प्रजासत्ताक दिन

15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही पद्धत आपण स्वीकारली ही पद्धत भारतीय लोकांना एकदम नवी होती. त्या काळचा विचार केला तर आपली प्रचंड लोकसंख्या, त्यात अशिक्षित लोकांची संख्या खूपच जास्त, शिक्षण नाही त्यामुळे जगात काय चाललय याची माहिती नाही, त्यामुळे स्वतःची अशी मतं सुद्धा नाहीत! अनेक वर्ष गुलामगिरी सहन केल्याने पुरेशी साधनं नाहीत, संपत्ती नाही आणि आत्मविश्‍वासही नाही अशी एकंदरीत परिस्थिती!

      ब्रिटिशांच्या तावडीतून भारत जेंव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा प्रथमच या देशाला आसेतु हिमाचल हे रूप मिळालं. त्यानंतर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राहताना विकासासाठी पोषक आणि न्यायावर आधारित समाजरचना निर्माण करणं, आणि जागतिक शांतता व सहकार्य साध्य करणं  महत्त्वाचं होतं. त्यासाठी देशाने जे संविधान स्वीकारलं, त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आमच्या राष्ट्रवादाची द्योतके म्हणून घोषित झाली. त्यामुळे राष्ट्रवादाची सांगड धर्माशी न घालता सांविधानिक मूल्यांशी घालणं महत्त्वाचं होतं. भारतात पूर्वीपासून मौर्य, गुप्त, सातवाहन, चालुक्य, पल्लव, होयसाल, मोगल, मराठा, ब्रिटिश अशा निरनिराळ्या वंशांची साम्राज्यं होती आणि ह्या विविध साम्राज्यांच्या काळांपासून इथे वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे, रंगांचे, संस्कृतींचे आणि भाषांचे लोक एकत्र नांदत आहेत.  कोणत्याही साम्राज्याच्या काळात एखाद्या विशिष्ट धर्माची मक्तेदारी राष्ट्रावर कधीच नव्हती, हे ध्यानी घेतलं पाहिजे. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद यांचा धर्माशी संबंध तेव्हाही नव्हता, आणि तो आजही असता कामा नये. असो.

      स्वतंत्र्यानंतर मात्र ज्या निवडणुका होत होत्या त्याला लोकशाही म्हणणे म्हणजे लोकशाहीची चेष्टाच होती!

      उत्तरेकडच्या राज्यात सरळ सरळ बूथ कॅप्चर करून एकच व्यक्ती पूर्ण गावचे मतदान करायची. अगदी आमच्या कोकणातल्या छोट्या गावातही मतदान करणे म्हणजे हाताच्या चिन्हावर शिक्का मारणे असाच अशिक्षित लोकांचा समज होता. कधी ढुंकूनही न बघणारी प्रतिष्ठित माणसं त्यावेळी हाताला धरून या अडाणी लोकांना मतपेटीपर्यंत नेत. या सगळ्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला न झाला तर नवलच!

      टी.एन्‌.शेषन आले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला किंवा मतदानाला काही तरी अर्थ आला. त्याआधी घटनेत निवडणूक कशी घ्यावी ह्या विषयी जे नियम/निर्देश होते त्याला सरळ कचऱ्याची टोपली दाखवली जायची. पण शेषन सरांनी मात्र घटनेने दिलेल्या अधिकाराचा निर्भीडपणे वापर करून निवडणुकीचे स्वरूपच बदलून टाकले. शेषन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले. त्यांनी सार्वजनिक प्रचारातील आक्रमकता रोखण्याकरता प्रचलित कायद्यातील तरतुदींचा वापर करून उमेदवारांना त्यांच्या प्रचाराचे उत्तरदायित्व घेण्यास भाग पाडले. ज्या उमेदवारांचे प्रचार साहित्य सार्वजनिक जागांवर अनधिकृतरीत्या आढळून येईल त्यांना, ज्यांच्या प्रचारांचे ध्वनीवर्धक नियमबाह्य वेळा आणि पातळ्यांवर प्रचार करतील त्यांना, ज्यांचा प्रचारखर्च बेसुमार वाढतांना दिसेल त्यांना, सहा सहा वर्षांकरता निवडणुका लढण्याकरता कायद्यांन्वये अपात्र ठरवून निवडणुकांच्या रणधुमाळीस शिस्तीत बसवले. उद्दाम राज्यकर्त्यांना शिस्तीत बसवणे लोकशाहीमुळेच  साध्य झाले.

      आज एक भारतीय म्हणून आपली थोडीशी जबाबदारी जरी आपण पार पाडली तरी आपल्याला राष्ट्रभक्ती दाखवण्यासाठी वेगळं काही करायची जरूरी नाही. अहो आपण ज्या परिसरात राहतो तो स्वच्छ व सुरक्षित ठेवणे,  वीज-पाणी यासारख्या अत्यावश्‍यक गोष्टींची बचत करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे, राष्ट्रीय स्मारकांची निगा राखणे, मतदान करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे म्हणजेच देशभक्ती, म्हणजेच आपल्या देशावर प्रेम करणे, त्याचा मान राखणे! यासाठी प्रत्येकाने सीमेवर जाउन लढायची किंवा पुढारी/राजकारणी व्हायची गरज नाहीये. फक्त एक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडलं तरी ते खूप मोठं योगदान ठरेल! लाच देणं बंद करू शकतो, भ्रष्टाचाराला आळा आपण घालू शकतो.

      तुम्ही म्हणाल “ हे सगळे बोलायला खूप सोप्पं आहे , पण करायला नाही“ पण आपण स्वतःहुन प्रयत्न करायला काय हरकत आहे? हे कठीण आहे म्हणुन आपण हे नेहमीच ऑप्शनला टाकणार का? सुरुवातीला अवघड जाईलच पण नंतर यातूनच मार्ग सापडेल. आपण करु शकतो हा आत्मविश्‍वास निर्माण होईल.

      विश्‍वास ठेवा – भ्रष्टाचार, दहशतवाद यांनी पोखरून निघालेला आपला हा देश कोलमडून पडणार नाही, कारण राजकारणाच्या, जातिधर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रकल्याणाच्या ध्येयानं प्रेरित अशी डॉ. प्रकाश आमटे, रतन टाटा, कैलाश सत्यार्थी यांच्यासारखी माणसं जी कामं करतायत, त्यांतून आपल्याला नेहमीच मोठी प्रेरणा मिळत राहील.

      चला तर मग यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनापासून एक नवी सुरुवात करुया !

-श्रुती संकोळी, 9881309975

Leave a Reply

Close Menu