डॉ. प्रतिक गायकवाड यांच्या गायकीने वेंगुर्लावासीय मंत्रमुग्ध

          मनाला भूरळ घालणाऱ्या शब्दांची अतिमुलायम उबदार कवितारुपी चादर स्वरबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अलगदपणे विस्तारते तेव्हा स्वर्गसूख काय असते याची वेगळी अनुभूती असूच शकत नाही. डॉ. प्रतिक गायकवाड यांनी वेंगुर्ल्यात सादर केलेल्या आवाज चांदण्यांचे या कार्यक्रमातही उपस्थित रसिकजन शब्दांच्या दुनियेत सूर-ताल-लयाच्या अद्भूत ललकारीत मंत्रमुग्ध होऊन गेला.

      वेंगुर्ल्यातील साप्ताहिक किरातच्या शताब्दी महोत्सवी स्नेहमेळाव्यात येथील नाटककार मधुसुदन कालेलकर नाट्यगृहातील आरती प्रभू रंगमंचावर सादर झालेला हा अस्सल मराठी गीतांचा मराठमोळा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला. प्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचे शिष्य असलेले डॉ. प्रतिक गायकवाड हे देखील पेशाने डॉक्टरच आहेत. परंतु संगीतावरील प्रेमापोटी त्यांनी संगीत विश्‍वातही स्वतःच्या नावाची वेगळी छाप पाडली आहे. भारतातील सर्वांत कमी वयाचे संगीत विषयातील पीएचडीचे गाईड म्हणूनही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या अप्रतिम प्रतिभेचा आविष्कार वेंगुर्ल्यातील या कार्यक्रमात वेंगुर्लेवासियांना अनुभवता आला.

      शब्दांची हळूवार गुंफण, आल्हाददायक संगीत, मनाला भिडणारे सूर आणि तेवढ्याच ताकदीचे लालित्यपूर्ण निवेदन अशा विविधांगाने नटलेल्या या आवाज चांदण्यांचेने किरातच्या शताब्दी महोत्सवाची रजनी वेंगुर्लेवासियांसाठी यादगार बनविली.

ओंकार अनादी अनंत अथांग अपरंपार

नादब्रह्म परमेश्‍वर सगुण रुप साकार

सुरस्पर्श सुरश्रवण स्वरगंध आश्‍वासन

तिमिराच्या गर्भेवर तेजोमय ओंकार

      विश्‍वाच्या निर्मितीचे कोडे अद्यापही सुटू शकलेले नाही. अनादी अनंत अशा तत्वातून ज्या नादाची निर्मिती झाली त्या नादाच्या इश्‍वराचे स्तवन करून त्यांनी या कार्यक्रमात अनाहूत रंग भरले. अंधार हेच अंतिम सत्य आहे. प्रकाश येतो, प्रकाश जातो, उजाडते मावळते. अंधाराचे अस्तित्व मात्र कायम ठासून राहते. याच अंधाराला आव्हान देत नव्या आशांची पहाट उजाडण्यासाठी माणसाचे आयुष्य सतत धडपडत राहतं. अंधार गडद होत जातो तेव्हा त्याला गाढण्यासाठी प्रकाशाचा एक आशेचा किरणही पुरेसा ठरतो. दिव्याची एक ज्योत एक कोपरा उजळतो. अशा अनेक ज्योती अनेक कोपरे उजळत नेतात व यातूनच संपूर्ण विश्‍व ज्ञानरुपी प्रकाशाने उजळून निघतो.

मनाचिये अंधाराचा होतसे विनाश

तमाच्या तळाशी दिवे लागले

दिवे लागले रे दिवे लागले रे

दिव्यांच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे कुणी जागले रे

      गाण्यांची कुळकथा खुप काही सांगून जाते. माणसाच्या भावभावनांचे पडसाद गीतात, काव्यात उमटतात, आणि म्हणूनच अशी गीते अजरामर होतात. कोकण हा निसर्गसंपन्न प्रांत आहे. त्यामुळे कोकणातील कोणत्याही निर्मितीत कोकणच्या निसर्गाच्या खाणाखुणा दिसणारच. मातीशी नाते सांगणाऱ्या काही अप्रतिम रचना डॉ. प्रतीक गायकवाड यांनी या कार्यक्रमात कुळकथांसह सुश्राव्य सादर केल्या. अर्पणा परांजपे यांनी कार्यक्रमाला केलेली निवेदनाची सोबत अधिक लक्षवेधी होती. स्वर्गसुख देणारी स्वर-ताल-लयीची त्यामुळे हा कार्यक्रम वेंगुर्लेवासीय रसिकांच्या मनावर रुंजी घालणारा ठरला.

      तव नयनांचे दल हलले ग

      पानावरच्या दवबिंदूपरी

      त्रिभूवन हे डळमळले ग

      मोठमोठी लाकडे भुंगे सहज पोखरतात. मात्र अतिशय मुलायम असलेल्या कमळाच्या देठात त्याला अडकून पडाव लागतं. का असं होतं. यालाच गुंतणं म्हणायच का? प्रेमाची हीच तर नांदी आहे. प्रेमात पडायला अजून काहीच लागत नाही, केवळ एक नजर पुरेशी ठरते. हीच नजर मोठी जादू आहे. डोळे म्हणजे शरीराची वाचा. न बोलता आपल्या भावना प्रकट करण्याचे माध्यम म्हणजेच ही नजर. ती जेवढी प्रखर तेवढी प्रेमळ म्हणूनच प्रेमात पडलेल्यांना तीच नजर खुप मोठा आधार वाटते. बा. भ. बोरकर यांच्या या रचनेत प्रेम आणि कोकणतील निसर्ग ठासून भरलेला पहायला मिळतो.

सजन दारी उभा काय आता करू

घर कधी आवरू मज कधी सावरू

मी न केली सखी अजून वेणीफणी

मी न पुरते मला निरखले दर्पणी

ना सडा अजून टाकिला अंगणी

राहिले नाहणे कुठून काजळ भरू…!

      प्रत्येक प्रेमीजनांच्या काळजाचा चुकलेला ठोका घेऊन त्रितालातील धा बनलाय. म्हणूनच तो एवढा प्रभावी आहे. भलत्यावेळी असता मन भलतीचकडे, गुढ मन तव कळून नकळून भांबावून मागे मुरडे, निसटून जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे, आज अचानक गाठ पडे. अचानक अशी गाढ पडते तेव्हा भांबावणारे मन आणि सजनाला भेटण्यासाठी मनाची होत असलेली तगमग डॉ. प्रतीक गायकवाड यांनी जीव ओतून रसिकांसमोर पेश केली.

      डॉ. सलील कुलकर्णी यांनी अजरामर केलेल्या अनेक रचना त्याच ढंगाने सादर करत डॉ. प्रतीक यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी…!. व नको करू सखी साजिरा शृंगार… आधीच कट्यार त्यात जीव वेणीदार ही धारधार लावणी सादर करून त्यांनी कार्यक्रमाला चार चाँद लावले. त्यांचाच शिष्य शौरीन देसाई यांनी ‘अंतरात येई कुठून हाक ही मला हे गीत सादर करून आपल्या गायकीची झलक दाखविली.

      शेखर सर्पे, चिन्मय माधव, रोहन नाईक, प्रतिक निर्मळ यांच्या साथ संगतीने आवाज चांदण्यांचे हा बहारदार कार्यक्रम यादगार ठरला.

Leave a Reply

Close Menu