मरण पावणार आहेत का? कुणी एक तरी अगोदर जाणारच आहे. मग अगोदरच जोडीदाराच्या दु:खानं व्यथीत बनलेल्या स्त्री मनाला वेदनेच्या तव्यावर असं झोकून देणं, मानवतेच्या दृष्टीकोनातून पटतंय का? खरं तर तो धीर देण्याचा काळ, बंधनाच्या विळख्यात बांधून तिच्यातील स्वाभिमानाला फटके दिले जातात, मग, उदासिनता आणि नैराश्‍येला कवटाळत आयुष्य जगण्याशिवाय पर्याय नसतो. बरं, किती महिला आपल्या उपद्रवी, दारूड्या आणि हिंस्त्र विचारांनी प्रेरीत नवऱ्याचा त्रास सहन करतात? ‘आधार’ असून नसल्यासारखा. कितीतरी अशी प्रकरणे आहेत, जिथे नवरा असूनही पत्नी नरकयातना भोगतात. ‘कुंकवाचे धनी!’ संकुचित विचारांचा हा पिंजरा, भेदून पुढे जाण्याची तयारी, अनेक विधवांची असते. पण कुटुंबाचा दबाव आणि ‘समाज काय म्हणेल?’ या चक्रात त्या गुरफटतात. स्वतंत्र जगण्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. बांगड्या फोडल्या, कुंकू पुसलं म्हणून या निरभ्र आभाळाखाली स्वत:च्या हिमतीवर जगणाऱ्यांना रूढींच्या बंधनात अडकण्याची गरज नाही. हे नुकतेच काही महिलांनी दाखवून दिलंय. हळदीकुंकवाचा मान केवळ सवाशिणीला… हे काही पटत नाही. हळदीकुंकू म्हणजे काय? स्त्रिच्या स्त्रित्वाचा सन्मान! ‘स्नेह’ वाढविण्याचा सण! तिथं ‘सौभाग्य’ आलं कुठून? कपाळी आधीच ‘कुंकू’ असणाऱ्या स्त्रिला ‘कुंकू’ लावण्यापेक्षा जिच्या कपाळी ‘कुंकू’ नाही, तिला लावला तर खऱ्या अर्थाने या सणाचं महत्त्व अधोरेखीत होईल. तिच्या चेहऱ्यावरील आनंद त्या तीळगुळाप्रमाणे एक गोड नातं निर्माण करेल.

      सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन हा अनोखा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. डॉ. संजीव लिंगवत आणि डॉ. सई लिंगवत यांच्या कार्याला तोड नाही. हा आदर्श समाजातील प्रत्येक घटकाने घ्यायला हवा.

– स्वप्नील परब, पत्रकार-मातेोंड 9168035111

Leave a Reply

Close Menu