कै.भास्कर गंगाराम परब

9 मे 2022 रोजी संध्याकाळी 6.30 वा. भास्कर गंगाराम परब यांच्या निधनाची बातमी कानी आली. लगेच त्यांच्या घरी गेलो, पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्यविधी आटोपून घरी आलो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मागच्या 50 वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर आला. परिचय, प्रेम, ऋणानुबंधाने एकत्र आलेल्या व्यक्तीची पुन्हा कधीही भेट होणार नाही याची जाणीव झाल्यावर त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच्या स्मृती जागृत होतात व आठवणींना उजाळा मिळतो.

      1972 साली मी मुंबईला प्रथमच गेलो. मुंबईची मला मुळीच माहिती नव्हती. माझा मित्र श्री. दादा साळगावकर हा मला भास्कर परब यांच्या घरी घेऊन गेला. ती माझी व त्यांची प्रथम भेट. पुढे श्री सातेरी प्रासादिक संघाच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांची माझी भेट होत गेली. 1980 साली माझी प्रथम श्री सातेरी प्रासादिक संघाच्या कार्यकारिणीत निवड झाली. तेव्हा संस्थेच्या मासिक सभा त्यांच्या घरी म्हणजे भायखळा येथील ख्राईस चर्च स्कूल स्टाफ कॉर्टर येथे व्हायच्या.

      भास्कर परब म्हणजे आप्पाजी व जानकी परब म्हणजे अम्मा हे दोघेही भायखळ्याच्या ख्राईस चर्च स्कूल या इंग्लीश मिडियम स्कूलमध्ये अध्यापक होते. दोघेही एम.ए. हिंदी विषयाचे अध्यापक होते. नोकरीच्या कालावधीत त्यांचा प्रेमविवाह झाला. त्या काळात हा विवाह बराच गाजला होता. भास्कर परबान मद्राशिणीशी लगीन केल्यान अशी गावात चर्चा झाली. परंतु तसा विरोध नसल्याने ती चर्चा निमाली. याचे कारण म्हणजे अम्मांनी सासरच्या माणसांशी प्रस्तापित केलेले संबंध.

      आप्पाजींना 3 मुले. मोठा राजन, रमेश व मुलगी राजलक्ष्मी. तिघांचेही शिक्षण ख्राईस चर्च स्कूलमध्ये झाले. पुढे तिघेही मुंबई केइएम मधून एमबीबीएस डॉक्टर झाले. तिन्ही मुलांना वैद्यकीय शिक्षण देणे ही सामान्य गोष्ट नाही. राजन एमबीबीएस गोल्ड मेडालिस्ट. राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. डॉक्टर झाल्यावर आपल्या ज्ञानाचा उपयोग गावच्या लोकांना व्हावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु नियतीची इच्छा वेगळी होती. राजनचे अपघाती निधन झाले. हा आप्पाजींच्या जीवनातील मोठा धक्का होता. त्यातून ते सावरतील की नाही याची आम्हाला शंका होती. परंतु अध्यात्मिक शक्तीचा आधार घेत त्यांनी त्यावर मात केली. पुढे राजनची अपुरी राहिलेली इच्छा रमेशने पुरी केली. राजनच्या नावाने सुरुवातीला आपल्या वेंगुर्ला येथील घरीच वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. त्यात त्यावेळी राजलक्ष्मीने पण बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा दिली. विवाहानंतर तिने व तिचे पती डॉ. लक्ष्मण यांनीही बालरोग तज्ज्ञ म्हणून वेंगुर्ल्यात काही काळ आपली सेवा दिली. हे सविस्तर देण्याचे कारण म्हणजे आई-वडीलांनी आपल्या मुलांवर केलेले संस्कार, याचे हे आदर्श उदाहरण आहे. मुंबईत राहून पैसे कमावणे हा उद्देश या कुटुंबाने ठेवला असता तर बक्कळ पैसा कमावला असता.

      श्रीदेवी सातेरीवर आप्पाजींची आपार श्रद्धा. सन 1970 साली श्री सातेरी प्रासादिक संङाचे पुनर्जीवन झाले त्यावेळी अध्यक्ष म्हणून विठ्ठलराव वारंग व सचिव म्हणून श्री. भास्करराव परब यांनी संस्थेची धुरा सांभाळली व खऱ्या अर्थाने संस्थेची भरभराट झाली. पूर्वी संस्थेचे दसरा मेळावा व होळी संमेलन असे एकत्र येण्याचे दोन कार्यक्रम असायचे. त्यात बदल करून द्विवार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग व्हायचा. सभासदांच्या मुलांना बक्षिसे, पारितोषिके देऊन गुणगौरव करणे, सेवानिवृत्त सभासदांचा व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार असा उपक्रम चालू केला. त्यामुळे सभासद त्या कार्यक्रमास सहकुटुंब येऊ लागले. आप्पाजींच्या लाघवी व ओजस्वी वाणीने सभासद वाढले. देणगीदार वाढले. संस्थेची आर्थिक स्थिती पण सुधारली.

      1940 साली स्थापन झालेल्या संस्थेची स्वतःची वास्तू असावी असा प्रस्ताव आला. मुंबईत ते शक्य नसल्याने गावी वेंगुर्ल्यात श्री देवी सातेरी मंदिराच्या बाजूला जुन्या काळात असलेल्या धर्मशाळेच्या जागेवर व उघड्यावर पडलेल्या देवतांच्या मूर्त्या त्यात घेऊन, हॉल बांधण्याचे सर्वानुमते ठरले. जेणेकरुन त्याचा उपयोग संस्थेला व देवस्थानला होईल असा उद्देश होता. नगरपालिका व नगररचनाकार यांना कागदपत्रांची पूर्तता करुन बांधकाम सुरू करण्यास 4 वर्षे गेली. या सर्वांसाठी आप्पाजींनी अथक परिश्रम घेतले. 1988 साली वास्तू जनसेवा मंदिराच्या नावाने उभी राहीली.

      यानंतर श्री सातेरी मंदिराच्या गळतीचा प्रश्‍न पुढे आला. मंदिराची गळती थांबविणे व जीर्णोद्धार कार्य करणे हे मोठे काम संस्थेने हाती घेतले व 1992-93 साली सलग 2 वर्षात ते कार्य पूर्ण केले. संस्थेचे कार्य, जनसेवा मंदिर हॉल, श्री सातेरी मंदिर जीर्णोद्धार कार्य यासाठी निधी जमा करणे हे जिकीरीचे काम होते. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी आप्पाजी बरोबर आम्ही मुंबईत गाववाल्यांकडे दारोदार फिरलो. त्या दिवसात संस्थेच्या कार्यकर्त्यांचे टीमवर्क चांगले होते व आमचे टीम लिडर आप्पाजी होते. त्यांच्या स्वभाव व वाक्‌चातुर्याने संस्थेने ही मोठी कार्ये लिलया पार पाडली हे आवर्जुन नमुद करावे लागेल.

      सन 1989 साली सेवानिवृत्ती नंतर आप्पाजी गावी वेंगुर्ला येथे स्थायिक झाले. वेंगुर्ल्यात श्री सातेरी प्रासादिक संघ, वेंगुर्लाचे सचिव झाले. कै. जी. एल. परब, कै.सदानंद परब, श्री. राजाराम नाईक यांच्या सोबतीने संस्थेत उल्लेखनीय कार्य केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले. कै. जी. एल. परब यांच्यानंतर ते संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, मनाचे श्‍लोक, गीत गायन, चित्रकला व नाट्याभिनय अशा स्पर्धांचे आयोजन केले. त्यांचे पुढचे पाऊल म्हणजे नवोदित लेखक, कवी व साहित्यिक यांना प्रोत्साहित करणे. सौ. वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून आनंदयात्री मंडळाची निर्मिती झाली. आप्पाजींनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. आज आनंदयात्री मंडळाचे विविध कार्यक्रम होत आहेत.

      शिक्षकी पेशा असल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळांसाठी शक्य होईल तेवढी मदत केली. वेंगुर्ला शाळा नं. 4ची मोडकळीस आलेली जूनी इमारत आपले सहकारी कै. अनंत वारंग आदिंच्या सहकार्याने शिक्षक पालक संघाच्या माध्यमातून दुरुस्ती करुन घेऊन उपयोगात आणली. अशी अनेक सामाज उपयोगी कामे करण्यात त्यांची हयात गेली.

      कै. राजनच्या निधनानंतर स्वाभाविकच आप्पाजी मानसिक अस्थिर झाले होते. परंतु अध्यात्माची कास धरुन ते त्यातून सावरले. पुढे ते त्या क्षेत्रात कलावती आईचे उपासक झाले. श्री सातेरी मंदिरात त्यांनी प्रथम मुलांसाठी बालोपासना चालू केली. वेंगुर्ल्यातील प्राथमिक शाळांत जावून त्याचा प्रचार व प्रसार केला. बऱ्याच मंदिरांतून कलावती आर्इंची उपासना सुरु केली. श्री सातेरी मंदिरासमोर आपल्या जागेत स्वखर्चाने कलावती आईचे मंदिर बांधले. ती त्यांची कायमस्वरुपी आठवण व ओळख होऊ राहिली आहे.

      आप्पाजींनी प्रपंच व परमार्थाची सांगड घातली. एवढे करत असताना त्यांनी प्रपंचाकडे दुर्लक्ष केला नाही. त्यांना बागायतीची आवड होती. गावी आल्यावर त्यांनी स्वतः माड, पोफळी, आंबा कलमांची, फुलझाडांची नवीन लागवड केली. ते स्वतः त्यासाठी मेहनत करीत. आपण उत्पादित केलेली फळे-फुले दुसऱ्यांना देण्यात त्यांना अतिशय आनंद होत असे.

      आप्पाजी बाबत लिहिण्यासारखे खूप आहे. आमच्यासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. ते खऱ्या अर्थाने जीवन जगले. श्री देवी सातेरी मंदिराचा ट्रस्ट व्हावा यासाठी ते आग्रही होते. ट्रस्ट झाल्यावर मंदिराची झालेली प्रगती पाहून नेहमी कौतुक करायचे. प्रोत्साहन द्यायचे व सूचनाही करायचे. प्रत्येक भेटीत ते म्हणायचे, रवी तुझ्यावर देवीची कृपा आहे. हे खरे आहे. श्री देवीच्या कृपेमुळेच मला आप्पाजींचा 50 वर्षांचा सहवास लाभला. आप्पाजींपेक्षा मी 20 वर्षे 7 दिवसांनी लहान. 13 डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी आम्ही अगत्याने भेटत असू. 13 डिसेंबर 22 ला तो योग येणार नसल्याचे दुःख आहे. त्यासाठी ही शब्दसुमनांजली. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

– श्री. रवी परब, वेंगुर्ला, 9423513738

Leave a Reply

Close Menu