व्यंगचित्रकारते गीतकार गुरु ठाकुर यांचा प्रेरणादायी प्रवास : किरातच्या शताब्दी महोत्सवात उलगडले मनातील हितगूज

येतील जातील वादळवारे, नसतील कोणी सावरणारे

तोल तुझा ढाळू नको, उगाच पानं गाळू नको

घटका पळे ऋतू सहा, प्रत्येक क्षण जगून पहा

आभाळाची घेऊन ओढ, मूळ रोवून उभा रहा

मात्र उंच जातानाही, तत्व एक सोडू नको

ज्या मातीत रुजून आलास, मन तिच मोडू नकोस!

      अशा शब्दात मातीचे ऋण व्यक्त करत गुरु ठाकुर यांनी किरातच्या शतक महोत्सवी स्नेहमेळाव्यात आपल्या मनातील हितगुजाला सुरूवात केली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका शिवानी जोशी यांनी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. ‘कौतुक सांगू किती पट्ट्या बहुगुणी’ या गुरु ठाकुरांच्या ओळी त्यांनाच तंतोतंत लागू होतात असे गौरवोद्गार काढत जोशी यांनी ठाकुरांच्या मनातील हितगूज रसिकांसमोर अलगदपणे उलगडले. ठाकुर यांनी आपल्या जडणघडणेतील अनेक किस्से सांगून या कार्यक्रमात आपल्या उत्तुंग यशाचे रहस्य रसिकांसमोर मुक्त केले.

      2004 मध्ये आपला चित्रपटांसाठी गीतलेखन करण्याचा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत 200 चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. गंगाधर टिपरे व हसा चकट फू या दोन मालिकांचे लेखन, भैया हातपाय पसरी हे नाटक, अगबाई अरेच्या, नटरंगसह अनेक चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन करत सुरू झालेला हा प्रवास यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात काम केले, पण ते पूर्ण करण्याकडे आपला भर होता. त्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या माझ्या वाट्याला आल्या नाहीत. उलट याच चिंध्या आज माझ्यासाठी पैठणी बनल्या आहेत.

      दहावीत मराठी विषयात 52 मार्क मिळविणारा कॉमर्सचा एक सामान्य पदवीधर आज एवढा मोठा होतो, हे खरे तर या मातीचेच ऋण आहेत. बालपणी प्रत्येक सुट्टीत गावी आल्यानंतर जो निसर्ग अनुभवला तोच आजही आपल्या गीतांमधून, पटकथांमधून झळकत असतो. दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात आपली कविता आहे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा सन्मान आहे, असे भावोत्कट उद्गार प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले. बालपणी प्रत्येक सुट्टीत गावी आल्यानंतर जो निसर्ग अनुभवला तोच आजही आपल्या गीतांमधून, पटकथांमधून झळकत असतो. दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात आपली कविता आहे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा सन्मान आहे, असे भावोत्कट उद्गार प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.

अर्कचित्रातील आवडीमुळे माणसे वाचू लागलो!

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण हे आपले गाव. या मातीत मन आहे. संधी मिळेल तेव्हा गावाकडे धावतो. लहानपणी परीक्षा संपल्यानंतरच लगेच कोकणात यायचो. तेव्हापासून जे पाहत आलोय त्याचा प्रभाव आजही आपल्यावर आहे. त्यामुळेच आपल्या कथा, कवितेत, गीतात जो निसर्ग दिसतो तो केवळ कोकणातलाच आहे. आपल्या जडणघडणीत रसिकांचा मोठा वाटा आहे. मुंबईतला जन्म, मुंबईतच शिक्षण आणि बालपणही तेथेच गेले. वरच्या मजल्यावर राहत असल्याने एकदा वर गेल्यावर पुन्हा खाली येण्याचा कंटाळा असल्याने आपले फारसे मित्र नसायचे. खेळातही फारसा रस नसायचा. म्हणून मग एकाकीपण घालविण्यासाठी घरात येणाऱ्या टाईम्समधील आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रात रमू लागलो. व्यंगचित्र म्हणजे काय याची कल्पना नसताना मी ती काढू लागलो. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे अर्कचित्र मी रेखाटू लागलो. व्यंगचित्र काढण्यासाठी एक वेगळी नजर असावी लागते. मोजक्याच रेषांमध्ये त्या माणसाची ओळख पटवून देणारी ही कला आहे. मला ती हळूहळू जमू लागली. असं कुणाच चित्र काढणं म्हणजे ती कुचेष्टा केल्यासारख आहे का? असा सवाल माझ्या या करामतींवर आईबाबांकडून होऊ लागला. पण, एका रसिकांमुळेच माझी ही प्रतिभा जोपासली गेली. राजाध्यक्ष नावाचे एक मोठे व्यक्तिमत्व आमच्या घरी आले होते. मी त्यांचे चित्र काढले आणि त्यांनाच दाखविले. त्यांनी पहिली माझ्या कलेची कदर केली. मला बक्षीस दिले आणि आईबाबांना आश्‍वस्त केले की हा तुमचा मुलगा कलेच्या दुनियेत कोणीतरी मोठा होणार आहे.

मार्मिकमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम

      दुसरा रसिका कॉलेजमध्ये भेटला. सरांचे अर्कचित्र वर्गात गुपचूप काढत बसलो होतो. त्यांनी मला प्राचार्र्यांकडे नेले. त्या मॅडम होत्या. त्या माझे अर्कचित्र पाहून खळखळून हसू लागल्या. पुढे त्यांनी मला कॉलेजमधील सगळ्याच प्राध्यापकांची अर्कचित्रे काढून घेतली. ती कॉलेजच्या मॅक्झिनमध्ये छापली. कोणतेही तंत्रशुद्ध शिक्षण न घेताच माझ्यातला व्यंगचित्रकार मोठा होत होता. हिंदूस्थान टाईम्सच्या स्पर्धेसाठी कॉलेजमधूनच चित्रे पाठविली. मला बक्षिसे मिळत गेली. त्याकाळी मार्मिक मासिक यायचं. त्यात बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रे यायची. मार्मिकमध्ये आपले एखादे व्यंगचित्र छापून यावे या इच्छेसाठी मी मार्मिकच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे श्रीरंग धारप नावाचे संपादक होते. ते माझी चित्रे बघून अवाक्‌ झाले. त्यांना ही चित्रे मी काढली हे पटेना. त्यांनी मला पेन, कागद दिला आणि देवेगौडांचं अर्कचित्र काढायला सांगितले. मी ते तेथेच काढले. मग चंद्रशेखर काढले. आणि मग मला मार्मिकमध्ये एका सदरासाठी व्यंगचित्र काढण्याचे कामच मिळाले.

माणसे वाचण्याचा सल्ला बनला टर्निंग पॉईंट

      मी मार्मिकचा व्यंगचित्रकार झालो. श्रीकांत डगरे नावाच्या एक महनीय व्यक्तींनी मला व्यंगचित्र काढताना माणसे वाचण्याचा सल्ला दिला. हा सल्लाच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. यातूनच माझ्यातील लपून बसलेला कलाकार घडत गेला. अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनय केला. बक्षिसे मिळवली. मग हळूहळू मी लेखन करू लागलो. व्यंगचित्रांना संवाद लिहिण्याचे कामही माझ्याकडेच आले. प्रत्येक भाषेची एक स्वतंत्र चाल असते. ती मी अवगत केली. ह. मो. मराठे यांनी प्रोत्साहन दिले. पॉलिटिकल सटार नावाचे एक सदर मी लिहू लागलो. ते खूप लोकप्रिय झाले. या सदरातूनच हसा चकटफू या नावाची एक टीव्ही मालिका माझ्यासाठी चालून आली. एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे एक एक क्षेत्र माझ्यासाठी खुले होत  राहिले.

हळूवार सांजवेळी मन का उदास आहे

येशील तुही, आशा वेड्या जीवास आहे

        एकांकिकेसाठी लिहिलेले हे एक गाण होतं. ती एकांकिका सादर झाली नव्हती. अमोल बावडेकरने दूरदर्शनवर सादर करण्यासाठी एक नवीन गाण्याची मागणी केली. हेच गाणे मी त्याला दिले. त्याने त्याला चाल लावून सादरही केले. तेव्हा मी कुणीही नसताना खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या गीतकार म्हणून झळकलो. व्यंगचित्रासोबत विडंबनगीत लिहिण्याचा प्रयोग मार्मिकमध्ये सुरू झाला. हे कामही माझ्याकडे आले. चालींवर गाणी लिहिण्याचाच तो प्रयोग होता. यातूनच माझा मित्र केदार शिंदेच्या तू तू मी मी नाटकासाठी त्याने प्रचंड आग्रह केला म्हणून मी गाणे लिहिले. खर तर माझी गीतलेखनाची हीच खरी सुरुवात होती.

‘मन उधाण वाऱ्याचे’ ने नाव दिले!

      हे माझे चित्रपटासाठी लिहिलेले पहिले गाणे. आजही या गीताची मोहिनी मराठी माणसाच्या मनावर आहे. पुढे असंख्य गाणी लिहिली. गाणी लिहितानाही व्यंगचित्रकलेसाठी आत्मसाद केलेली निरीक्षणशक्तीच जास्त कामाला आली. हल्ली चालीवर गाणी होतात. आधी चाल दिली जाते. पार्श्‍वभूमी सांगितली जाते. त्यावर शब्द लिहून गाणे तयार करायचे असते. हा सगळा उत्तम मेळ जुळून आला तरच उत्तम गाणे तयार होते. नवनिर्मिती इथूनच होते. कार्यशाळा, तंत्रशुद्ध शिक्षणातून सगळच येत नाही, तुम्ही त्यात किती समरस होता यावर तुमचे यश अवलंबून असते, असेही शेवटी बोलताना गुरु ठाकुर म्हणाले.

गुरु ठाकुरांचा थक्क करणारा प्रवास

      राजकीय व्यंगचित्रकार, स्तंभलेखक, कवी, अभिनेता अशी चौफेर मुशाफिरी करत फिल्म इंडस्ट्रित दाखल झालेल्या गुरु ठाकुर यांनी पटकथा, संवादलेखनाबरोबरच गीतकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अबालवृद्ध सर्वांच्याच मनावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या विविधढंगी गीतातून त्यांनी गुरु ठाकुर हे नाव सर्वामुखी केले. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना अनेक गौरव व पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. नटरंग चित्रपटासाठी 2009 सालचा महाराष्ट्र राज्य कलागौरव पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार, मटा सन्मान, झी गौरव, दादा कोंडके पुरस्कार, प्लनेट मराठी फिल्मफेअर, आरती प्रभू पुरस्कार, राजा परांजपे पुरस्कार, चैत्रबल पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. 14 मे या कार्यक्रमा दिवशीच सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सवात फिरस्त्या या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून गुरु ठाकूर पुरस्कार मिळाला. हा कार्यक्रम मालवण येथे होता. तरीही नियोजित वेळ किरात शताब्दी स्नेहमेळाव्यासाठी दिलेली असल्याने हा पुरस्कार घेण्यासाठी येण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. यातूनही त्यांच्या दिलेल्या शब्दला जागणाऱ्या माणसाचे दर्शन होते.

दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारी स्वीकारली

      लहानपणी झालेले संस्कार आणि मातीचे गुणधर्म ते कधीच विसरलेले नाहीत. म्हणूनच तर आजपर्यंत अनेकवेळा आलेल्या आयटम साँगच्या ऑफर्स त्यांनी लिलया फेटाळल्या आहेत. कुटुंबवत्सल स्वभावाचे गुरु ठाकुर आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून केवळ मातीवरील प्रेमापोटीच किरातच्या शतक महोत्सवी स्नेहमेळाव्यास कोणतेही आढेवेढे न घेता उपस्थित राहिलेले. यातूनच त्यांच्यातील सृजनशीलता दिसून येते. सध्या त्यांनी विविध चित्रपटांसाठी संवाद, पटकथा, गीतलेखनाबरोबरच चार चित्रपटांना दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या भावी उपक्रमांसाठी किराततर्फे मनःपूर्वक शुभेच्छा…!

– महेंद्र मातोंडकर, वेंगुर्ला, 9158881618

Leave a Reply

Close Menu